Sunday, 12 September 2021

त्सुनामी

मनाच्या मृदू भावनांची त्सुनामी
कशी आवरू आसवांची त्सुनामी 

अनावर तुझा राग झेलू कसा मी?
जणू शेकडो सागरांची त्सुनामी

तिने व्यापले सर्व ब्रह्मांड आहे
मनाच्या खुळ्या कल्पनांची त्सुनामी

नियंत्रण कुणाचेच नाही तिच्यावर
कळ्या जाळते वासनांची त्सुनामी

दिसू लागले गंध डोळ्यांस माझ्या
मनाच्या मळ्यावर फुलांची त्सुनामी

सुकी पाकळी जीर्ण पानांतली की?
मनी ओलभरल्या क्षणांची त्सुनामी

तिला अत्तराचे तळे मानतो मी
सुगंधी तिच्या आठवांची त्सुनामी

                  - अभिजीत काळे.

जागा

***

मनाप्रमाणे जगणे सांगा कुणास जमले आहे?
प्रवाह नेई तसे जिवाचे जगणे वळले आहे.
                   
प्रेमाखातर विकू स्वतःची मर्जीसुद्धा म्हटलो!
मन माझे तर आधीपासुन तुझे जाहले  आहे.

विश्वामध्ये कोणाचीही मिळकत शाश्वत नाही. 
माझेमाझे म्हणून सगळे अखेर फसले आहे. 
 
पत्राचा जो अर्थ हवा तो काढ तुला म्हटल्यावर,
मायन्यातले फूलच गाली तिच्या रंगले आहे!

भाव चेहर्‍यावरचे म‍ाझ्या लपवू शकलो नाही. 
'मनात माझ्या काय चालले', तिला समजले आहे.

मर्जी माझी, इच्छा माझ्या म्हणून थकल्यानंतर,
प्रत्येकावर आयुष्याचे गणित रूसले आहे. 

तिला विचारू शकलो नाही माझी जागा नक्की,
विसरलेय ती खास मला की हॄदयी जपले आहे?

                                       - अभिजीत काळे.
                                       २३ ऑगस्ट २०२०.

निःसंग

***

मन हरवते कुठे शोधता येत नाही
विश्व देहासवे लांघता येत नाही

जीवनी एकदा चांगली वेळ येते  
वेळ नक्की तिची सांगता येत नाही

वाट चालायला मी निघालो, समजले
वाट वाटेसही सोडता येत नाही

काळओघ‍ामधे सांडलेल्या क्षणांना 
जात मागे पुन्हा वेचता येत नाही

माणसे फाटकी पण मने मात्र मोठी
आज कोणास हे पाहता येत नाही

लाज नाहीच माझ्या मला वागण्याची
स्वार्थ कोणासही त्यागता येत नाही

कोणती अर्जुना प्राप्त केलीस सिद्धी
लक्ष्य बाणास की चुकवता येत नाही

जीवना सोबतीला तुझ्या नित्य मृत्यू 
वेळ ज्या नेमली खोडता येत नाही

(फ‍ार इतकी नसावी जखम खोल माझी)
काय भरली असावी जखम खोल माझी
सांत्वनाला कुणी 'जाणता' येत नाही

ही प्रवाशा तुला वाट काट्यात नेते
अन् तुला नीटसे चालता येत नाही

वाटते देह टाकून निःसंग व्हावे
वेष हा मोहमय सांडता येत नाही

                      - अभिजीत काळे.
                     २ ऑक्टोबर २०२०.

दोन ओळी

***

तुला पाहून सुचल्या दोन ओळी
उभे आयुष्य पुरल्या दोन ओळी

नको फाफटपसारा अक्षरांचा
लिहू डोळ्यांत भिजल्या दोन ओळी

लिहाव्या वाटल्या मनभावना मग
सुखादुःखात सजल्या दोन ओळी

कसा ठेऊ किनार्‍यावर भरवसा 
सहज लाटेत विरल्या दोन ओळी

तुझे, माझे, जगाचे दुःख कळता
मनी निःशब्द रडल्या दोन ओळी

कथा शब्दांविना कळणार नाही
तुझ्या मौनात बुजल्या दोन ओळी

रडू आले तुझ्या त्या सांत्वनाने
धुराचे लोट ठरल्या दोन ओळी

                     अभिजीत काळे.
                 २७ ऑक्टोबर २०२०.

अलिप्त

***

लपवून सावल्यांना माझ्याच आत मी
बसतो खुशाल तापत माझ्या उन्हात मी  

तृष्णा कशी सरावी माझ्या घटातली
ओंजळ भरू पहातो जर मृगजळात मी

निद्रिस्त भाग्य जागे होईल एकदा
स्वप्नात रोज रमतो माझ्या मनात मी

एकाच पावसाने हुरळून जायचो
पेरायला सुखाचे बी वावरात मी

डोक्यावरी छत‍ाचा पत्ता नसूनही
म्हणतोय 'रोज माझी ही चांदरात' मी

आणून घसरलेली गाडी रुळावरी
लावीन संकटांची मग वासलात मी

झालोय मीच साधन अन् मीच साधना
म्हणुनी अलिप्त आहे या रौरवात मी

                           - अभिजीत काळे.
                           ५ नोव्हेंबर २०२०.

सहोदर

***

किंमत जरी न त्याला खात्यात जीवनाच्या
पैसाच राज्य करतो खेळात जीवनाच्या

संयम, प्रकाश अपुरे वेगापुढे मनाच्या
अन् बंदिवान मन ते जाळ्यात जीवनाच्या

स्वातंत्र्य वासनांना देताच माणसाने
घडल्या कथा हजारो कुख्यात जीवनाच्या

शरपंजरी सुखाची आरास मांडण्याला
निष्ठूर तीर काही भात्यात जीवनाच्या

आधार ते सुखाचा होतील सांजवेळी
क्षण साठवत रहावे ओच्यात जीवनाच्या

जोवर सुपात तोवर नाचत रहा खुळ्यांनो
होणार पीठ शेवट जात्यात जीवनाच्या

आयुष्य फार थोडे, स्वप्ने अनंत आशा
सगळे कसे बसावे साच्यात जीवनाच्या

अंतीम श्वास ठरतो देऊन शांत निद्र‍ा   
मृत्यू खरा सहोदर नात्यात जीवनाच्या

                            - अभिजीत काळे.
                           २१ नोव्हेंबर २०२०.

आषाढओढ

***

सूर्य सोडतो शर तेजाचे दग्ध धरेवर समस्त जीवन 
लाही लाही चराचराची तनमन म्हणते जीवन जीवन

तप्त उन्हाच्या तीव्र शरांनी वैशाखाची तलखी छळते
हाक पावश्या नभास देतो आषाढाची ओढ लागते    
दुरून फिरता वारा येतो पाचोळ्याची वरात मिरवत
आषाढाचे दूत बरसता मृद्गंधी दरवळते जीवन

कभिन्न काळे जमून येते आकाशी घन जलदांचे दळ
किरणे घेती पाउल मागे अंधाराला येते मग बळ
मदोन्मत्त ढग टक्कर घेती जणू खेळती नभात कुंजर 
आषाढाच्या पहिल्या दिवशी आनंदाने न्हाते जीवन

नक्षत्रांच्या चक्रामधली सूर्य निवडतो काही ओली
जलधारांनी करते वर्षा वसुंधरेची ओटी ओली
वेळ वेंधळी काळ बावरा अंबर अवचित काजळ कातर
सांज सकाळी मध्यान्हीला अवघे जलमय होते जीवन

हिरवाईची शाल धरेला अर्पण करुनी ऋतू बदलतो
शेतामधला ढेकुळ गोळा मऊसूत की मखमल होतो 
कृष्णघनांचे येणे जाणे ऊन सावली लागे शर्यत
रस्ते ओहळ छपरावरती अोसंडत झुळझुळते जीवन

स्वप्नांमध्ये रमलेली ती प्रेमपाखरे नवी-नवेली
चिंब नाहती आबादानी मिठीत बिलगत झाडेवेली
सरसर धारा अवखळ वारा अन् साथीला वेडा साजण 
धुंद क्षणांचे स्फटीक ओले गालांवर ओघळते जीवन

                                           - अभिजित काळे.

घाबरतो

***

जगी जन्मूनही जगण्यास घाबरतो
इथे प्रत्येकजण मरणास घाबरतो

व्यसन की लागते त्याचे म्हणे नंतर
म्हणुन तर एकटा पडण्यास घाबरतो

गुणी माझा जरी छापा तुला दिसतो
मनाच्या मी तरी काट्यास घाबरतो

तुला बोलायचे ते बोल बिनदिक्कत 
तुझ्या मी दुष्ट त्या मौनास घाबरतो

धिराने संकटांचा सामना करतो
स्वतःशी मात्र मी लढण्यास घाबरतो

गळा घोटू कसा माझ्याच स्वप्नांचा
नवे मी स्वप्नही बघण्यास घाबरतो

रडवले फार तू आहेस आयुष्या
तुझ्यावर मी कुठे हसण्यास घाबरतो

                        - अभिजीत काळे.
                       ३० नोव्हेंबर २०२०.

अंतकाळी

***

भेटले लोक येथे विखाळी मला
जीवनाने दिली रणधुमाळी मला

स्वप्न घेऊन जो झोपलो मी तिचे
जाग आलीच नाही सकाळी मला

रूप, शृंगार, फाया, नजरफेकही
रोज बेजार करते नव्हाळी मला

जागते आठवण सांजवेळी तुझी 
देत अश्रूंसवे रात्रपाळी मला

ज्ञान, पांडित्य सार्‍या फुका वल्गना
मी पणा टांगतो अंतराळी मला

गंध श्वासांस स्पर्शून जातो तुझा
वेड लावून जाते मधाळी मला

नीर डोळ्यांत साचून येते सखे
हा अबोला तुझा पावसाळी मला

प्रेम, आशा, स्मृती, पंख, स्वप्ने दिली
मन दिले की प्रभूने दिवाळी मला?

मार्ग निवडुन तुझा दूर गेलीस तू
आपले ना कुणी अंतकाळी मला

                       - अभिजीत काळे.
                      २९ नोव्हेंबर २०२०.

प्राक्तना

***

प्राक्तना उट्टे तुझेही काढेन मी केव्हातरी 
जे मला साधायचे ते साधेन मी केव्हातरी

उष्ण झाल्या स्पंदनांनो शमवू नका ना वेग हा
गारवा मिळवायचा तो मिळवेन मी केव्हातरी 

ओठ रंगवते जरी ती, त्यांना खरे समजेन मी   
सत्य शोधक कुतुहलाला शमवेन मी केव्हातरी

आज आले जर नभाचे उत्स्फूर्तसे बोलावणे
तर धरेशी प्रेम माझे निभवेन मी केव्हातरी 

वैर कोणाशीच माथी घेणे नकोसे वाटते
प्रेम देतो प्रेम घेतो भांडेन मी केव्हातरी

चालत्या फिरत्या मनाला मी बसवले जागेवरी
तू तुझे फिरवून घे ना फिरवेन मी केव्हातरी

राहते तलवार एकच म्यानात एका एकदा
एकदा बोलून घे तू बोलेन मी केव्हातरी
     
                                   - अभिजीत काळे.
                                    ६ डिसेंबर २०२०.

दाद

***

जळतो मी अन् दुपार होते सकाळ सरते आहे
मला मालवत दिवसाची या सांज सरकते आहे

फोटोमध्ये दिसते आहे जरी पौर्णिमा माझ्या
अमावसेची नांदी पुढच्या त्यात झळकते आहे

'आयुष्याच्या प्रवासामधे सोबत करतो रस्ता'
घडून गेल्या मुक्कामांची यादी म्हणते आहे

ऋतुंप्रमाणे उडून गेली सारी पाखरशाळा 
माळावरचे एकाकी ते झाड सांगते आहे

ओठांवरचे हसू तुझ्या या उधारउसने आहे
डोळ्यांभवती काजळकाळे वलय बोलते आहे

तुजला संपवण्याचा त्यांनी घाट घातला होता  
'शब्द तुझे पण कागद त्यांचा' यात समजते आहे

अजब नशा ती मदिरेपेक्षा अवीट अन् उन्मादक
दाद, वाहवा रसिकांची ही गझल मागते आहे

                                - अभिजीत काळे.
                               १० डिसेंबर २०२०.

पाचोळा

***

मनस्वी राग येतो दांभिकांच्या वागण्याचा
गुन्हा केलाय दाखल मी.. मराठीच्या खुनाचा

कुठे डोहासही माहीत असतो तळ स्वतःचा
मनाचा तोल गेल्यावर.. समजला अर्थ याचा

क्षणांचा खेळ तो त्यांच्या.. मनाचा अन् तनाचा
हिर्‍य‍ाची खाण होती जी.. तिच्या उरल्यात काचा

असावा काय दावा मयसभ‍ेच्या वारशाचा
बदलतो सारखा का चेहरा त्या आरशाचा

दिवा आहे घराचा, बैठकीचा, मंदिराचा
असो कुठला फरक पडतो हवेला काय त्याचा

कशासाठी समाधानी म्हणावे मी स्वतःला
सदोदित प‍ाहिजे असतो मला सदरा सुखाचा

मनाच्या भावनांचा, आसवांचा, हासण्याचा
बदलतो अर्थ दृष्टीकोन बदला पाहण्याचा

भरीला घातले त्यांनी.. तसा मग वागलो मी
मला आधी हवा होता कळाया कल जगाचा

इथे तर सावलीसुद्धा तुला सोडून जाते
तुझ्यावर भरदुपारी रोष झाल्यावर उन्हाचा

मनाच्या कागद‍ावर रेख नक्षी पावलांची
कुठे एकांतसुद्धा राहतो मग एकट्याचा

मला गन्तव्य माझे सांगता का येत नाही  
किती गाठेल उंची सांग पाचोळा मनाचा

                               - अभिजीत काळे.
                              १६ डिसेंबर २०२०

ये सुखदे

दुःख पुरे छळवाद पुरे वनवास नको नशिबात पुरे
वाजत गाजत ये सुखदे उपवास पुरे उपहास पुरे

जीवन कानन कैद जणू अपराध कळे नच काय असे
येइल जाग उद्या अथवा घडणार पुढे कळणार कसे 
कर्मकथा अभिभाव व्यथा इतुक्यात इथे विपदा न सरे
नाचत खेळत ये सुखदे उपवास पुरे उपहास पुरे

मानस सारस हंस मना मधुपा तृषिता षटपाद मना  
लोभ उरी धरतोस कसा तितकेच मिळे जितका भरणा
भ्रामक पारद जीवन हे गवसे न कधी चिमटीत पुरे
हासत हासत ये सुखदे उपवास पुरे उपहास पुरे

शारद सुंदर मृण्मय तू मनभावन पावन तू शुभदे
धुंदित गंधित जीवन दे जनमंगलकारक आशिष दे
चिन्मय शाश्वत दुःखहरे वरदायक कामद मोक्षकरे
नंदित मोदित ये सुखदे उपवास पुरे उपहास पुरे

                                  - अभिजीत काळे
                             #गोदातीर्थ_काव्यसाधक.

लोकशाही

***

भारतासमान देश या जगात नाही
सार्वभौम राष्ट्र श्रेष्ठ मूल्य लोकशाही

रंग-रूप-वर्ण गौण, ज्ञान श्रेष्ठ आहे
शब्द पाळण्यात मानपानशान राहे
राष्ट्रभावनेस लोकमान्यता पसंती
सार्वभौम राष्ट्र श्रेष्ठ मूल्य लोकशाही

गर्व तो अम्हांस भ‍ारतीय संस्कृतीचा
साम, दाम, दंड, भेद, मान कायद्याचा
धर्म, अर्थ, काम, मोक्ष, सत्य, प्रेम, नीती
सार्वभौम राष्ट्र श्रेष्ठ मूल्य लोकशाही

धर्म, पंथ, प्रांत, वेष, भिन्न मायबोली
ऐक्य, स्नेह, राष्ट्रप्रेम हीच देहबोली
येथल्या परंपरेत न्यून व्यंग नाही
सार्वभौम राष्ट्र श्रेष्ठ मूल्य लोकशाही

हिंदुमुस्लिमांसहीत जैन, शीख, ख्रिस्ती
नांदते मनामनात शुद्ध देशभक्ती
राष्ट्रतेज वाढवी मनी ध्वजा तिरंगी
सार्वभौम राष्ट्र श्रेष्ठ मूल्य लोकशाही

भारतासमान देश या जगात नाही
सार्वभौम राष्ट्र, श्रेष्ठ मूल्य, लोकशाही

                        - अभिजीत काळे.

आर्त

आर्त संपता मनास विश्व व्यर्थ वाटते
फोल वाटती व्यथा नि फोल सौख्य वाटते

काल ज्या खुळ्या प्रथा जळून राख जाहल्या
आज त्या पुन्हा नवीन रंगरूप ल्यायल्या
तेच तेच रे पुन्हा इथे फिरून येतसे 
फोल वाटती व्यथा नि फोल सौख्य वाटते

सत्य वेगळे असे नि वेगळी परिस्थिती 
वेळ एक जीवनात येतसे खरीच ती
नेमके जिथे नको तिथेच भाग्य सांडते
फोल वाटती व्यथा नि फोल सौख्य वाटते

पापपुण्यही मुळी न स्पर्शती जयास तो
रक्तमांसमेदयुक्त पार्थिवात राहतो
पंकजासमान ज्या अलिप्त विश्वकर्दमी
फोल वाटती व्यथा नि फोल सौख्य वाटते

गुंतते न जी कुठे पवित्र ती तटस्थता  
ती स्थितीस लाभता विवादमुक्त शांतता
शब्दशून्य मौन त्या अनाहतात नादते
फोल वाटती व्यथा नि फोल सौख्य वाटते

जे अगम्य ते खुणावते मनास नेहमी
स्वस्वरूप जाणण्यास देह हा पडे कमी
जाणत‍ा जय‍ास जाणणे ‍जळून जातसे
फोल वाटती व्यथा नि फोल सौख्य वाटते

                         - अभिजीत काळे.

खारट

***

इंद्रियांना कामनांचे चोचले
अन् मनाला.. माणसाने कोसले

आठवांचे कोष असते सांडले
पापण्यांनी.. बांध त्यांना घातले

आंधळ्या बुद्धीस आळस भेटला
कष्टही.. गळफास घेण्या धावले

फारकत अर्थासवे झाली म्हणे
अक्षरांना.. क्षर बनावे लागले

वाळवीने झाड पोखरले जरी
पाखरांचे.. बंड नाही सोसले

गोडवा चाखून नाही संपला
ओठ की..पोळे मधाने माखले

गोड कैर्‍या, चिंच, बोरे, आवळे 
पण तुझ्या.. विरहात खारट वाटले

                   - अभिजीत काळे.

पर्याय

***

द्वंद्व मोठे प्रश्न पडला काय सोडू काय निवडू
बोलणे वा मौन धरणे कोणता पर्याय निवडू

रेंज ज्या नात्यांस नाही ती खुजी नाती नकोतच
स्निग्धता मैत्रीत ओतू स्नेह भरली साय निवडू

एक क्षण तळपून विझते साहसी सौदामिनी की
अर्थ ना जगण्यास ज्या ती संथ गोगलगाय निवडू

आग विरहाची अशी जळणार नक्की तीत आपण
एकतर भेटूच किंवा वेगळा अध्याय निवडू

जायचे नाही जिथे त्यांना कशाला कारणे द्या
शक्यता पाहू म्हणूया, शक्यतो निरुपाय निवडू

स्वप्नवृक्षाची कशाला पानगळ वेचायची ती
पूर्तता ध्यासास देऊ ठोस तरणोपाय निवडू

मान अभिमानामधे फुगल्या उपाध्या व्यर्थ येथे
स्वाभिमानी सत्व ज्याचे तो भला स्वाध्याय निवडू

                                       - अभिजीत काळे

तो

***

माणसाला नेमका कळतो कुठे तो
काळ कोणाला कसा नडतो कुठे तो

पुस्तके विद्वेष पसरवतात जेव्हा
प्रेम भरला शब्द सापडतो कुठे तो

शोध नसतो एवढा सोपा स्वतःचा
खोलवर जा बघ तुला दिसतो कुठे तो

पांढरे झालेत काही केस आता
अर्थ त्याचा पण तुला कळतो कुठे तो

माणसाचा शोध घेतो देव येथे
माणसाला देव सापडतो कुठे तो

पात्र नाही मी तुझ्या प्रेमास नक्की  
शोध घे तू बाहुला मिळतो कुठे तो

एक वेडा शांत आहे आत माझ्या
मीच घेतो शोध बडबडतो कुठे तो

                       - अभिजीत काळे.

तो

***

माणसाला नेमका कळतो कुठे तो
काळ कोणाला कसा नडतो कुठे तो

पुस्तके विद्वेष पसरवतात जेव्हा
प्रेम भरला शब्द सापडतो कुठे तो

शोध नसतो एवढा सोपा स्वतःचा
खोलवर जा बघ तुला दिसतो कुठे तो

पांढरे झालेत काही केस आता
अर्थ त्याचा पण तुला कळतो कुठे तो

माणसाचा शोध घेतो देव येथे
माणसाला देव सापडतो कुठे तो

पात्र नाही मी तुझ्या प्रेमास नक्की  
शोध घे तू बाहुला मिळतो कुठे तो

एक वेडा शांत आहे आत माझ्या
मीच घेतो शोध बडबडतो कुठे तो

                       - अभिजीत काळे.

ठाव

***

दगडामध्ये देव पाहिला, ठाव विसरला आहे
डोहामध्ये  देहभ्रमाच्या  देव   हरवला  आहे 

कळतच नाही प्रवाहात मी कसा वाहवत गेलो
सावरण्याच्या आधी माझा  पाय घसरला आहे

वस्त्र तिरंगी,  रंग वाटुनी    झाल्यावर    बेरंगी 
धाग्यांमधला बांधिलकीचा भाव उसवला आहे

स्वप्नासोबत   नाते  माझे   जडले   उत्तररात्री
उजेडताना विरहबावरा दिन गहिवरला आहे 

कुणी काढली अशी आठवण कातरवेळी माझी
कंठी उचक्या, नयनी अश्रू,  श्वास वाढला आहे

आयुष्याची   कथा जगाला  नका कधीही  सांगू 
दुःख दुज्याचे एेकुन पाझर कुणास फुटला आहे

श्वास संपता, परतीचा तो मार्ग न आता  उरला 
क्षणात एका किती युगांचा काळ लोटला आहे

                                     - अभिजीत काळे.

लय

अगदी लिहायचंच नाही 
असं ठरवलं तरी
अंतर्मनातून उसळून
 बाहेर येण्यासाठी..
जीवाचं कोंडाळं
करून बसलेले शब्द 
जाणीवांच्या भिंतींना
धडका देत रहातात

तेव्हा... अनावर होतं त्यांना
काय ती लय धरून बसलास?
कोणती आवर्तनं हवीत तुला?
झपाटल्यागत करतोस हल्ली
वृत्त, नाद, लयबद्धता..
काय भेटतं रे यातून तुला?
येईल तसं स्वैरपणे मोकळं कर‍‍ावं..
आपलं मन.
आशय असणं महत्त्वाचं
मंत्र पोहोचला म्हणजे झालं

मग मात्र बिथरतो मी..
मलाच गोंजारत म्हणतो मी..
येतील तसे येऊदेत शब्द
निघतील तसे निघूदेत अर्थ
गाणं संपलं तरी चालेल
लयीचं बंधन नकोच आता
चौखूर उधळू दे वळू शब्दांचा

खरंय अगदी खरर्रय..
हे मुक्तछंदात व्यक्त होणं.. 
म्हणजे मॉडर्न आर्टिस्टच्या  
कुंचल्याच्या..
मुक्त फटकार्‍यांसारखं असतं. 
म्हटलं तर अर्थपूर्ण..
म्हटलं तर निरर्थक.. 

पण वळूच्या स्वैर
उधळण्यासही...
त्याच्या चालीची.. 
पदलालित्याची लय..
असतेच की हो

हो नं? काहीच तर नाही इथे
लय नाही असं 
लय संपली की.. साऽरं संपतं.

              - अभिजीत काळे

तुकाहृदय

***

कुठल्या अपराधाची शिक्षा आयुष्याला मिळते आहे?
कळल्यानंतर अजाणत्यांची मला काळजी छळते आहे

अनुभवण्याला नशा जगाची घेणे लागे तुला ग्लासभर
रक्तामध्ये माझ्या बनुनी कैफ गझल विरघळते आहे

चंद्र लाभला ज्याला त्याचा, नशीब त्याचे सुंदर असते  
उन्हे कोवळी महाग माझे जीवन इतके जळते आहे

तुझ्याहूनही चार पुस्तके कमीच शिक्षण आहे माझे
अनुभव माझी शाळा आहे, रक्त तुझे सळसळते आहे

तुझाच होतो, तुझाच आहे, विरह तरी का जन्मोजन्मी?
स्राव जरी ना वरून दिसला, जखम आत भळभळते आहे

चार क्षणांच्या जीवनात ह्या वैर उगा ते धरून बसले
अहंपणाने जळणार्‍यांना कुठे जिंदगी कळते आहे?

अनुभवण्याला दुःख दुज्यांचे 'जावे त्यांच्या वंशा' म्हटला,
दीन अभागी जीव पाहुनी तुकाहृदय कळवळते आहे

                                               - अभिजीत काळे.

मरण सोहळा

***

अवघड झाले जगणे येथे मृत्यू तारक दुःखापेक्षा
ह‍ाव सुखाची अन् पैशाची भलती दाहक दुःखापेक्षा

हळवा चाफा तुझ्या स्मृतींचा अश्रू शिंपत जपतो आहे
विसरुन जगणे प्रेम आपले मज संहारक दुःखापेक्षा

फार वाटले होते जीवन आनंदाने भरले आहे
भ्रमात असणे नको नको त्या असते बाधक दुःखापेक्षा

ब्रह्मांडाचा रिक्त पसारा बंध न जुळता ग्रहतार्‍यांचे
मानवास पण ग्रह शंकांचे केवळ मारक दुःखापेक्षा

परदुःखाहुन ज्वलंत असते दुःख दिलेले आप्तजनांनी 
स्वार्थासाठी जगणे असते फार भयानक दुःखापेक्षा

समजुन घेणे जमले नाही परस्परांचे मनही ज्यांना
एक राहणे दुःखद त्यांना विश्वविदारक दुःखापेक्षा

जमले नाही आनंदाने जगणे मजला म्हणतिल कोणी
मरण सोहळा माझ्यासाठी जन्मविघातक दुःखापेक्षा

                                         - अभिजीत काळे.
                                         १८ एप्रिल २०२१.

पूर्णता

***

मांडले, सोडले, जोडले, लांबले हे दिवस पण कुठे सांग संपायला?
मी विरह सोसतो पूर्णतेचा इथे, पूर्ण साधेल का पूर्णता यायला?

भेटले, भावले, जोखले, लाभले जे, मुरवले हळूवार प्राणांत मी
खूप आनंद याचा मला साथ देते इथे सर्व सृष्टीच ज‍ाणायला.

वाट, लाटा, हवा, सूर्य, डोंगर-दर्‍या, माणसे, वेळ, पाणी, हवे अन् नको
साधनेला जरी दोन बाजू, खरे! मध्यही पाहिजे ध्येय साधायला

द्यायची तेवढी लाख दे कारणे मात्र खोटे नको एकही त्यातले
गर्व वाटेल तेव्हा मलाही तुझा सत्य जेव्हा धजवशील सांगायला

केवढे विश्व अन् केवढी त्यापुढे माणसाची अहंता खुजी वाटते
काल रांगायला लागला जो इथे आज तो चालला विश्व बदलायला

                                          -  अभिजीत काळे.
                                           १५ एप्रिल २०२१.
                                           

वृत्तलय - स्वैरिणीक्रीडन,
 मागे प्रमोद‍दादांनी ( Pramod Kharade ) वृत्तात रचना केली होती ती वाचल्यानंतर मी कमेंटमध्ये त्याच वृत्तात मला सुचलं ते लिहिलं होतं. मात्र काल त्याच जमिनीमध्ये अजून काही सुचलं ते इथे शेअर करतोय.

परका

***

एका क्षणात परका होतोस तू जगाला. 
प्राणा तुझा भरवसा देऊ कसा उद्याला. 

नाळेसवे धरेवर आला नि वाढला जो,
देहास सोडुनी तो मिळतो कुण्या नभाला?

जो भेटला इथे तो सन्मित्र मान मित्रा,
पुढचा प्रवास केव्हा कोणास का कळाला?

संदेश शोक भरले, श्रद्धांजल्या, फुले ही,
काळास काय आहे सांगायचे जगाला?

विज्ञान, शोध, प्रगती, संशोधने विकारी 
आयुष्य अन् कितीसे असतेच माणसाला?

मुक्काम फार नाही, गाडी सुटे कधीही. 
व्हावा प्रवास इथला सांधत मनामनाला. 

विश्वास पेरण्याचे घ्या काम आज हाती. 
फळतील सर्व बागा द्या एवढा हवाला. 

                           - अभिजीत काळे.

आई

***

शब्दांत सापडेना वात्सल्य रूप आई
व्यापून अंबराला उरली तिची निळाई

विश्वात सानुल्यांच्या आईच सर्वकाही 
आई शिवाय न‍ाही त्य‍ांची दुजी विठाई

उदरात काळजीने नवमास गर्भ वाही
पुण्यास माप नाही इतकी तिची भलाई

पत्नी, बहीण, कन्या नाना रुपे जरी ती
होऊन 'माय' झिजली प्रत्येक जन्म बाई

अध्यात्म, धर्म, नीती चरणी तुझ्याच मुक्ती
तू माउली, तुकाई, एका, जना, जिजाई.

ब्रह्मांड अंतराळी मायेमुळे तरंगे
अवघी गुरुत्व शक्ती, दुग्धामधील साई.

पृथ्वीवरील सगळ्या नात्यांतली मलाई
भरलीय ज्यात, 'ना-ते'.. ते एक फक्त आई.

                                - अभिजीत काळे.
                                    ९ मे २०२१.

हलाहल

***

हृदयातले हलाहल अश्रूंत सांडतो
गाळून आसवे मी निर्धास्त झोपतो

आश्वस्त होत जाते माझी व्यथा पुढे
उसने हसून जेव्हा खोटे सुखावतो

डोक्यावरी छताची म्हणतात सावली
आधार चार भिंती कोणी न पाहतो

जीवन विषाक्त पामर पचवून हासतो
आयुष्य अन् विलासी पंख्यास टांगतो

दडवून बाष्पबिंदू ओल्या नभातले 
आकाश पापण्यांचे मी शुष्क ठेवतो

समभाव साधण्याला इतकेच वागतो
र‍ामास वाचतो मी कृष्णास ऐकतो

वाहून भूक नेते शहराकडे जथा
गावास आठवत मग माणूस संपतो

केलास भावनांचा व्यवहार रोख तू
मी मात्र त्यात हळवा संसार शोधतो

राधा यशोधरा अन् सीता नि द्रौपदी 
त्यागापुढे स्त्रियांच्या वैराग लाजतो

                        - अभिजीत काळे.
                            १८ मे २०२०.

पाणी

***

स्मृती घेऊन काळाच्या रुपे बदल‍ायचे पाणी
कुणाची आसवे, हासू कुणाचे व्हायचे प‍ाणी

कुणाला भाकरी न‍ाही, कुणी मागायचे पाणी
कुणाचे कोरडे डोळे बळे आणायचे प‍ाणी

तुझ्या एकाच झलकीने उन्हाळा व्हायचा शीतल
सुन्या नजरेत सुकलेले पुन्हा चमकायचे पाणी

भराव्या घागरी म्हणुनी कुण्या विहिरीकडे जावे
असोशीने पहावे तोवरी हरव‍ायचे पाणी

चमक डोळ्यांतली यावी कशी परतून माघारी
तुला बघता क्षणी लाजून जर मन व्हायचे पाणी

किनार‍ा शोधण्यासाठी दिवस गेले असे काही
समुद्रातून हृदयाच्या उफ‍ाळुन य‍ायचे पाणी

घडे पुरले कधी सांगा उन्हाला अमृताचेही
तुला मृगजळ तुझ्य‍ा वाटेतले व‍ाटायचे पाणी

किती सुकती किती बुडती तृषाव्याकुळ किती होती
कसे आणायचे, वाहायचे, सोसायचे पाणी

मिळाला जन्म आहे माणसाचा य‍ाचसाठी की
तृषा भागेल तृष्णेची असे शोधायचे प‍ाणी

                                   - अभिजीत काळे.
                                      २९ मे २०२१.

गाठोडे

***

उपभोगाच्या रस्त्यांवर जन्मांची उतरण आहे  
कर्मविपाकी जलधारांनी प्राक्तन सरिता वाहे 
नकळत भरते चिंध्यानी जे आणिक भरतच जाते
ना सुटणार्‍या पक्क्या गाठींच्या इच्छांचे हे गाठोडे

कलश तृषेचा भरतच नाही सुखे कितीही ओता
थकून जातो उरात वायू भरणारा मग भाता
मातीचा घट पुन्हा मिसळतो फुटून मातीमध्ये
ना सुटणार्‍या पक्क्या गाठींच्या इच्छांचे हे गाठोडे

डोळ्यांच्या निस्तेज बाहुल्या रंगहीन मुखम्लान
चैतन्याच्या गावी जातो देह टाकुनी प्राण
संपत नाही आस जिण्याची जरी थांबले श्वास
ना सुटणार्‍या पक्क्या गाठींच्या इच्छांचे हे गाठोडे

ऋणानुबंधासाठी इथल्या पुन्हापुन्हा मी येतो
जातीसाठी माती खातो मातीमध्ये मिळतो
आकाशाने मातीशी बांधले सनातन नाते
ना सुटणार्‍या पक्क्या गाठींच्या इच्छांचे हे गाठोडे

                                 - अभिजीत काळे.
                                   २४ जून २०२१

आठवण

***
कारण होती जी स्वप्नाला तुझी आठवण
हल्ली नाही छळत मन‍ाल‍ा तुझी ‍आठवण

वर्तमान मी जगतो आहे आनंदाने
दुधात विरजण हवी कशाला तुझी आठवण

अंथरल्या मी पायघड्याही असत्या तेव्हा
अता बोचते या हृदयाला तुझी आठवण

विसरलीस तू गजरा तो मी तुला माळला
अजूनही त्या गंधक्षणाला तुझी आठवण

झाडे, वेली, पायवाट अन् कड्याकपारी
अजून होते सिंहगडाला तुझी आठवण

जुन्य‍ा वहीच्या पानांमधल्या स्मृती उघडते
पुनीत करते या देहाला तुझी आठवण  

अगाध आहे ह्या काळाचा महिमा केवळ
नंतर येते सांग कुणाला तुझी आठवण?

                           ~ अभिजीत काळे.
                               १३ जुलै २०२१.

वृत्ती

***

स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याची किती फोफावली वृत्ती?
जगाला तुच्छ समजत ही पहा सोकावली वृत्ती.

खरेतर जायचे आहे नदीच्या पैलतीरावर.
किती पण ओढते मागे तुला सुस्तावली वृत्ती!

अखेरी चार लाभावे भले खांदेकरी खंदे.
हसत खेळत खुलव गप्पा, नसो रागावली वृत्ती.

नको चाकू, सुरे, बर्च्या, नसो भाले, कट्यारीही.
कटाक्षाने तुझ्या एका इथे भांबावली वृत्ती.

कुणी ऐकून घेतो ही नको समजूस  कमजोरी.
तुझी माजोरडी आहे कशी निर्ढावली वृत्ती?

व्यथांचा घोळ त्यागावा, स्वतःचा मार्ग शोधावा.
निरामय चित्त ठेवावे, असो भारावली वृत्ती.

खुळ्याशा कल्पनांच्या तू खुळ्य‍ा स्वप्नांत रमलेला.
दिसे गुर्मीत आगाऊ तुझी मस्तावली वृत्ती.

जगी आलास तेव्हा तू किती होतास रे साधा?
गुणांच्या संगती योगे अशी नादावली वृत्ती?

कुणाच्या कानपिचक्या अन् कुणाचे टोमणे जहरी.
अशाने साधली आहे मला शांतावली वृत्ती.

                                           ~ अभिजीत काळे.
                                               १८ जुलै २०२१.

Saturday, 11 September 2021

क्षर

***

एकावरती एक कधी का स्थिर राहतील थर वाळूचे ?
लेच्यापेच्या विश्वासाचे ढासळेल की घर वाळूचे..

इच्छाशक्ती असता जमते पांगळ्यासही पर्वत चढणे,
कशी भरारी जमेल सांगा असता तुमचे पर वाळूचे..

मृगजळ म्हणजे पाणी नाही तहान कुठुनी भागवेल ते,
पिकास नाही देत उभारी भुसभुशीत खाचर व‍ाळूचे..

आयुष्याच्या शाळेमध्ये लाख परीक्षा नशीब घेते,
हरतो येथे जो जो त्याचे हृदय म्हणू कातर वाळूचे..

गडकोटांची जरी शिबंदी रक्षण तुमचे करण्यासाठी,
वाचवेल पण कोण तुम्हाला असाल पुतळे जर वाळूचे..

गळे तेलही रगडल्यावरी प्रयत्नपूर्वक कण वाळूचे,
अशक्य जीवन जाण सर्वथा तुझेच जरका कर वाळूचे..

कैवल्याचा स्पर्श असुनही चंचल मन अन् शरीर असते,
नश्वरतेने शापित आहे पार्थिव इथले क्षर वाळूचे..

                                                 ~  अभिजीत काळे.
                                                     २७ जुलै २०२१.

आतल्या

***

ऐकवून मी कथा तुला बर्‍याच आतल्या
वाढवून ठेवल्या व्यथा उगाच आतल्या

संपले म्हणू कसे उठाव या मनातले
सोडतात त्या कुठे? खुणा तश्याच आतल्या

बोलणे नकोच ते मनात काय चालले
सांगती कळा खरे तुझ्या तुलाच आतल्या

दाबलेस दुःख तू पुरून भावना मनी
तोडल्यास कोवळ्या मुक्या कळ्याच आतल्या

गर्व वाटला मनी अहंपणा सुखावला
माकडास भावती मुढा उड्याच आतल्या

आर्जवीत राहिली तुला तुझी विषण्णता 
राख होत संपल्या पिढ्या तुझ्याच आतल्या

पोसलेस काल ज्या पिलांस द्वेष चारुनी
आज दंशतात ती, चुका खर्‍याच आतल्या?

                                ~ अभिजीत काळे.

रंग

***

रंग जो हृदयात वाहतो आहे
तोच तर शब्दांत मांडतो आहे

वाट काट्यातून चालतो आहे
मी फुलांचा त्रास टाळतो आहे

सांगते आयुष्य थोर सूर्याचे
जन्म तो जाज्वल्य जाळतो आहे

एक का पुरणार जन्म प्रेमाला?
मी पुन्हा आयुष्य मागतो आहे

चाललो आहे पुढे कधीचा मी
काळ पण मागेच ओढतो आहे

तीर नाही मारला जरी मोठा.
मी जग‍ाला फार जाचतो आहे!

ये अकाली ने मला, नको जगणे..
एवढा का वेळ लागतो आहे?

               ~ अभिजीत काळे.

खारुताई

बालगीत लिहायचा प्रयत्न...

खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी

दोन दात पटाशीचे तुझे किती मोठे
बद‍ामाचे कवचही त्यांच्यापुढे थिटे
उंचउंच झाडांवरी सुरपारंब्यांचा
खेळ किती रंगतो गं तुम्हा भावंडांचा
आत‍ा राहायाला नाही तुल‍ा झ‍ाडे इथे
झाडे सारी पडल्यावर तू र‍ाहाशील कुठे?
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी

मऊशार पाठीवरी लोकरीची बंडी
लागतंच नाही तिला काही थंडीबिंडी
पुढे पाय किंवा हात म्हणा काही तुम्ही
नाकाडाच्या टोकावरी काळीशार गुंडी
मोठमोठ्या डोळयांनी ती टकामका पाही
झुबकेदार शेपटी मोठी दिसे राजबिंडी
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी

इटुकली पिटुकली  बारकुशी काया
इवल्याश्या कानांनी ती ठाव घेते बया
लपाछपी खेळताना पानांमध्ये दडे
गोड गोड फळांसाठी झाडांवर चढे
सायूरीडी सायूरीनी कुलाची तू शान
विश्रांतीला थारा नाही कामातच मग्न
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी

रामसेतू बांधायाला योगदान दिले
इवलासा जीव तुझा तुरुतुरू चाले
माकडाच्या पाय‍ांखाली चिरडली खारू
रामाच्याही डोळ्यांतुनी ओघळले ‌अश्रू
डोक्यापासुन शेपटीपर्यंत पट्टा तुझ्या भारी
पाठीवरती श्रीरामांनी भेट दिली न्यारी
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी

                         ~ अभिजीत काळे.

तुझ्यानंतर

***

लिहावे कोणीतरी.. तुझ्यावर तुझ्यानंतर
वहावे चार अश्रू..    अनावर तुझ्यानंतर

ज्यांच्याकडे न होता भेटावयास अवधी
सांगतात तेच हक्क.. घरावर तुझ्यानंतर

तुझ्या मी सोबतीने जगतोय जे सुखाने
दिवस येतील तेही.. जिवावर तुझ्यानंतर

द्वेष, इर्षा, अहंता तू खाण अवगुणांची 
दुसरे कुठे भयंकर.. जनावर तुझ्यानंतर?

मनाभोवती रिमझिम अलवार कालची जी
आज तीच मुसळधार.. मनावर तुझ्यानंतर

तुझा शाहजोगपणा पूर्ण उघड झाल्यावर
कसा भरवसा ठेऊ..   कुणावर तुझ्यानंतर?

आवर्जून निघावी तुझी आठवण म्हणतो
राहो तुझा असर ह्या.. जगावर तुझ्यानंतर

                                 ~ अभिजीत काळे
                                  ५ ऑगस्ट २०२१.

स्थितप्रज्ञ

***

मी आरशात जेव्हा बसतो उगाच पाहत,
अंतर्मनात असतो तेव्हा मलाच पाहत.

परदुःख ज्यास कळते माणूस तो म्हणावा,
संस्कारशून्य प्राणी बसतो मजाच पाहत.

हो वाहतेय गंगा होतो विकास आहे.
काठावरी उभा पण गरजू रिताच पाहत.

काळासवे उजळती विझती दिशा दहाही.
तो येत जात नाही आत्मा उभाच पाहत.

तू नेहमीप्रमाणे दिसतेस स्टॉपवर अन्,
तो नेहमीप्रमाणे थिजतो तुलाच पाहत.

बुडतो अनेकवेळा उसळून येत वरती.
लाटांवरील माझ्या प्रतिम‍ा असाच पाहत.

दुष्क‍ाळ वा सुबत्ता होवो स्थिती कशीही.
स्थितप्रज्ञ काळ झाला घटना अश्याच पाहत.

                               ~ अभिजीत काळे.

सावली

***

तिचे रागावणे सुद्धा महत्त्वाचे
तिचे रागावणे जर प्रेम टोकाचे

पुढे घडणार हे माहीत असते पण,
कुठे पक्के असे अंदाज कोणाचे?

हमी देतोस तू सर्रास सगळ्यांना
नपेक्षा राख अपुल्या मोल शब्दाचे

प्रयाणाची अगाऊ सूचना नाही
किती आधांतरी जगणे मनुष्याचे
 
इथे निर्वस्त्र येणे आणि जाणे हे
तुझ्या सांगून जाते मूल्य वस्त्राचे

कधी ते झोंबते तर लाभ कोणाला
गणित कळले कुणाला सांग नशिबाचे 

कुणाचे भागते चमचाभरानेही
कुठे रांजण कमी पडतात सौख्याचे

स्वतःची मांडली आहेस पूजा तू
तुला मग वावडे असणार सत्याचे

जिथे चोहीकडे दिसतात हमरस्ते
तिथे नाही खरे भवितव्य स्वप्नाचे

कड्या-कुलपे असो वा कोट तटबंद्या
कुठुनही पाखरू उडतेच प्राणाचे

तुझी जी सावली दिसते तुला आहे
तिला अस्तित्व म्हण केवळ प्रकाशाचे

                       ~ अभिजीत काळे.
                        १५ ऑगस्ट २०२१.

ध्येय

***

कल्पनेने मारल्या मजला म्हणू
खेळ शब्दांचा तरी, गझला म्हणू

देह झिजवावा असा संकेत जर
कोणत्या कर्मात तो झिजला म्हणू?

पावसाळी मेघ आला आडवा
तेवढ्याने सूर्य का विझला म्हणू?

कागदाला रंग शाईचा जरी
भावनांनी तो असे भिजला म्हणू

अर्थ कळला तर बरे म्हण अन्यथा
शेर जमला तो कुठे? फसला म्हणू

वाद नाही, बोलणी, मसलत म्हणू
फार तर संवाद फिसकटला म्हणू

चालणारा ध्येय अंतिम गाठतो.
संपला! आधीच जो बसला, म्हणू

                    ~ अभिजीत काळे.

लेखणी

***

जे मनी ते स्पष्ट लिहिते लेखणी.
ज्ञानियांचे आर्त असते लेखणी.

लावली टाळ्यास उचलुन जीभ तू!
एवढी तोंडाळ नसते लेखणी.

अंतरीच्या भावनांची मूर्तता,
स्नेह जी अलवार जपते लेखणी.

वेदनांचे कढ विषारी पचविते.
आसवांना आग करते लेखणी.

व्यक्त होते स्वाभिमानी तत्त्वशः
वाकते, हरते न विकते लेखणी.

देखणे बावनकशी लावण्य तू,
की तुझ्या प्रेमात पडते लेखणी.

स्वप्न वा दृष्टीस जे येते जसे,
साग्र ते साद्यंत टिपते लेखणी.

वय किती? वाचाळ अन् आहे किती?
सोड, ती नादान दिसते लेखणी.

आमरण दुर्लक्ष करते पण तरी..
देह जाता, गुण उधळते लेखणी.

               ~ अभिजीत काळे.

डमी

***

स्पर्श अजुनी काळजावर रेशमी
एक संध्याकाळ होती मौसमी

एकदा 'सौभाग्य' तू झालास की
जन्मभर नशिबात उरते  बेगमी

रंग म‍ाझा एकही नाही खरा
खेळलो आयुष्यभर मी पंचमी

एक एका पावलाला जप इथे
की, वळण प्रत्येक आहे जोखमी

पौर्णिमेचे चांदणे नाही जरी
आस इतकी, रोज यावी अष्टमी

सांगतो श्रीकृष्ण भक्तीलक्षणे
भक्त तो, जो सर्वकाळी संयमी

खास नाही, मी कुणी सामान्यसा 
सत्य हे की, मी न कोणाचा डमी

                  ~अभिजीत काळे

भारता

***

आमची अस्मिता संपली भारता. 
देशभक्ती असे आटली भारता. 

पोट भरले तरी खादडी चालते!
तृप्तता त्यापुढे लाजली भारता.

फक्त पैसा हवा नीतिमूल्ये नको.
भ्रष्टता खोलवर पांगली भारता. 

राजकारण इथे स्वार्थकारण असे,
हाव मंबाजिची वाढली भारता. 

कष्ट युवकांस इथल्या नको आळशी. 
लॉटरी पाहिजे लागली भारता. 

भोग, सत्ता, विलासीपणा, लालसा.
भूक यांची कुठे भागली भारता? 

झोपडी बांधता घर मिळाले फुकट.
झोपडी मी पुन्हा बांधली भारता.

                  ~ अभिजीत काळे.

मिडास

***

तेजाचा तर लाख गर्व त्या रस्त्यावरच्या दिव्यास होता!
प्रकाश त्याचा कुठे तरीपण कोणाच्या अंगणास होता?

जेव्हा सोबत तू नसणारा रिक्त किनारा मनास होता. 
दृश्यच अवघे केविलवाणे परिसर सारा उदास होता. 

सोपे नव्हते फुलण्यासंगे मनामनाला सुगंध देणे,
काट्यांचा शेजार बोचरा फुला तुझ्या आसपास होता.

मुकाट होतो सोसत सारे रस्त्यावरती अ‍ालो जेव्ह‍ा,
जाब उलटुनी विच‍ारला मी नव्हता माझ्या घर‍ास होता.

गंतव्याचा नव्हता पत्ता प‍ाय आपले आपण रस्ता,
थकवत गेला मजलदरमजल, भरकटलेला प्रवास होता. 

अप्पलपोटी मिजासखोरी जेव्हा सत्ता मिरवत होती,
प्रगतीचा अंधार गडद अन् लुळा पांगळा विकास होता. 

'वर' मिळूनही अजाण ठरला, सुखात होते दुःख शोधले.
हव्यासाने ठार आंधळा कुणी एक तो मिडास होता.

                                                ~ अभिजीत काळे,
                                                  ४ सप्टेंबर २०२१.

चाफा

***

खळी लाडीक खुललेली गुलाबी लाजर्‍या गाली. 
जणू स्वर्गातली आली कुणीशी अप्सरा खाली!

मला मल्हारवारीने दिले आयुष्य सोनेरी.
तनाची जेजुरी झाली मनाची साजिरी पाली. 

कळेना प्रेम आहे की, असावा राग वा लज्जा?
कशाने एवढी आली तुझ्या गालांवरी लाली?

कुणाला वर्धमानाची कुणाला आम्रपालीची.
स्मृती ती आजही देते जरी वैराण वैशाली. 

ढगांच्या आत कसलेसे असावे दुःख दडलेले. 
जरासे थेंब टपटपता, मृदा गंधासवे न्हाली!

कथा रामायणाची अन्, भरत लक्ष्मण जुने झाले. 
अजुनही भावकी सांगे इथे सुग्रीव अन् वाली. 

कसा जगलो? कधी जगलो? मरत आयुष्य मी जगलो. 
तुझे सान्निध्य असल्याने सुखे थोडीतरी आली. 

कुठे दिसतोस दृष्टीला? तरी नाही म्हणावे का?
तुझे अस्तित्व जाणवते, मला दररोज भवताली.

तुडवला मी चुकुन चाफ‍ा मनाला दुःख झ‍ाले, पण..
नवल त्याचे किती सांगू? सुगंधी पावले झाली. 

                                       ~ अभिजीत काळे.
                                      २८ ऑगस्ट २०२१.