Monday, 15 March 2021

तुझी आठवण

***

तुझी आठवण.. काढत असते 'तुझी आठवण'
दुःखद असुनी.. 'लज्जत' असते तुझी आठवण

ध्यानी येता.. दिली घेतली वचने आपण
कृतघ्न दोघे.. सांगत असते तुझी आठवण

धूसर होतो डोळ्यांचाही.. स्वच्छ आरसा  
अश्रूंनाही.. भिजवत असते तुझी आठवण

मनकवडा मी.. तुझ्या मनीचे सर्व जाणतो
सदैव खोटे बोलत असते तुझी आठवण

चिठ्ठ्या, कागद, पत्रे, कुजबुज आपसातली
वेष सारखे बदलत असते तुझी आठवण

स्वप्न सुषुप्तीमध्ये विरघळण्याच्या आधी
रोज मनाला जाळत असते तुझी आठवण

डोक्यावरती वेगवेगळ्या वेळी पडल्या
अक्षतांस त्या.. कोसत असते तुझी आठवण

स्मशानातले सरण म्हणू की तिला 'दिवाळी'?
चितेत माझ्या.. उजळत असते तुझी आठवण

तुझ्याहूनही.. जगणे आहे प्रश्न कळीचा
सोयीने हे विसरत असते.. तुझी आठवण

                               - अभिजीत काळे.