***
लिहावे कोणीतरी.. तुझ्यावर तुझ्यानंतर
वहावे चार अश्रू.. अनावर तुझ्यानंतर
ज्यांच्याकडे न होता भेटावयास अवधी
सांगतात तेच हक्क.. घरावर तुझ्यानंतर
तुझ्या मी सोबतीने जगतोय जे सुखाने
दिवस येतील तेही.. जिवावर तुझ्यानंतर
द्वेष, इर्षा, अहंता तू खाण अवगुणांची
दुसरे कुठे भयंकर.. जनावर तुझ्यानंतर?
मनाभोवती रिमझिम अलवार कालची जी
आज तीच मुसळधार.. मनावर तुझ्यानंतर
तुझा शाहजोगपणा पूर्ण उघड झाल्यावर
कसा भरवसा ठेऊ.. कुणावर तुझ्यानंतर?
आवर्जून निघावी तुझी आठवण म्हणतो
राहो तुझा असर ह्या.. जगावर तुझ्यानंतर
~ अभिजीत काळे
५ ऑगस्ट २०२१.
No comments:
Post a Comment