***
अवघड झाले जगणे येथे मृत्यू तारक दुःखापेक्षा
हाव सुखाची अन् पैशाची भलती दाहक दुःखापेक्षा
हळवा चाफा तुझ्या स्मृतींचा अश्रू शिंपत जपतो आहे
विसरुन जगणे प्रेम आपले मज संहारक दुःखापेक्षा
फार वाटले होते जीवन आनंदाने भरले आहे
भ्रमात असणे नको नको त्या असते बाधक दुःखापेक्षा
ब्रह्मांडाचा रिक्त पसारा बंध न जुळता ग्रहतार्यांचे
मानवास पण ग्रह शंकांचे केवळ मारक दुःखापेक्षा
परदुःखाहुन ज्वलंत असते दुःख दिलेले आप्तजनांनी
स्वार्थासाठी जगणे असते फार भयानक दुःखापेक्षा
समजुन घेणे जमले नाही परस्परांचे मनही ज्यांना
एक राहणे दुःखद त्यांना विश्वविदारक दुःखापेक्षा
जमले नाही आनंदाने जगणे मजला म्हणतिल कोणी
मरण सोहळा माझ्यासाठी जन्मविघातक दुःखापेक्षा
- अभिजीत काळे.
१८ एप्रिल २०२१.
No comments:
Post a Comment