Sunday, 14 June 2020

का?

***

अनेक योनी फिरून सुद्धा जीव उपाशी असतो का?
म्हणून मानव मनाबरोबर स्वैर कुठेही फिरतो का?

तटस्थतेने अंतरातले द्वंद्व स्वतःच्या बघताना
हळवा, कठोर वा चिंतनपर पिंड आपला घडतो का?

अनुभव, प्रचिती अन् धैर्यावर निर्भर असते परिस्थिती     
तो दुःखाचा सागर गिळतो वा डबक्यातच सडतो का?

एक काळजी, एकच चिंता, एकच दुखणे सत‍ावते
प्रत्येकाला पडण्यासाठी एकच धक्का पुरतो का?

मला माहिती हवे जरासे मेल्यानंतरचे जीवन
म्हणून कोणी मरण्याआधी सराव त्याचा करतो का?

किती कळाले जीवन कळते निरिक्षणाने साध्याश्या 
प्रेम, प्रतिक्षा, संकट, आशा यांनी माणूस रडतो का?

असेल ती वा असेल तो ही असो कुणीही अपराधी
कधी स्वतःच्या नजरेमध्ये आपण दोषी ठरतो का?

प्रश्नांचे मोहोळ घेउनी फिरता फिरता एक दिवस
शून्य अवस्था प्राप्त होउनी बुद्ध मनाशी जडतो का?

                                           - अभिजीत काळे.
                                               ९ मार्च २०२०

एकदा

***

शांततेला शब्द हृदयाचा कळावा एकदा
स्पंदनांचा नाद क‍ानी साठवावा एकदा

प्राण म्हणजे काय नक्की समजण्यासाठी तरी
एक ठोका काळजाचापण चुकावा एकदा

उत्तरे जर पाहिजे असतील प्रश्नांची खरी
आरसा अपुल्या मनाला दाखवावा एकदा

जानवे जर विठ्ठलाने घातले आहेच तर
सोवळ्याचा अर्थ त्याने उलगडावा एकदा

शब्द स्पर्शाने कुणी ओळख कशी घ्यावी तुझी   
नेणिवेला निर्गुणाचा लाभ व्हावा एकदा

आजवर दुर्लक्ष तू केलेस कर, मर्जी तुझी
श्वास हा मरण्या अगोदर दरवळावा एकदा

रंगुनी रंगात उपर्‍या रंगलो नाही कधी
जन्मतः जो लाभला तोही निघावा एकदा

                              - अभिजीत काळे.
                                 ६ मार्च २०२०.

निर्वैर

***

मी चांगल्यांचे चांगले ते घेत आहे  
मी चांगल्याला चांगले ते देत आहे  

अंतर्मनी माझ्या नसे वाईट काही
मी सत्पथावर आखल्या रेषेत आहे  

ना बाटवू शकला मला विद्रोह त्यांचा  
ज्ञानीजनांच्या दिव्य मी छायेत आहे 

वाटा विरोधी माणसांच्या वेगळाल्या 
आनंदमय माझ्याच मी मज्जेत आहे

विसरून ते नीतीनियम जगतात जीवन 
मी कृष्ण बुद्धाच्या जुळ्या कक्षेत आहे

ना अडकलो बेड्यांमधे प्रश्नोत्तरांच्या 
एकेक उत्तर अनुभवत रेघेत आहे 

जो तर्कसंगत वाटला नाही मला तो   
माझा विषय त्यांच्या अजुन चर्चेत आहे

प्रत्येकजण धर्मास मानी श्रेष्ठ अपुल्या
वरवर दिसो निरपेक्षता संकेत आहे

आयुष्य जर निर्वैर व्हावे वाटते तर
करुणा दया अन् बंधुता अभिप्रेत आहे

                          - अभिजीत काळे.
                             ४ मार्च २०२०.

Saturday, 13 June 2020

एक दिवस

***

रोज पाहुणी सकाळ येते फुलवायाला एक दिवस
रोज सावळी संध्या येते संपवण्याला एक दिवस

तोलत बसता क्षणाक्षणाला कळते त्यांची अतुल्यता
खडे क्षणांचे असंख्य अपुरे तोलायाला एक दिवस

बालपणीचा काळ सुखाचा कुठे हरवला आता तो
रोज काढतो जुनी आठवण छळावयाला एक दिवस

वर्षाकाठी आनंदाचा असे सोहळा वाढदिवस
वर्षाने तो घटवत जातो मुक्कामाला एक दिवस

कळते बघता वळून मागे वाया गेले कैक दिवस
कधी मिळाला मनासारखे वागायाला एक दिवस

जन्मतिथ्या वा करा जयंत्या पुण्यतिथ्यांची कमी नसे
सुट्ट्या घेता उरेल काहो पण कामाला एक दिवस

आयुष्याला उधळत किंवा फसवत गेले दिवस कसे
पुन्हा मिळावा दिवस बिघडले घडवायाला एक दिवस

ऋतूंस देतो शंभर गुण मी वर्ष ज्यांमुळे हे सजते 
अशक्य अथवा कंठायाला असता झाला एक दिवस

सरून गेल्या दिवसांनीही सुखदुःखांचे दान दिले
पण गेलेला परतुन नाही कधीच आला एक दिवस

अस्तित्वाचा प्रश्न नेहमी भुलवत असतो जगण्याला
हवा स्वतःला वाचवण्याला सावरण्याला एक दिवस

कुणास जमले नाही येथे काळ गतीला थांबविणे
आला, गेला तसाच हाही पहा निघाला एक दिवस

                                           - अभिजीत काळे.
                                              १ मार्च२०२०.

डोह

***

प्रेम कसे ते सांगत होते
ओठ मुक्याने बोलत होते

कोरडवाहू शेत मनाचे
थेंब नभाला मागत होते

स्वार्थ म्हणू की दुर्बलता ती
निर्णय निश्चय तोडत होते

एक खुशी वा एक उदासी 
कौल मनाचा ठरवत होते

कर्ज म्हणू वा शब्द तयांना
कागद कोरे मागत होते

वाट जुनी पण ध्येय नवे घे
शास्त्र नव्याने बोलत होते

सूर्य तळपता शीतलतेने
चंद्रकिरण फैलावत होते

ज्या किरणांची ऊब जगाला
तेच दवाला उडवत होते

मौन तुझे हे वरवर साजुक
आग मनाला लावत होते

वेड कुणाचे त्रास कुणाला
मूल्य फुग्याचे सुचवत होते

खोल नसावा डोह जराही
फोल जिणे जर भासत होते

            - अभिजीत काळे.
            २७ फेब्रुवारी २०२०.

कुठे काय होते?

***

निवडणूक होते कुठे काय होते
फसवणूक होते कुठे काय होते

तिने पाहता गूढ हासून गाली
छळवणूक होते कुठे काय होते

उभा जन्म जातो मिरवण्यात शेवट
मिरवणूक होते कुठे काय होते

असे कायदा कायद्याचाच वैरी
अडवणूक होते कुठे काय होते

चुकीला बरोबर समजत‍ा चुकीची
गिरवणूक होते कुठे काय होते

कुणी काल केली कुणी आज करतो
पिळवणूक होते कुठे काय होते

स्वतःची व्यथा मांडल्याने जगाची
करमणूक होते कुठे काय होते

                     अभिजीत काळे.

वणवण

.***

तडकतील काचा गुल‍ाबी उन्हाने
रुप‍ाला धरावे कसे आरशाने

गुन्हे पाखरांचे अघोरीच होते
तरीही अडवले कुठे कोटर‍ाने

खळी गोड होतीच गालावरी पण
खुलविले तिला लाघवी लाजण्याने

कथा शेवटी पुस्तकाची हसावी
रडावे कशाला सदा माणसाने

कळी लाजली फूल होत‍ाच गाली
खरडल्या हजारो कथा मग जगाने

कटाक्षांत जादू तलम जीवघेणी 
अनाचार केले तुझ्या पाहण्याने

करावा कुणाचा उगा शोध वणवण
मला मी न दिसलो अजुनही खर्‍याने

                        - अभिजीत काळे.
                       ६ फेब्रुवारी २०२०.

स्वर्ग

***

 स्वर्ग सुखाचा जरी मिळाला लाभत नाही
तृषा अधाशी व्यथा उपाशी संपत नाही

प्रेम प्रार्थना, प्रसाद, दैवी कृपा असावी
प्रेमाला का गुन्हा म्हणावे शोभत नाही

हल्ली नाही छळत मनाला तुझी आठवण
तरी विसरलो तुला असेही वाटत नाही

प्रेमामध्ये तुला न काही देऊ शकलो
तू केलेली विवंचना मन विसरत नाही

क्षण दोघांना सहवासाचे किती मिळाले
विरहाचा मी काळ कधीही मोजत नाही

खिंड नव्याने लढवत असतो रोज जरी तो
बाप कधीही दुःख कालचे गिरवत नाही

प्रश्न उद्याचा आज जाचतो आयुष्याला
चिंता म्हणते मी कोणाला सोडत नाही

पोटासाठी कोण जिवाची पर्वा करतो
भूक भीतिला भीक कधीही घालत नाही

मैफलीत मी तुझ्या मुक्याने बसून होतो
सौंदर्याच्या पुढे हुशारी चालत नाही

                           - अभिजीत काळे.
                          ४ फेब्रुवारी २०२०.

निश्चय

***

पाणावताच डोळे येतो म्हणून जातो
'भेटायचे पुन्हा' मी निश्चय करून जातो

बघतो वळून मागे, ओल्या क्षणातले मन
माझा मला नव्याने मी आकळून जातो

डोळ्यांत काय जादू त्याच्या कसे कळावे
नजरानजर घडे तो क्षण लाजवून जातो

म्हणतो मला शहाणा, माझाच आरसा मी
माझ्यातलाच कोणी मज वापरून जातो

आयुष्य भिक्षुकाची कफनी असेल बहुदा
प्रत्येक दिन नव्याने ठिगळे शिवून जातो
                       
ग्रहणात ग्रासण्याची सूर्यास खंत नसते
दिपवून विश्वदृष्टी तो लखलखून जातो

माझी तुझी तशीही ओळख नवीन आहे
भलता नको उमाळा मी अवघडून जातो

                            - अभिजीत काळे.
                           ९ जानेवारी २०२०.

कापसा

***

कुणाला काय सांगू मी कसा आहे कसा होतो?
जराही बदललो नाही जसा आहे तसा होतो?

कितीही कोसळो श्रावण, कितीही आदळो लाटा. 
भुईची धग सरत नाही नव्याने वाफसा होतो. 

गटांच्या राजनीतीचे कुठेही एकमत नाही. 
तरी एकत्र असण्याचा दिखावा छानसा होतो. 

तिच्या आकाश स्वप्नांचे कधी कळणार का त्याला?
तिच्या मार्गातला काटा कसा तो माणसा होतो.

इथे जे वागता तुम्ही तसे येणार वाट्याला. 
खरोखर आपले आपण स्वतःचा आरसा होतो. 

उडा, आकाश हे अवघे तुम्हाला मोकळे आहे. 
इथे जळतात जे केवळ अशांचा कोळसा होतो. 

हृदय माझेच हे किंवा? मला हा प्रश्न का छळतो?
कधी हळवा, मुलायम मी तुझ्यासम कापसा होतो. 

                                         - अभिजीत काळे.
                                         ४ जानेवारी २०२०.

Friday, 12 June 2020

निराकार

न था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता 
डुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता 
                   - मिर्जा असदुल्लाखाँ गालिब.

तुझ्या माझ्यात असणार्‍या मला विसरेन मी केव्हा?
तुझ्या माझ्यात सामायिक तुला शोधेन मी केव्हा?

इथे काहीच नव्हते अन् इथे नसणार काहीही
तरी असणार ते कायम तुला समजेन मी केव्हा?

कुणी अस्पृश्य ना येथे कुणी अश्रद्धही नाही
कह्यातुन भेदभावाच्या परी निसटेन मी केव्हा?

नभी ब्रह्मांडगोळाच्या, अणूच्या केंद्रकामध्ये
असे कोंदाटली उर्जा तुला उमजेन मी केव्हा?

फुलापानाफळांची जी, बियांच्या आतली प्रतिमा
अरूपाच्या रुपाची 'बी', उरी उगवेन मी केव्हा?
    
कधीचा झोपलो आहे इथे गुंगीत मायावी
भवाच्या मोहनिद्रेतून या जागेन मी केव्हा?

भ्रमाचा भोपळा नाही जरी आकार विश्वाचा
निराकारात ब्रह्माच्या तुला गवसेन मी केव्हा?

                         - अभिजीत काळे.
                         १७ डिसेंबर २०१९

वेळ

***

या गाडीने मला यायचे सांगत थोडी बसते ?
वेळ कधी का येण्या आधी मुहूर्त कुठला बघते?

कराल गंमत, बसाल भोगत, कर्माचे फळ तुमच्या. 
मिटून डोळे रहा तुम्ही वा करा फुकाच्या गमजा
बगळ्यासम ती ध्यान लावुनी सावज हेरत असते.
वेळ कधी का येण्या आधी मुहूर्त कुठला बघते?

अडवायाला तिला कुणाची माय व्यायली आहे.
तिच्या आखल्या रस्त्यावरती प्रवास तुमचा आहे.
तळहाताच्या रेघेलाही हसून नियती डसते.
वेळ कधी का येण्या आधी मुहूर्त कुठला बघते?

जीवनगाणे, रडगाणे वा आनंदाचे गाणे
गात रहावे कुणास चुकले येणे आणिक जाणे.
आयुष्याच्या सोबत गाणे हसते अथवा रडते.
वेळ कधी का येण्या आधी मुहूर्त कुठला बघते?

गांभिर्याने पहाल तर हे कळून येते जीवन
कुठे कुंजवन, कुठे तपोवन, मरुस्थळी वा वणवण.
आयुष्याला सुखद अचानक क्षण ती बहाल करते.
वेळ कधी का येण्या आधी मुहूर्त कुठला बघते?

कर्मफळांचे गणित सुटले कुणास केंव्हा सांगा?
वाटेवरती सोप्यासुद्धा अवचित येतो खड्डा 
ज्याचे त्याचे संचित सगळा हिशोब ठेवत असते. 
वेळ कधी का येण्या आधी मुहूर्त कुठला बघते?

                                     - अभिजीत काळे.
                                   १२ डिसेंबर २०१९.

निरागस...

***

याच साठी ते मला म्हटले समंजस. 
फक्त सोसत राहिलो, धरला न आकस.

आठवत बसतो सुगीचे ते दिवस मी. 
तो हिवाळा, चूल, शेकोटी नि खरवस.

मित्र आणिक बायको या दोन व्यक्ती.
पाहिल्या कोणी चुलत, सावत्र, मावस?

चोरुनी नेलेस ना सर्वस्व माझे?
समजलो होतो तुला मी.. फार सालस!

खाटकाला ते कसे विकलेस करडू?
काल तू म्हटलेस ज्याला.. खूप लोभस!

तू कितीही सत्यवादी म्हण स्वतःला. 
बोलतो आहेस तू खोटे निखालस. 

काल जे केलेस तुकडे तू मनाचे,
आज त्यांचे ऐक दुखणे, ये जवळ बस.

ती खरा श्रृंगार तारुण्यात करते.
वासनेला काय कळते बाल्य गोंडस?

खेळ का केलास आयुष्या स्वतःचा?
मी निरागस, तू निरागस, ती निरागस!

                          - अभिजीत काळे.
                          ९ डिसेंबर २०१९.

अनिवार्य

***

आल्याप्रमाणे जायला राजीच नसतो जीव हा?
संपायचे ठरवूनही कोठे अडकतो जीव हा?

केलास माझा खेळ तू अन् खांबसूत्री बाहुले.
चक्रातुनी सुटण्यास या आता तरसतो जीव हा.

मी फेडले देणे तुझे तू सोड आता बंधने.
ऋण फेडुनी देहा तुझ्या ताब्यात असतो जीव हा. 

मृतप्राय जर जगणे इथे, त्याला म्हणावे का जिणे?
जगण्यापरी मरणास की सन्मित्र करतो जीव हा. 

उपकार त्यांचे फार जे आजन्म छळ करती तुझा
त्यांच्यामुळे तर विश्व हे सोडून निघतो जीव हा.

आयुष्यभर जळतोस तू सूर्याप्रमाणे माणसा. 
अंधार मृत्यूच्या सवे होऊन जळतो जीव हा.

अनिवार्य असते जीवनी सुखदुःख भोगत राहणे.
मोहात गुंतत जाउनी अत्यंत फसतो जीव हा. 

                                       - अभिजीत काळे.
                                    २८ ऑक्टोबर २०१९.

आठवतो का?

***

आठवतो का पहिला पाऊस ?
            ..आठवते का पहिली हुरहुर ?
आठवती का भिजलेले क्षण ?
             ..चिंब मनांची ओली थरथर ?
आठवतो का बहर सुखाचा, 
             ..गालांवरची मिश्कील खोडी ?
आठवते का साखरभरली 
             ..अधरभेटीची अवीट गोडी ?
आठवतो का अजून तुजला 
             ..तो आंब्याचा मोहोर राणी ?
आठवती का कानी माझ्या 
             ..तू गुणगुणली मंजुळ गाणी?
आठवतो का गोड शहारा!
              ..सर्वांगातून शिरशिरणारा ?
आठवतो का अधीर वारा 
              ..गूढ, अनामिक शिवशिवणारा ?
आठवते का सलज्ज किणकिण, 
               ..तुझ्या बिल्वरी साजचुड्याची ?
आठवते का गंधीत तगमग 
                ..फुलाप्रमाणे दरवळण्याची ?

     नकोत आठव कातरवेळी 
                    गालांवरती ओघळणारे.
     नकळत फसवून मनास हळव्या
                  .. खुळ्या जीवाला छळणारे.

                                       - अभिजीत काळे.
                                      ३ ऑक्टोबर २०१९.

अनावर

***

हे मना सांभाळ नाते जोडल्यानंतर.. 
व्यर्थ शिवणे एकदा ते फाटल्यानंतर.

कुंडली ठेऊ नका कोणापुढे केव्हा..
चांगले-वाईट ठरते मांडल्यानंतर.

चौघडा-सनई नका हो वाजवू लवकर.. 
वाजते आयुष्य दोन्ही वाजल्यानंतर. 

द्रव्य अथवा द्रव असो सांडायचे नाही.. 
 वेचणे जमले कुणाला..? सांडल्यानंतर. 

केवड्याने वार केला मोगर्‍यावरती.. 
कर्दळीने गंधगाथा गायल्यानंतर!

पाहतो आहेस तू रोखून का शिखरा?
संपते स्वारस्य; माथा गाठल्यानंतर.

खुळखुळत हाती असावा नेहमी पैसा..
ओळखी मिटतात नोटा संपल्यानंतर. 

रामही फसला म्हणे कांचनमृगाला त्या!
बायको हट्टास नाहक पेटल्यानंतर.

एकटा आहे जरी मी..  ते बरे आहे. 
एकटेपण फार छळते.. गाजल्यानंतर.

कोण थांबवणार मग घटनेस घडणार्‍या?
सावळ्या प्रेमात दोघे.. गुंतल्यानंतर. 

मी किती होतो अनावर.. त्या क्षणासाठी
भेट पहिली संपली! ती.. लाजल्यानंतर. 

                              - अभिजीत काळे.
                             २८ सप्टेंबर २०१९.

केवडा

***

जरा दूर अंबर भरू लागलेले, इथे कोरड्या या नभाच्या कडा. 
तिथे आसवांचे झरे वाहती अन् इथे त्या धगीचा मनाला तडा.

पुन्हा शांतवूया मनातील लाटा, पुन्हा एकदा खेळ मांडू नवा,
मनाने मनावर कुठे घेतले पण! पुन्हा पाय पडला तुझा वाकडा.

स्मृतींची त्सुनामी उफाळून येता, सतवतो तुझा चेहरा हासरा. 
पुन्हा लाट उध्वस्त हृदयात शिरते, भिजवते पुन्हा पापण्य‍ांच्या कडा.

पिढी दर पिढी जर समज वाढते तर.. दुरावत कशी चालली माणसे?
हवी स्पेस म्हणुनी वगळला नव्यांनी जुना जाणता एकतेचा धडा.

नयन पूर्ण होतेच पाणावलेले तिच्यापासुनी दूर होता क्षणी.
कृप‍ा पावसाची; कळालाच नाही, तिला आसवांचा लढा भाबडा.

तिच्या चार शब्दांस आसूसलेले उभे प्राण होते असा काळ तो.
अता वाटती स्वप्नवत सर्व घटना, खुळ्या कल्पनांचा खरा उलगडा.

जशी खोल श्वासांमधे ती उतरते तसा गंध रक्तात रुजतो तिचा,
सुगंधीत रंगापुढे कामनेच्या, फिका सोनचाफा फिका केवडा.

                                            - अभिजीत काळे.
                                            २५ सप्टेंबर २०१९.

आशिशिर

***

मी ढगांना परतताना पाहिले. 
अन् उन्हाला बरसताना पाहिले. 

'माणसाचे संपले माणूसपण',
बेरक्यांना बोलताना पाहिले. 

कोवळे दिसते निरागस वय तुझे,
त्या उलट तू वागताना पाहिले. 

हे तुझे आकाश सरडा वाटते
रंग त्याचे बदलताना पाहिले. 

पिंजरे रंगीत, मोहक सापळे
पाखरू भंजाळत‍ाना पाहिले. 

पाडवा, दसरा, दिवाळी, होलिका
वर्ष नकळत संपताना पाहिले. 

 सार्‍या ऋतूंचे सोहळे
झाडभर मोहोरताना पाहिले. 

                   - अभिजीत काळे.
                  २७ ऑगस्ट २०१९.

तारतम्य

***

तारतम्य असते का भूक पेटल्यानंतर?
देवधर्म आठवतो भूक भागल्यानंतर.

का सशस्त्र क्रांतीचा मार्ग ठरविता वेडा 
संगरात शहिदांनी रक्त सांडल्यानंतर

जोवरी मिळत नाही तोवरी अधाशी मी 
मूल्य नष्ट वस्तूचे सौख्य लाभल्यानंतर

भोगतात उपरेपण भारतात सावरकर
अंदमान बेटांवर क्रौर्य सोसल्यानंतर

जेवढा तुझा आहे तेवढाच त्यांचाही
हक्क याच मातीवर जन्म घेतल्यानंतर

कोणत्या विचारांचा हा असेल अनुयायी
तर्क तो अनाठायी शेर वाचल्यानंतर

चांदरात त्यांच्याही जीवनास रंगवते
दिव्यचक्षु दोनाचे चार जाहल्यानंतर

                         - अभिजीत काळे.
                         २१ ऑगस्ट २०१९.

तेजसूर्य...

***

तेजसूर्य असताना काजळीत सडतो मी
कैकजन्म मृत्यूच्या काळजीत जळतो मी

शब्दहीन मौनाच्या पोकळीत विरतो मी
रंग गंध नसलेले फूल होत जगतो मी

संपताच हिरवाई पानपान ओघळते
भोगण्यास दुःखाला एकटाच उरतो मी

ह्हो, तुझ्या प्रसादाने लाभले जरी असले
आपुल्याच कर्माने निर्मिलेय म्हणतो मी

सर्वनाश होताना सोडती मला सारे
वीट वीट ढासळते अन् बघ्याच ठरतो मी

जे मला मिळाले ते लाभणार सर्वांना
एवढे समजल्यावर फार आत कुढतो मी

डोह खोल चिंतेचा अन् मती उथळ आहे
सागरात प्रश्नांच्या खोलखोल बुडतो मी

                            - अभिजीत काळे.
                             २१ ऑगस्ट २०१९.

जखमा

***

विश्वासघात झाला सलतात हाय जखमा!
रक्तात रंगलेल्या भरणार काय जखमा?
केलीत फाळणीने शकले अनेक रंगी!
हा भंगला नकाशा, ह्या खंडप्राय जखमा!!!

...
...

घायाळ सावल्यांच्या भरतील काय जखमा?
जगले सुखात त्यांना कळतील काय जखमा?

नाहीच औषधाला त्यांच्या उजेड नशिबी.
अंधार कोठड्यांना सलतील काय जखमा?

समशेर दोन हाती रक्ताळली शरीरे!
तोफा निनादल्यावर उरतील काय जखमा?

गेलीस सोडुनी तू अर्ध्यावरी मुलांना
झालो अनाथ आई, भरतील काय जखमा?

लेऊन लक्तरे ते जीवन मजेत जगले
हसऱ्या कलंदरांना छळतील काय जखमा?

                                  - अभिजीत काळे.
                                  २९ जुलै २०१९.

जंगले

***

चांगले वागायचेपण जाणतो मी... चांगले!
वागलो जेंव्हा तसे... माझ्यावरी ते शेकले.
                          
उसवला एकेक टाका... संपले नाते पुढे.
वांझ चर्चा चावडीवर फाडले की फाटले?

पोळली गेली कितीदा अन् कितीदा चावली. 
संपले नाहीत अजुनी... या जिभेचे चोचले.

"जे मला नाही मिळाले, मी तुला देईल ते."
पालकांच्या या कृतीने वृक्ष भावी खुंटले.

कोणते संस्कार होते मानवी त्यांच्यावरी?
अर्भकाला काल ज्यांनी उकिरड्यावर फेकले!

"पोसणारा कोण आहे?" कमवणारा बोलला.
कमवणार्‍याला कळेना, त्यास कोणी पोसले.

झाकली गेली फुले... पण गंध नाही कोंडला. 
आज त्यांच्या अत्तराने श्वास माझे कोंडले. 
                    
पेटता अंधार जळते चांगलेही त्या सवे.
घासता फांदीस फांदी.. खाक होती जंगले.

गंधवेडाने चिरडल्या जर कुणी कोमल कळ्या.
छळ किती करतील त्याचा मग सुगंधी पावले?

                              - अभिजीत काळे.
                                २४ जुलै २०१९.

कीव येते.....

***

माणसाच्या मागण्यांची कीव येते. 
लाळघोट्या वासनांची कीव येते. 

आंधळे मातृत्व होते कौरवांचे. 
बोलती त्या डोळसांची कीव येते.

जिद्द कुठुनी आणते लढण्यास मुंगी!
जीवघेण्या वादळांची कीव येते. 

ओल मायेची कळाली पेटल्यावर. 
वाळलेल्या लाकडांची कीव येते. 

खेळ करते इश्कबाजीचा जवानी. 
खेळ झाल्या प्रेमिकांची कीव येते. 

ऐकली मी पाखरांची काल किलबिल. 
लंगड्या, हरल्या मनांची कीव येते.

जो मनोव्यापार करते नीच बुद्धी
त्या अधाशी कामनांची कीव येते.

                         -अभिजीत काळे.
                          ३० जून २०१९.

भीक

***

मागतो मी तोवरी ते ठीक असते
अन्य कोणी मागता ती भीक असते

पाहिजे तर उलगडावी पसरवावी
तत्त्व ज्ञानाची घडी बारीक असते

वर्गवारी, शब्दछल, पांडित्य करते
बुद्धिमत्ता बेरकी खाटीक असते

विकृतीचे तण लगेचच वाढणारे
सुकृतीला मन तुझे नापीक असते

दाद नाही, भाव नाही जास्त त्याला.
पिकवुनी निष्फळ खयाली पीक असते

                         -अभिजीत काळे.
                          २७ जून २०१९.

Thursday, 11 June 2020

तरळणार मी.... !

***
तुझ्या आर्द्रवेल्हाळ श्वासांत मिसळत सहज अंतरंगी उतरणार मी. 
सुखाच्या क्षणांच्या स्मृती बाष्प होता, तुझ्या आर्त नयनी तरळणार मी!

जरी वेगळा मी तुझ्याहून आहे, तुझ्या सारखा होत जाणार मी. 
तुला पाहिल्यावर, तुला जाणल्यावर, कसा काय माझ्यात उरणार मी? 

खगाला नभाची, सरीला धरेची, कुणाला कुणाची कळे ओढ ती?
कशी नाळ जुळते? कसे बंध तुटती? कसा प्राक्तनाला समजणार मी?

उचल पापणी, फेक जळत्या शरांना, भले दग्ध कर तू हृदय लाखदा!
विखारी तुझ्या पाहण्याने दिलेली, जखम आवडीने मिरवणार मी.

किती थोर आले नि हरवून गेले, पसार्‍यामधे गूढ विश्वातल्या.
कसा मर्त्य बिंदू निरर्थक स्मरावा? कुणाच्या हिशोबात असणार मी?

जिथे ओढ असते तिथे दुःख येते, असे बोलला काय न्यूटन कुठे?
प्रितीचा नियम फार दुखरा तरीही, प्रिये आवडीने गिरवणार मी.

ढगाने विजेची शपथ घेतली की, धरेला विसरणार नाही कधी.
विरहकोरडा तापता ग्रिष्म छळता मृगाच्या सरींनी बरसणार मी.

                                                   - अभिजीत काळे.
                                                      २८ जून २०१९.

Monday, 1 June 2020

केशर..!

***

नेहमी दावते नवे गाजर.
वेळ करतेय का तुझा वापर?

लाट ओढून तो परत घेतो!
थेंबही त्यागतो कुठे सागर?

वेचला घाम दाम मिळवाया!
प्रेम देण्यासही जरा पाझर...

तळ दिसू लागलाय डोळ्यांना,
हात खोलात का तुझा? आवर.

एक शोधेन घाव ती म्हणते,
मी इथे वार मोजले शंभर.

होत जाती चुकुन चुका काही..
तोल जाणार माणसा सावर.

ओळ माझी तुझ्या सुरांवर गा.
वेळ पण नेहमी हवी कातर.

शोध घेशील मग कुठे माझा..
हरवलो आत मी तुझ्या जर.. तर?

फूल मातीतुनी उमललेले,
मोल पण मागते किती केशर..!

                    - अभिजीत काळे.
                     ६ डिसेंबर २०१९.

Sunday, 31 May 2020

पिंजर

***

शुभ्र भाळास लाभले पिंजर.
श्वास, रोमांच देहभर मंथर.

बोलली ती जरी न काहीही...
वाच डोळ्यांतले मुके अक्षर.

ती सती, पार्वती असो गंगा,
व्हायचा पण तुझा कधी शंकर?

आतला माजला कली आहे. 
सद्गुणांचे सदैव अवडंबर.

शौर्य, साचार शील गवसेना,
संपले त्यांसवे म्हणे द्वापर!

रंगमंचावरील नाट्याचा...
अर्थ रंगीत पण फिकी झालर. 

हात हातात घे तिचा आधी. 
कुंडली पत्रिका बघू नंतर.

              - अभिजीत काळे.
               ४ नोव्हेंबर २०१९.

Thursday, 28 May 2020

नरनारी

***

क्षण सौख्याचे सरून जाता दुःखच उरते माघारी. 
दृष्टी असुनी समोर दिसते भविष्य भीषण अंधारी. 

जीवनभर मी चढवत बसलो इमले सुंदर इमल्यांवर.
माझी नंतर राखच झाली वार्‍यावरती उडणारी. 

मृत्यूनंतर 'मी'पण विरते अज्ञाताच्या गुहेमधे. 
अद्वैताच्या विवरामध्ये प्रकाश नसतो संसारी. 

चार अक्षरी मशागतींनी काव्याचेही रान फुले
शब्दांनी पण भागत नाही भूक निरंतर छळणारी

समोर दिसता काळ उडवितो भल्याभल्यांची भंबेरी. 
करोत गमजा लाख कुणीही आयुष्याच्या बाजारी. 

जमीन, पैसा, स्थावर जंगम, कमविलेस तू फार इथे!
ऋणास त्याच्या पुरेल कसली नश्वरतेची नादारी. 

दोरीवरती पोर चालते... बाप ढोलकी वाजवतो.
नशिबी यावी शाळा कुठुनी अा,आ,ई,ई म्हणणारी?

हिरे, माणके, पाचू, मोती, घाव मनावर श्रीमंती. 
अभिमानाने मिरवत आहे, दुःख दिलेले जरतारी. 

फास घेउनी जीव दिल्यावर तो तर सुटला जिवानिशी . 
त्याच्यानंतर अनाथ झाली भूक उपाशी मरणारी.

गादी लागत नाही असता हात उशाला बापाचा.
स्वप्नामध्ये पर्‍या दाविती अद्भुत न्यारी रहदारी.

लिंग भिन्नता, काम वासना, सगळ्या चर्चा सौख्याच्या.
देह सोडुनी गेले त्यांची इथली ओळख 'नरनारी'.

                                      - अभिजीत काळे.
                                      २४ जून २०१९.

शुद्धता

***

शुद्धता पापी मना गंगेत नाही!
पाप विरघळते, 'खरा' संकेत नाही!

बी-बियाणे, खर्च, किंमत, पीकपाणी.
भाव मिळता, फास मग तो घेत नाही.

केवढा केलास गोळा स्वार्थ निष्फळ
येथुनी कोणीच काही नेत नाही.

गूढ, मायाजाल, गर्ता, ब्लॅक मॅजिक.
जो तुझ्या डोळ्यांत बुडला; येत नाही !

मूल्य मी शिकलोय जेथे जीवनाचे
ते मिळत का आज त्या शाळेत नाही?

टोमणे, खिल्ली उडवणे, मानहानी
हे बरे की... मी तिथे चर्चेत नाही!

जाळता काटे, सवे जळती फुलेही
आळ सूर्यावर कुणी का घेत नाही?

चोच, दाणे, पोटपाणी, चार पैसे
कोण सांगा ना इथे चिंतेत नाही?

ये कधीही; भेट घे बिनधास्त मित्रा
ठरवुनी जमणार कुठला बेत नाही!

                      - अभिजीत काळे.
                        १० जून २०१९.

प्रार्थना

***



एक कर ही फाटकी झोळी तरी बदलून दे. 
अन्यथा मज सांडलेले धैर्य तू बांधून दे. 

उगवत्या दिवसास माझे मागणे हे नेहमी,
दोन क्षण आनंद माझ्या अंगणी आणून दे.

घोर मोठा जीवनाचा, रात्रभर मी जागतो. 
हरवलेली झोप माझी तू मला शोधून दे.

पावसा परतून येणे बघ तुला जमतेय का?
ओल डोळ्यांची पुसोनी चोच ओलावून दे.

स्तब्ध येथेही हवा अन् स्तब्ध तेथेही हवा,
ऊब या श्वासांतली श्वासांत त्या मिसळून दे.

द्यायचे नाहीच जगुनी जर सुखाने जीवनी,
दुःख दे वा कष्ट जे देशील अफलातून दे. 

पोचली जर प्रार्थना ही ईश्वरा कानी तुझ्या,
ज्यास जे काही हवे ते सर्व तू मिळवून दे. 

                            - अभिजीत काळे.
                                २६ मे २०१९.

आपण दोघे

***



उभे नदीच्या दोन तिरांवर दोघे आपण. 
ठाम विरोधी, दोन ग्रहांवर दोघे आपण.

आभासी तो अक्ष दुवा जो अपुल्यामधला
अढळ तरीही दोन ध्रुवांवर दोघे आपण  

तर्क लढवतो, खरे नि खोटे उगळत बसतो. 
राम, कृष्ण अन् बुद्ध तिघांवर दोघे आपण. 

सत्य, अहिंसा, भोग, लालसा लाख मनोरे. 
आपआपल्या घट्ट मतांवर दोघे आपण. 

काळ लोटला भेट होउनी उभय मनांची
फूल, दवावर, मोरपिसांवर दोघे आपण. 
(पुस्तकातल्या मोरपीसांवर दोघे आपण.)

तुझ्यात मी अन् माझ्यामध्ये तू वसलेला.
हल्ले करतो परस्परांवर दोघे आपण. 

तू पाण्याचा सागर अन् मी व्यर्थ बुडबुडा.
अस्तित्वाच्या भिन्न स्तरांवर दोघे आपण. 

                            - अभिजीत काळे.
                              २ एप्रिल २०१९.

'सल विचारू!

***

अर्ध्यात भंगलेल्या स्वप्नास सल विचारू!
डोळ्यांत साठलेल्या पाण्यास सल विचारू!

जीवन सरून गेले लढण्यात प्राक्तनाशी.
दुर्दैव झेललेल्या जगण्यास सल विचारू!

न्यायालयात सडला दावा पिढ्यापिढ्यांचा
वैरात पेटलेल्या नात्यास सल विचारू!

फसव्या प्रलोभनांचे मोहक किती पिसारे. 
चकव्यात गुंतलेल्या तरुणास सल विचारू!

छळतेय माणसाला त्याची कशी प्रजाती?
कष्टांत गांजलेल्या गरिबास सल विचारू! 

बेधुंद अत्तराच्या गंधात नाहताना,
सर्वस्व वाहिलेल्या पुष्पास सल विचारू!

माजात नाचण्यातच तारुण्य व्यर्थ गेले.
आयुष्य सांडलेल्या वृद्धास सल विचारू! 

गेली जरी कितीही मोठ्या घरात मुलगी,
काळीज फाटलेल्या बापास सल विचारू!

स्वातंत्र्य लाभले पण किंमत कुणास त्याची?
प्राणास वेचलेल्या शहिदास सल विचारू! 

आवर्षणे भलेही झेलेल ते खुशीने,
मालक गमावलेल्या शेतास सल विचारू!

भांगामधील कुंकू पुरले न जीवनाला,
सौभाग्य संपलेल्या भाळास सल विचारू!

मातापित्याविना जे जगते अनाथ जीवन,
वात्सल्य हरवलेल्या बाळास सल विचारू!

सत्ता, जमीन, खुर्ची, वाडा, रुढी, घराणे. 
निर्वंश जाहलेल्या रुधिरास सल विचारू! 

                               - अभिजीत काळे.
                              - २८ मार्च २०१९.

हिंदोळा

***

दोन बिंदू जोडण्या झुलतोय हिंदोळा. 
जीवनाला एक झोका म्हणतोय हिंदोळा. 

रंगभरल्या वास्तवाचे सत्य शोधाया,
पांढर्‍या काळ्यामधे हलतोय हिंदोळा.

पाकळ्या गळता फुलाला खेद ना काही,
बीज ते फळ पूर्णता करतोय हिंदोळा. 

वेळ येते, काळ जातो, चक्र अव्याहत,
वर्तमानाला कुठे कळतोय हिंदोळा. 

एकदा पाहून जा दुर्भाग्य माझे तू.
आजही येथे रिता सलतोय हिंदोळा.

राहिली आहे उधारी भूतकाळाची. 
फेडण्य‍ाला वाट हा बघतोय हिंदोळा.

झाकुनी डोळे तुम्ही चालालही लेको,
जन्म मृत्यूचा कुठे टळतोय हिंदोळा. 

                     - अभिजीत काळे.
                     २५ मार्च २०१९.

मी चंद्र स्पर्शिला होता

शब्दांनी कवितेला स्पर्श केला कवितेने चंद्राला.........

***

क्षितिजाच्या गालावरचा मी चंद्र स्पर्शिला होता
नवतीच्या भाळावरचा मी चंद्र स्पर्शिला होता

एकांती अनुभवताना अलवार रुपेरी किरणे
चंदेरी माळावरचा मी चंद्र स्पर्शिला होता

खुलवीत अर्थ सौख्याचे नाचले शब्द कवितेचे
प्रीतीच्या वर्खावरचा मी चंद्र स्पर्शिला होता

भाराने दवबिंदूंच्या प्राजक्तसडे कोसळता
दहिवरल्या पानावरचा मी चंद्र स्पर्शिला होता

मन मनात गुंतत जाता नभ मनात उतरत येता
मनिषेच्या पंखावरचा मी चंद्र स्पर्शिला होता

                     - अभिजीत काळे.
                    २३ मार्च २०१९.

रेषा

***

आमची आम्हीच रेषा आखलेली, आमची आम्हीच रेषा खोडलेली. 
ती पुरेशी स्पष्टही नाहीच आता अन् कुणीही पूर्ण नाही मिटवलेली.

मार्ग जातो दूर तेथे, संशयाचे का धुके आहे फिरंगी साठलेले?
कोणत्या शिखरा करू मी आपुलेसे, जर धुक्याने सर्व शिखरे वेढलेली?
             
भावनांचे घोळ सारे, त्यात बुद्धी तर्कवादी, कोणते अनुमान काढू?
नेणत्यांच्या दंगलींना जाणत्यांच्या बेदिलीची फूस मोठी लाभलेली.

जाळते संदर्भ सारे शांततेचे बेधडक जी, कोठुनी येते हवा ती?
कोणत्या बुद्धी प्रमेयांनी  फुटीची मतलबीची बीजगणिते मांडलेली?

आपुले म्हणणे खरे हे दावण्याला पातळी सोडून देते भ्रष्ट बुद्धी
खोडण्या इतिहास इथल्या वैभवाचा, खेकड्य‍ांची कोण स्पर्धा लागलेली

             - अभिजीत काळे
              १२ मार्च २०१९.

आमरण

***

बोचते कुठेतरी कुणास अंतरात ते.
आपल्यात वाहतेय रक्त माकडात ते!

हे कसे? नि ते कसे? मती मला विचारते.
प्रश्न मग अनुत्तरित मनास पोळतात ते...

कोणत्या जनावरात काय पाहिल्या बला ?
काम, क्रोध, लोभ, मोह फक्त माणसात ते!

दे मिठी; भले पुन्हा हयातभर विरह छळो...
दुःख गोड वाटते...मजाच भोगण्यात ते.

चुंबनात दंशतात ओठ यौवनात जे,
आमरण सुखावतात ओठ आठवात ते.

                 -अभिजीत काळे.
                १९ फेब्रुवारी २०१६.

वृत्तांत

***

वृत्तांत काय सांगू भेटीतला सखीच्या 
केसांत मोगराही घामेजला सखीच्या
                             
लय, ताल, काम, मदिरा काया भरून वाहे
मनमोर पैंजणाला नादावला सखीच्या

आवर म्हणून त्याला जमले न आवराया
हातातला चुडाही भांबावला सखीच्या

चंद्रास लाज आली ओशाळला मनी तो
मुखड्यास पाहताना कोमेजला सखीच्या

शृंगार साज ल्याली मोहक छबी बिलोरी 
प्रेमात आरसाही आसावला सखीच्या

ओथंबली सुखाने येता मिठीत अलगद 
रंध्रांमधून चाफा गंधाळला सखीच्या

गुंफण मनामनाची देहापल्याड गेली
होऊन श्वास रमलो श्वासांतला सखीच्या

                 - अभिजीत काळे.
                १४ फेब्रुवारी २०१९.

शिरकाव

***

गाभूळल्या क्षणाचा शिरकाव होत जातो. 
श्वासांत अत्तराचा शिरकाव होत जातो. 

गालावरी फिरवता तू मोरपीस अलगद,
रोमांतुनी ज्वराचा शिरकाव होत जातो. 

मी वाट पाहते अन् येणे तुझे न होता,
स्वप्नात वास्तवाचा शिरकाव होत जातो. 

डसता सतेज कांती दवल्यायल्या फुलाची,
देहात चांदण्याचा शिरकाव होत जातो. 

पाहू तुझ्याकडे की; ना पाहताच जाऊ?
डोळ्यांत विस्मयाचा शिरकाव होत जातो.

                               -अभिजीत काळे.
                              ८ फेब्रुवारी २०१९.

आयुष्यरेषा

***

आयुष्यरेषा पुसावी वाटते?
का आत्महत्या करावी वाटते?

बेड्यांपरी कामनांच्या शृंखला,
त्यांची गुलामी सुटावी वाटते.

ध्यानस्थ बगळा समाधी बेरकी,
चोचीत संधी फसावी वाटते. 

माझ्यात कोणी स्वतःला भेटतो,
मग शांतता पण प्रभावी वाटते. 

केल्या चुकांची पुन्हा कर उजळणी. 
बघताच प्रगती दिसावी वाटते. 

मी का उगीचच बियाणे पेरतो? 
खड्ड्यांत माती भरावी वाटते. 

वार्‍याप्रमाणे बदलतो जो दिशा,
त्याची दशा पालटावी वाटते. 

तो शाश्वती वेदनेची मागतो. 
खात्री सुखाची नसावी वाटते.

अश्रू कधीचा दरवळू पाहतो. 
अतृप्त इच्छा असावी वाटते.

             - अभिजीत काळे.
            ६ फेब्रुवारी २०१९.

नाते

***

दुखवले खूप नात्याने
शिकवले खूप नात्याने

सुखी चिरवस्त्र जगण्याचे,
उसवले खूप नात्याने

उकळत्या घेउनी शंका
शिजवले खूप नात्याने

धनाला पालवी फुटली
मिरवले खूप नात्याने

रिते आयुष्य होता हे,
उडवले खूप नात्याने

    - अभिजीत काळे.
   ५ फेब्रुवारी २०१९.

स्वप्ने

***

हसतात स्वप्ने, फसतात स्वप्ने,
स्वप्नात स्वप्ने बघतात स्वप्ने.

प्रेमात वेड्या पडतात स्वप्ने. 
मोहक भ्रमावर जडतात स्वप्ने. 

आळस किती तो? निजतात स्वप्ने. 
चिडताच आई; उठतात स्वप्ने. 

सामर्थ्य दुबळ्या पंखात भरुनी,
गगनी यशाच्या उडतात स्वप्ने. 

वेड्या मनाला लावून आशा,
विपरीत शेवट करतात स्वप्ने.

रात्रंदिवस जो स्वप्नात रमतो,
डोक्यात त्याच्या सडतात स्वप्ने.

पाहून स्वप्ने, पाऊल मागे, 
त्यांचीच केवळ विरतात स्वप्ने. 

फांदीवरी जो एका न राही,
त्या मर्कटाला नडतात स्वप्ने. 

अडतात स्वप्ने वाटेत अर्ध्या,
तेव्हा खरोखर रडतात स्वप्ने.

श्वासात निष्ठा ध्यासात उर्जा
धरता, धरेवर फळतात स्वप्ने.

कोणी ललाटी नाहीच लिहिली. 
आधीच ठरली नसतात स्वप्ने.

दारात संधी येताच पकडा,
नसता पुढे मग.. पळतात स्वप्ने.

आयुष्य देता ओवाळणीला,
सर्वांगसुंदर घडतात स्वप्ने.

             - अभीजीत काळे.
           ३१ जानेवारी २०१९.

उर्जा

***

मी आभाळाची उर्जा घेऊन धरेवर रुजलो
उन वारा पाणी प्राशत फुललो फळलो दरवळलो

दुःख वेदना गरिबीला असह्य उपासमारीला
पाहून मनातून हाललो तळमळलो गहिवरलो

जीवनवेलीवरती नित-नूतनतेने अंकुरलो
क्षण आनंदाचे फुलवत पाखरांसवे गुणगुणलो

मी डोंगरमाथ्यावरचा गडवारा  उरात भरुनी
छातीवर तटबुरुजांना मिरवीत सुखाने जगलो

संजीवक कैवल्याला देहाचे कोंदण सजवत,
शापित यक्षासम अवघ्या जन्मांचे वर्तुळ फिरलो.

मी आलो होतो केवळ शोधाया परमेशाला
सर्वात्मक तो आकळता मी रिमझिमलो परिमळलो

            - अभिजीत काळे.
            २६ जाने २०१९.

भोपळा

***

कुणाच्या सारखा नाही, जरा मी वेगळा आहे. 
खुळ्या छायेत रमलेला उन्हाचा सोहळा आहे.

मला नाही तिची चिंता तरी माझ्या सवे असते.
कळे ना सावलीला या कसा माझा लळा आहे?

जिवाचे पाखरू उडुनी नभाच्या पार गेल्य‍ावर!
कुणाचे पोट भरतो हा विधीचा कावळ‍ा आहे?

दिले स्वातंत्र्य घटनेने तुला सत्ता निवडण्याचे.
तुझ्या हातामधे मित्रा तुझा आता गळा आहे.
               
तृषेने ओठ आक्रसले, भुकेने पोट आकसले.
पितर पापी असावे का? कुपोषित कोवळा आहे!      

तुझे हे तोकडे कपडे? किती मजबूर ही गरिबी?
कुणा अंकीत करण्य‍ाला तुझा हा सापळा आहे?
            
कुणी शास्त्रांमधे लिहिला असा हा शोध उफराटा?
कलीच्या रोखण्या नजरा छताला कोहळा आहे.

कुणी खिंडीत गाठावे, कुणी लालूच दावावी,
कुण्या गनिमास ना बधला इमानी मावळा आहे.

चढया घोड्यानिशी आला स्वराज्याला मिटवण्या जो,
शिवाने त्याच अफजुलचा उपसला कोथळा आहे.

मळे फुलवीत जा किंवा फुले तुडवीत जा लेका,
इथे प्रत्येकजण रस्ता निवडण्या मोकळा अाहे.

अनीती वाढता तुमची जरा लक्षात ठेवा हे,
करावे तेच फेडावे, विळ्यावर भोपळा आहे!

                              - अभिजीत काळे.
                            २३ जानेवारी २०१९.

प्रेरणा

***

विभावरी - लगालगालगा लगालगालगा

असायचे जगी नसायचे जगी
जिवंत प्रेरणा ठरायचे जगी

मरायचे जरी जगायचे तरी 
सुकीर्त होउनी रह‍ायचे जगी

उरातली व्यथा उरात ठेवुनी
प्रसन्न राहुनी हसायचे जगी

असंख्य संकटे पुढ्यामधे उभी
पुरून संकटा उरायचे जगी

क्षणात ऊन ये क्षणात सावली
क्षणाक्षणास तू जगायचे जगी

             - अभिजीत काळे.
           २० जानेवारी २०१९.

रस्त्याकडेला

***



या पदपथावर रस्त्याकडेला
अडलेय वावर रस्त्याकडेला

लाचार नजरा संसार उघडा
दुःखे अनावर रस्त्याकडेला

ओझे मणांचे या जीवनाचे
एका शिरावर रस्त्याकडेला

वाटीत टाका नाणी सुखाची
ताला-सुरावर रस्त्याकडेला

फिरतोय दारो-दारी भिकारी
ऋण घे तुझ्यावर रस्त्याकडेला

                     - अभिजीत काळे.
                     १९ जानेवारी २०१९.

ऋणभार

***

रुचेल तेव्हा मिसळून जाऊ. 
तुटेल तेव्हा विसरून जाऊ.

अशांततेचे रण माजलेले. 
स्वकर्म किल्ला लढवून जाऊ. 

सकाम निष्ठा बुडवेल ठेवा. 
गुणून सत्वा निसटून जाऊ. 

असंख्य धागे सुखदुःख देही,
उदासतेने उसवून जाऊ. 

कुणी कुणाचे ऋणभार घ्यावे?
ऋणे जगाची चुकवून जाऊ. 

             - अभिजीत काळे.
           १५ जानेवारी २०१९.

संवेदना सुखाच्या

***

अंगांग स्पर्शिणार्‍या संवेदना सुखाच्या
दुःखास जाळणार्‍या संवेदना सुखाच्या

गात्रांत गोठलेल्या थकव्यास दूर करिती
भाळास चुंबिणार्‍या संवेदना सुखाच्या

सर्वस्व दान करुनी लुटतात वृक्षवेली 
आनंद वाहणार्‍या संवेदना सुखाच्या

मी गंध मोगर्‍याचा तू धुंद रातराणी
गंधात नाहणार्‍या संवेदना सुखाच्या

चंद्रासवे नभांगण फुललेय चांदण्यांनी
अंधार चोरणार्‍या संवेदना सुखाच्या

पुलकित शहारलेल्या देहावरी निरंतर
रोमांच पेरणार्‍या संवेदना सुखाच्या

निःशब्द पोकळ्यांनी मौनात सांडलेला
गूढार्थ शोधणार्‍या संवेदना सुखाच्या

                - अभिजीत काळे
              १५ जानेवारी २०१९.

शृंगार

 

***

कामिनीने एकदा शृंगार केला
कामनेने लाखवेळा वार केला

पापणीने पापणीला चुंबिले की?
निमिषभर डोळ्यांपुढे अंधार केला!

धर्मग्रंथांची दुकाने थाटलेली,
आंधळ्यांनी वाचुनी बाजार केला.

खेळ कोठे राहिले आता खिलाडू?
माणसाने तो नवा व्यापार केला

लाभुनी दृष्टी मला पाहू न शकलो
हाय माझा जन्म मी बेकार केला

खोल करते घाव जो भरणार नाही
हा जिभेवरती कुणी संस्कार केला

वासनेची काकदृष्टी साधकावर
संयमाने पण लढा स्वीकार केला

                   - अभिजीत काळे.
                  १४ जानेवारी २०१९.

एखाद्या आयुष्यावर एखादी कविता स्फुरते...

***

घुसळवून डोह मनाचा जी आकाशाला भिडते. 
एखाद्या आयुष्यावर एखादी कविता स्फुरते.
 ती ओळख बनुनी जाते, काळाच्या सोबत फिरते.
एखाद्या आयुष्यावर एखादी कविता स्फुरते. 

मनसागरतळ रत्नाकर स्वातीची वर्षा झेलत,
शब्दांच्या अंतर्यामी अर्थांचे मोती पेरत,
सृजनाच्य‍ा सौंदर्याने शिंपींच्या गर्भी रुजते
एखाद्या आयुष्यावर एखादी कविता स्फुरते. 

या विशाल ब्रम्हांडाला अक्षर गुंफी गुंफित, 
कोषात सुखाच्या अलगद 'मन' व्यापत बंदी करते.
सूर्याच्या तेजालाही शब्दांचे तेज हरवते 
एखाद्या आयुष्यावर एखादी कविता स्फुरते. 

सुमनांच्या रजःकणांसम हृदयाचे गूज कवीच्या,
मनमिलिंद होते कविता रसिकांचे रंजन करते, 
सर्वात्मक चैतन्याचे संवेदक स्पंदन ठरते.
एखाद्या आयुष्यावर एखादी कविता स्फुरते. 

प्रीतीच्या गावामधल्या नवतीच्या मुग्ध मनांशी,
तृष्णेने व्याकुळ गात्री, विरहाने शापित रात्री, 
तालावर शब्दसुरांच्या नसानसातुन रुणझुणते,
एखाद्या आयुष्यावर एखादी कविता स्फुरते.

                                   - अभिजीत काळे.
                                  १ जानेवारी २०१९.

(काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध कवी, गझलकार, गीतकार श्री. वैभव जोशी यांची एक कविता वाचनात आली त्या कवितेची शेवटची ओळ होती 'एखाद्या अायुष्याला एखादी कविता पुरते.' ही ओळ मनात खोल जाऊन बसली. त्या ओळीवरून या कवितेची पहिली ओळ सुचली आणि कविता स्फुरत गेली.)

Wednesday, 27 May 2020

बिंदू

***



वर्तुळाचा केंद्र बिंदू म्हणवून घेत असताना ..
त्या बिंदूला मोठं झाल्यासारखं वाटतंय इतरांपेक्षा...

असं काय आहे विशेष त्याच्यात..?
इतर बिंदूसारखाच...
तोही एक बिंदू. 
उलट...
वर्तुळाचा भाग असलेल्या...
इतर बिंदुंच्या समर्थनामुळंच तर...
त्याला  येता आलंय.. केंद्रस्थानी...
अहो, जर,.. 
त्या बिंदूंपैकी काहींनी जरी  मनमानी केली..
तर काय करणार हा...?

त्याला म्हणावं...
अरे बाबा ज्या परिघामुळे तुला पुर्णता लाभली आहे ना!
तोही...
बिंदूंनीच बनलेला आहे बरं...
आणि सांगावं...
कितीही त्रिज्या वाढवत गेलास.... 
कितीही परिघ मोठा केलास.... 
तरीही...
तुझं प्रतल व्यापणंही तुला अशक्य आहे बरं...
इतर प्रतलांची तर गोष्टच सोड.....

ह्या अगणित.... अनंतशा.... बिंदूविश्वात...!
 तुझं स्थान ते काय?

होय,   इथे...
आहे महत्वाची एक जाणीव... 
स्वत्वातील अनंतत्त्वाची... आणि 
अनंतत्त्वातील स्वत्वाची... 

बाकी..
 वर्तुळ, केंद्र, प्रतल.. 
हे सगळेच भास... मोहात टाकणारे...!!!

                    - अभिजीत काळे.
                    १८ नोव्हेंबर २०१७.

शून्य



काय आहे 'शून्य'?
एक अंक म्हणूयात, तर...
 त्याचं स्वतःच मोल काहीच नाही.

एक अद्भुत वलयांकीत संख्या...
 जी अंकाच्या मागे उभी राहीली तर...
          अंकाचं मोल वाढवते.

अंकातून वजा केली तरीही 
        अंक शिल्लक रहातो 
आणि 
अंकात मिळवली तरीही 
     उत्तर तो अंकच असते.

अहो,
कुठल्याही अंकास शून्याने गुणले 
               तर उत्तर शून्य.
पण... 
शून्याने कुठल्या अंकास भागणे 
    अजूनही कुठल्याही गणितज्ञाला 
          शक्य झाले नाहीये.

तरीही गम्मत काय तर....!
एका अंकाने दुसर्‍या अंकाला भागून 
बाकी शून्य राहिली तरच 
पूर्ण भाग गेला असं म्हणायंच.

गणिताच्या सगळ्या नियमांना 
    अपवाद ठरून स्वतःसाठी
 वेगळे गणिती नियम असणारा हा अंक 
      नसला तरी गणिताची पंचाईतच.

असं या शून्याचं गारूड भलतंच विचित्र . . .
असूनही नसलेलं आणि नसूनही असलेलं. 

व्यक्तामधील अव्यक्ताची नेणीव म्हणजे 'शून्य'.
अव्यक्ताची व्यक्त जाणीव म्हणजे 'शून्य'.
असण्याची असूनही उणीव म्हणजे 'शून्य'.

होय शून्य.... एक प्रश्नचिन्ह ?
ज्याचं उत्तर 'काहीच नाही'... फक्त 'शून्य' !

माझी एक नेहमीची सवय ,
कोणी विचारलं, "बाकी काय?"
की मी मिश्किल उत्तर देतो, "शून्य."

                    - अभिजीत काळे.
                   ११ डिसेंबर २०१८.

लाघव

***

लटलटणारी मान कापरी, थरथरणारे अवयव,
म्हातार्‍याची तरूण तृष्णा! महानता की लाघव?

भावभारल्या असंख्य ‍कविता, नऊरसांचे उत्सव,
संध्यासमयी अाभाळाची किती कालवाकालव?

युगाप्रमाणे सांगुन गेले भार्गव, राघव, यादव.
तुझ्यात वसला 'राम' तयाची दिशा स्वतःला दाखव.

योग साधतो प्रेरक प्रेरित यांच्या मधला साकव
जिवाशिवाच्या संवादाची प्रतिके पांडव माधव

दो नयनांची कर्तबगारी करते भारी कत्तल,
वरवर दिसते सौंदर्याचे विपरित गोंडस मार्दव.

मैत्रीचे हे नाते ठेवू रुचकर, प्रेमळ, भक्कम 
अतिबांधिलकी, उसनी माया, करते त्याला बेचव

शर्यत ठरली, ससाच विजयी, जंगल म्हटले सगळे,
गर्व बाधला पण वेगाला, जिंकुन गेले कासव

कर्तव्याची क्षणाक्षणाला जाण बोचरी असते,
थोरपणा तो नकोच वाटे, बरेच होते शैशव.

आयुष्याच्या संध्याकाळी एकांताच्या वेळी,
लाल, गुलाबी, काजळकातर, रंगबिरंगी आठव.

                      - अभिजीत काळे.
                     २६ डिसेंबर २०१८.

कारण

***


मी पत्राला कारण ठरलो, उत्तर ठरलो नाही.
बेमुर्वत मज म्हटले त्य‍ांनी पण मी झुकलो नाही.
                   
तारण ठेवत विश्वासाला न्यायाने मी लढलो.
कोणाच्याही ताटाखाली मांजर बनलो नाही.

शामल, रेशम शय्येसोबत सुख अनुभवले शीतल.
डोहामध्ये विषयांच्या पण अडकत सडलो नाही.

बाल्यावस्था, तारुण्याच्या... अद्भुत, मादक गोष्टी,
जिथल्या तेथे सोडत आलो, चिवडत बसलो नाही.

घट कमरेवर, घट डोईवर, घट गाभुळली काया,
आरस्पानी घटवळणांवर घसरून पडलो नाही.

गुणगुणलो अन् जगलो सुद्धा कवितेच्या मी ओळी.
शब्दांच्या घन सावळ धारांना मी मुकलो नाही.

थकवत आले जीवन मजला अपयश दावत माझे.
कडवट विषही पचवत गेलो, जगलो;... थकलो नाही.

कारस्थानी नातलगांनी बळकट कावा केला 
लढलो चढलो चढतच गेलो मागे फिरलो नाही

धर्मासाठी अवयव तोडत पोळत छळले त्यांनी 
बलिदानाने  मृत्युंजय मी, जीवन हरलो नाही.

                                - अभिजीत काळे.
                              २१ डिसेंबर २०१८.

मनाचा गूढ गाभारा

***

मनाचा गूढ गाभारा भरावा शून्य शब्दांनी
उगा का सोंग भक्तीचे धरावे मूढ गात्रांनी

धरू जाताच स्वप्नांना पुढे जाऊन सत्याच्या
तयांचे फोलपण कळते उन्हाच्या तीव्र चटक्यांनी

नदीच्या संथ पात्राला झर्‍याचे बालपण स्मरते
तसा बाष्पासवे उष्मा स्मरावा मेघमालांनी

दिव्यांनी जाळला जाता उभा अंधार रात्रीचा
इशारा समजुनी घ्यावा त्वरेने भ्याड घुबडांनी

सश्याला हरवते कासव इसापाची कथा सांगे
खरे मानू नये का हे घड्याळांच्या व्यवस्थांनी

                              - अभिजीत काळे.
                                ३ डिसेंबर २०१८.

मायावी

***

खटकतो फक्त तेथे मी जिथे गर्दन झुकत नाही. 
जवळच्यांना कधी माझे कुठे झुकणे पटत नाही. 


किती किंमत कुणी माझी करावी प्रश्न तो त्यांचा. 
कशीही वेळ येवो पण स्वतःला मी विकत नाही. 


कधी जिंकून गेलो मी, कधी हरलो, कधी सरलो. 
कुठे पण बोललो सांगा कधीही मी चुकत नाही?


तुझ्या डबक्यातले पाणी तुला लखलाभ हो कृपणा. 
कुबेराचा जरी स्नेही तुला कवडी सुटत नाही. 


उभे आयुष्य मायावी असे कांंचन-मृगा जैसे,
पळा मागे धरायाला किती ते सापडत नाही.

                           - अभिजीत काळे.
                           २ डिसेंबर २०१८.

विरह छळतो मनाला

***

दुराव्याने सतवल्यावर विरह छळतो मनाला 
तुझ्या प्रेमात भिजल्यावर विरह छळतो मनाला 

तुझ्या ओठांतले अमृत, नशा ती जीवनाची
तुझ्या ओठांस मुकल्यावर विरह छळतो मनाला 

तुझ्या केसांत माळावे सुमन नाजुक सुगंधी 
उगाचच फूल दिसल्यावर विरह छळतो मनाला 

खुले नाजूक दवबिंदू गुलाबी पाकळीवर
गुलाबी गाल स्मरल्यावर विरह छळतो मनाला 

जळाने दूर केल्यावर कसा मासा जगावा?
तुझे दर्शन हरवल्यावर विरह छळतो मनाला

                    - अभिजीत काळे.
                   २९ नोव्हेंबर २०१८.

क्षणांचे धन

***

सांडतो वेचतो क्षणांचे धन
कोण अव्हेरतो क्षणांचे धन

वाहिले काल आजही वाहे
काळ तो वाहतो क्षणांचे धन?

काळ देतोय घे हुशारीने,
व्यर्थ का दवडतो क्षणांचे धन?

नाव दारावरी तुझ्या लिहिले,
थोडक्या समजतो क्षणांचे धन!

वाटते ना तुला अमर व्हावे?
मग कशा जाळतो क्षणांचे धन?

                 - अभिजीत काळे.
                 २३ नोव्हेंबर २०१८.

खूप दिवस झाले





***

तुला पाहून खूप दिवस झाले.
तुझ्या वाचून खूप दिवस झाले.

अता होणार काय कुणाचा मी?
तुझा होऊन खूप दिवस झाले.

जुने आभाळ, बाक, फळा, शाळा,
जुने हरवून खूप दिवस झाले.

सुखांचा रंग आज फिका झाला.
सुखे विसरून खूप दिवस झाले.

दिले मी शेवटास तुला सगळे
खिसे फाटून खूप दिवस झाले.

तिच्या रजनीत माळ सुमन चंद्रा
पुनव संपून खूप दिवस झाले.

मनाच्या आत बंद मनाचे मन,
बघू उघडून, खूप दिवस झाले!

नभाला बाप माय भुई म्हणतो.
घरी जाऊन खूप दिवस झाले.

रडू येणार काय कुणासाठी?
नदी आटून खूप दिवस झाले.

                  - अभिजीत काळे.
                 १७ नोव्हेंबर २०१८.

बाजार

***


आकाश चोरण्याचा व्यापार मांडला
प्रेमास चांदण्यांचा आजार भोवला


केला गुन्हा फुलाने भुंग्यास कोंडले
वेड्या समर्पणाला आकार लाभला


त्यागात प्रेम असते ना जाणिले कुणी
स्वार्थी मनोगतांचा सत्कार चालला


नाकारला सुखाने आजन्म जन्म जो
एका तुझ्या स्मिताने साकार जाहला


भाऊ, बहीण, पत्नी, माता, पिता, मुले
मी देह सोडल्यावर बाजार वाढला

                   - अभिजीत काळे.
                  २३ ऑक्टोबर २०१८.

आकार माणसाचा

***

दिसतो तसा नसावा आकार माणसाचा
असतो तसाच व्हावा आकार माणसाचा

इतिहास सत्य मोठे बदलू नये कधी ते
होत‍ा तसा लिहावा आकार माणसाचा

पाण्यात पाहणारे दुष्कृत्य लपवणारे
यांना कसा दिसावा? आकार माणसाचा

वरती 'खरा' दिखावा आतून ठार खोटे
त्यांचा गळून जावा आकार माणसाचा

बोलांत सत्य ज्यांच्या करणी परोपकारी
त्यांनाच तो मिळावा आकार माणसाचा

                   - अभिजीत काळे.
                  २१ ऑक्टोबर २०१८.

बीज

झाली व्यथा जुनी अन् अदृश्य घाव झाला 
येते तरी पुन्हा ती गंधात नाहण्याला

का नाचतोय भवती गतकाळ वर्तमाना?
शून्यात न्यून कसले दिसले तुझ्या मनाला

गेली उन्हे कधीची घेऊन सावलीला
अंधार फार छळतो चल बोलवू उन्हाला

तू वाचलास पाढा माझ्या जरी गुन्हयांचा
आरोप हे खरे का? चाळून बघ स्वतःला

माझ्या तुझ्या व्यथांचे आकार निरनिराळे 
मी गोलगोल फिरतो चौकोन आखण्याला

झरतात प्रश्न अविरत छळतात जाणिवेला
उपळा अगम्य कसला फुटलाय काळजाला

प्रश्नात खोल दडले जे बीज उत्तराचे
भंगूर जन्म ठरतो ते सत्य शोधण्याला

                         - अभिजीत काळे.
                       १७ ऑक्टोबर २०१८.

माणसा



रोज डोळ्यातुनी दुःख सांडू नको आग हृदयातली वाढते माणसा
प्रेम वा रोग हो दुःख दोन्हीकडे शांतता आतली खंगते 

नाळ तुटताक्षणी शोक केलास तू, जीव जाताक्षणाला पुन्हा शोक का?
जीवनाची नशा आंधळी बेरकी चांगल्या चांगल्या बाधते माणसा.

अन्नही पाहिजे वस्त्रही पाहिजे पोसण्या जीव हा कष्ट घेतोस तू
भूक पोटातली भागल्यावर तुझ्या भूक डोळ्यांतली वाढते माणसा

चार दिवसातले दोन लढण्यामधे दोन रडण्यामधे व्यर्थ तू दवडले
प्रार्थिले तेज का विश्वव्यापी तुझ्या अंतरी नित्य जे नांदते माणसा

जे तुला वाटले तेच केलेस तू जन्म गेला पुरा स्वार्थ साधावया
प्रेम पैशामधे तोलल्यावर इथे वाढण्या एेवजी आटते माणसा

               -अभिजीत काळे.
             २६ सप्टेंबर २०१८.

सांध म्हणालो



ये माझ्या फांदीवरती तू घरटे बांध म्हणालो
तुटलेले नाजुक धागे प्रेमाने सांध म्हणालो

क्षण येता अतिथी बनुनी दारावर सान चिमुकले
ममतेचे घास भरविण्या त्यांसाठी रांध म्हणालो

स्वप्नांची वर्दळ नसते प्रीतीचा दरवळ नसतो
प्राण्याच्या प्रणयाला मी निव्वळ कामांध म्हणालो

जो पाहू शकला नाही कसल्याही उत्कर्षाला
त्या डोळे असुनी सुद्धा केवळ जात्यांध म्हणालो

मानवता धारण केली तो तरला तारक ठरला
वैर्‍याला मानव्याच्या कायम धर्मांध म्हणालो

                                 - अभिजीत काळे.
                                 ९ ऑक्टोबर २०१८.


 

बियाणे

***

आजन्म प्रेम केले दडवून भावनांना
श्रृंगारली व्यथा मी लपवून आसवांना

गर्दीत कोंडमारा होतो जनावरांच्या
शहरात भेटतो का माणूस माणसांना

खोट्या तुझ्या रुपावर भाळून ठार मेलो
केलेस तू अलंकृत फसव्या प्रलोभनांना

स्वर्गातल्या सुखांची करतोस मागणी तू
घे काळजी जराशी पुण्यांस खर्चतांना

पडते गळून येथे प्रत्येक पान पिकले
आयुष्य गोड वाटे हिरव्या तृणांकुरांना

शतजन्म व्यर्थ गेले ना ल‍ाभला किनारा
नावेमधे नको त्या घेऊस वासनांना

पेरून मी बियाणे गेलो पुढे निघोनी
फुलवा मळा सुखाचा सांगेन मागच्यांना

                     - अभिजीत काळे.
                     १० सप्टेंबर २०१८

सावल्या

***

दिसतात सावल्या ज्या, नसती असून काळ्या,
अव्यक्त सावल्यांच्या रात्री अजून काळ्या.


फसव्याच चेहऱ्यांच्या विश्वास सत्य मानू 
तोंडावरी हसू पण हृदयामधून काळ्या


असते जरा अताशा आकाश कोंडलेले
हल्ली ढगात जातो रवि मावळून काळ्या


शब्दात आज त्यांच्या असलाच गोडवा तर 
व्यापार होत आहे त्यांच्या हातून काळ्या


डुलणार शेत आता हसणार अन् बळीही
फुलणार चंद्र तारे मातीमधून काळ्या.

                       - अभिजीत काळे.
                       ५ सप्टेंबर २०१७.

पंढरी



खोल जळाचे अंतरस्पंदन तरंग होउन उठले,
मनडोहाच्या गूढ तळाशी हळवे वादळ हसले.
हिरवाईने साक्ष दिली ना आभाळाने पुसले,
आपल्या मध्ये आपण होऊन तरंग सारे विरले.

आशा मनिषा मनास तृष्णा या ललनांची केवळ
वाढत जाते क्षणाक्षणाला आस गुलाबी पोकळ
तृप्त न कोणी येथे झाले घेत सुखाची धाबळ
ध्यान ध्येय की ध्याता माझा गोंधळ सावळ सावळ

मंदिर, किल्ले, महाल, वाडे कुणास आस्था कसली 
विविध मनांची गादी वैरी लालच व्यापुन बसली
'ग'ची नागीण वेढा घालुन व्यक्तित्वाला डसली
ऐलतटावर अडली वारी पैल पंढरी वसली

                     - अभिजीत काळे.
                    २८ ऑगस्ट २०१८.

मन माझे



आर्त खोल शांततेत पान्हवते मन माझे
आजकाल एकांती पालवते मन माझे

फिरणार्‍या पंख्याला लाजवते मन माझे
मोहाचे वादळ की माजवते मन माझे

आसर्‍यास घरट्याच्या शांत झोप घेता मी,
स्वप्नांचे इमले मज दाखवते मन माझे.

भजनांच्या प्रासादिक सोहळ्यात मी रमतो
अन मलाच वासनेत रंगवते मन माझे

असतो पण नसतो मी, नसताना असतो मी,
सत्य एक, वेगळेच भासवते, मन माझे

सोंग करत थकतो मी, थकते ना हे केव्हा,
माझ्यातच मी दुसरा नांदवते मन माझे

माझ्यातच असते अन माझेही असुनी ते,
हुकुमत की माझ्यावर गाजवते मन माझे!

केतकीस शोधण्यात पारंगत भ्रमरासम
मनकवडे, अंतरंग ओळखते मन माझे

हीच एक अपवादी घटना मी अनुभवतो
फक्त तुझ्या साठी हे नादवते मन माझे

                   - अभिजीत काळे.
                     २८ मार्च २०१८.

गुढी उभारू

गुढीपाडव्या निमित्त एक  वृत्तबधद्ध कविता . . . . . 

पावित्र्याची मांगल्याची आणि यशाची गुढी उभारू
आचरणाने मानवतेच्या कल्याणाची गुढी उभारू

स्वराज्य स्थापक स्वराज्य रक्षक शिव - शंभूंना अ‍ाज आठवू
अनंत अक्षत स्वातंत्र्याच्या अभिमानाची गुढी उभारू

मृत्यूंजय जो खरा जाहला प्राण अर्पिला धर्मासाठी
त्या शंभूच्या स्मृतीस वंदुन जरीपटक्याची गुढी उभारू

इतिहासाचे स्मरण ठेउनी वर्तमानही पुढे नेउया
सार घेउनी असार त्यागू मानव्याची गुढी उभारू

त्यागाचे अन वैर‍ग्याचे सामर्थ्याचे प्रतिक भगवा
त्या भगव्याला करून मुजरा नववर्षाची गुढी उभारू

                                          - अभिजीत काळे.
                                            १८ म‍ार्च २०१८.

युधिष्ठिरा

***

 

द्रौपदीस तू पणास लावले  युधिष्ठिरा!
केशवास व्याप खूप वाढले युधिष्ठिरा!



एकदा हरून द्यूत खेळलेस का पुन्हा?
अनुद्युतास खेळणे न शोभले युधिष्ठिरा!



द्यूत हा जुगार, सर्व गमविलेस त्यात तू.
अन् तुलाच 'धर्म', लोक बोलले युधिष्ठिरा! 



कंक होउनी द्युतात रंगलास तू पुन्हा,
बल्लवा नि कीचकास लढवले युधिष्ठिरा! 



सत्य बोलण्यामुळेच मान या जगी तुला. 
तू नरास कुंजरात तोलले युधिष्ठिरा! 



कृष्ण, पार्थ, भीम, दृष्टद्युम्न साह्य लाभले,
युद्ध त्यामुळे महान जिंकले, युधिष्ठिरा! 



कर्म कोणते असेल उच्च ते तुझे असे?
शेवटास स्वर्ग द्वार गाठले युधिष्ठिरा!
            

                       - अभिजीत काळे.
                      २ नोव्हेंबर २०१७.

जाचत आहे

***



जिवलग नाही माझे कोणी सांगत आहे 
सूर्याचाही जीव पोळला वाटत आहे


लागत नाही डोळा हल्ली रात्री सुद्धा
मी दुःखाला दुःख कुणाला भोगत आहे?
                          
 
अर्ध्यामुर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले
सोने देखिल त्यांना क्षुल्लक भासत आहे
 

घर चौघांचे चौकोनी हे असून चौरस 
जो तो त्याची वाट वेगळी चालत आहे


जात धर्म वा समानता वर-वरचे मुद्दे
आग नेहमी कोण इथे ही लावत आहे


माझे मीपण मोठे आहे तुझ्याहूनही
जो तो त्याच्या गल्लीमध्ये भुंकत आहे


ओली सुक्की खेळत खेळत मोठे झालो
दैव अजुनही..तोच खेळ का खेळत आहे


पृथ्वीभवती चंद्रासंगे मीही फिरतो
ठरली कक्षा कोण इथे ओलांडत आहे?


नीती तत्त्वे बंद चौकटी आणिक भिंती 
स्वैर मनाला वेसण भलती जाचत आहे


                         - अभिजीत काळे.
                            १ जुलै २०१८.

मी

मी

कोणत्या कक्षेत फिरतो नेमका मी
सूर्य पृथ्वी चंद्र असुनी पोरका मी
                             
पावसा तू ओल दे शब्दांकुरांना
कोरड्याशा नेणिवांचा ओंडका मी

भेदभावाची दरी रुंदावलेली
कोणत्या भाषेत फोडू हुंदका मी

काय ते आहे कमी माझ्यात कळते
हे कसे उपकार फेडू निंदका मी

वाढतो संवाद माझा आत माझ्या
खोलश्या मौनात जातो बोलका मी

व्यर्थ अवडंबर प्रथांचे केवढे ते
साधना हरवून बसतो साधका मी

ती तुझ्या नजरेतली तृष्णा असावी
लावला अंदाज इतका मोडका मी

एक अवखळ मित्र होता तो निरागस
शोधतो माझ्यातल्या त्या बालका मी

शून्य झाली संपली खडतर तपस्या 
पाहिली भारावुनी का मेनका मी

पालवी माझी किती होती मनोहर
पानगळ होताच झालो बोडका मी

माळली आकाशगंगा यामिनीने
त्यातला निशिगंधभरला पुंजका मी

जन्मभर या पावसाने दग्ध केले
त्याच त्या विरहात जळतो चातका मी

प्रेरणा स्फुल्लिंग ठिणगी काय बोलू
फक्त शब्दांनी भडकतो प्रेरका मी
    
                             - अभिजीत काळे.
                              १३ जून २०१८.

हक्क

चल पुन्हा भेटून घेऊ त्या गुलाबी पाकळ्यांवर
स्वार होऊया जुन्याशा गावभरच्या वावड्यांवर

शांत डोहाला मनाच्या चांदण्याचे गूज सांगू
कोरली लेणी कशी या आसवांनी पापण्यांवर

कोणता होता ऋतू तो कोणता आहे ऋतू हा
चांदणे अविरत बरसते चंद्रमौळी झावळ्यांवर

केवढे एेश्वर्य अाहे नांदते हृदयात माझ्या
आरसा सांगेल कोणी मात केली चांदण्यांवर

दुःख कोणी जाणिले का सोसणार्‍या छप्परांचे ?
हक्क सांगे मात्र जो तो सौख्यदायी सावल्यांवर

                                     - अभिजीत काळे.
                                         १ मे २०१८.

दवा

***

प्रत्येक शब्द मात्रा तोलून पाजणारी
गेली कुठे दवा ती माणूस जोडणारी

धरतात तेच येथे उचलून लोकशाही?
ज्यांना मते मिळाली दारूत लोळणारी

शोधावयास आता नाही कुठेच उरली
लाजून हासणारी अन् इश्श्य बोलणारी

त्यागून सर्व किंतू आनंद वेचणारी
मी पाहिलीत हृदये वारीत चालणारी

जनुकीय पीळ ज्यांच्या पेशींमधे पिढ्यांचा
अद्भुत रसायने ही माणूस वाटणारी

आता न सापडावी शोधून औषधाला
शहरात माणसे ती गावात भेटणारी

शोधू कुठे अता मी डंखासवे मधाला
ती मोहळे सुहृदयी हितगूज साधणारी

                           - आभिजीत काळे
                             १९ मार्च २०१७.

प्रतिपाळ

***

अवती भवती जाळ उन्हाचा
माज म्हणू की काळ उन्हाचा


बर्फ धुळीवर टाक मनाच्या
धुवून निघण्या गाळ उन्हाचा


झाडाखाली मिळे गारवा
तापत असता माळ उन्हाचा


आई करते नजर कैद मग
घरात बसतो बाळ उन्हाचा


काजव्यांस दे रात्र खुशीने
तू दिवसा तेजाळ उन्हाचा


नकोस पाहू तिचे ऊन तू
जाच मनाला टाळ उन्हाचा


दो क्षितिजांच्या मध्ये होतो
जीवनभर प्रतिपाळ उन्हाचा

               - अभिजीत काळे.
               ३० एप्रिल २०१८.

लक्ष्मण भेटत नाही...

***
आयुष्याची वाट चालतो चणचण संपत नाही
तनामनाची भूक वाढते 'मी'पण भागत नाही

दोन वेळचे अन्न मिळावे माफक ज्यांची आशा
घरात त्यांच्या माणुस जळतो, सरपण पेटत नाही

आभाळाचा देव ओढतो तप्त कोरडे पाठी
पाण्यासाठी बाई फिरते वणवण थांबत नाही

वर्षांमागुन वर्षे जाती कळावयाला जीवन 
कळते ज्याला अमूल्य किंमत तो 'क्षण' सांडत नाही

पोटासाठी रस्त्यावरती गाडा ओढत असता
अनवाणी पायांना रस्त्याचे रण पोळत नाही

रोग 'विकृती' मनास ज्यांच्या औषध कुठले त्यांना
सभ्यपणाचे गोडगोमटे 'लक्षण' शोभत नाही

बाप झगडतो परिस्थितीशी माय काढते खस्ता
संसाराला सांधत असता अडचण वाटत नाही

पत अब्रूचे मोलच आता उरले नाही त्यांना
कर्ज अवास्तव घेउन पळती दडपण वाढत नाही

"कर्णफुलांची ओळख नाही, पैंजण मी ओळखतो"
आजकालच्या सीतेला तो लक्ष्मण भेटत नाही

                                        - अभिजीत काळे.
                                        २२ एप्रिल २०१८.

कालातीत



हा दिसतो अाहे केवळ बसलेला लावून घात. 
काळाचे का मी मोजू मजवरचे लक्ष आघात?

हा भुरट्या चोर्‍या करतो, पाडून मला एकाकी. 
हा काळ घालतो डाका, चोरून मनाची शांती.

बघ एके दिवशी याला, मी जाइन फसवुनी दूर. 
हा काळ असो असलातर, जरी किती क्रूर निष्ठूर.

कालची, आज, उद्याची ही डोळ्यांना दिसणारी
सोलुनी फेकुनी द्यावी, त्रैमितिक स्मृती अंधारी.

आत्म्याने धारण केली, काळाची फेडुन वसने,
कालातीत व्हावे वाटे, तोडून बंधने सारी.
                         - शारदात्मज.
                         (अभिजीत काळे.)
                          १९ एप्रिल २०१८.

का'मना वरली ...

 ***

तिथे त्या अंत्ययात्रेला विरक्ती देहभर फिरली
स्मशानाची हवा सरता मनाने 'का'मना वरली

तिच्या पासून अश्रूंना लपवण्याचे कसब अवघड
जराशी दूर जाता ती दवाने लोचने भरली

उकळते वेदना कसली जलाची वाफ होताना ?
बुडाशी आग पाण्याच्या उभ्या दाव्यात सरसरली

उन्हाने होरपळ केली जिच्या माझी कधीकाळी
तिच्यावर ऊन आढळता, जरा मी सावली धरली.

तुडवला मी चुकुन चाफा मनाला दु:ख झाले पण
नवल त्याचे किती सांगू उभय तळवीच अत्तरली

'तसा' नव्हताच माझाही तिला भेटायचा हेतू
कशाने एवढी मग ती मला बघताच बावरली

जरी नाही अता रावण जरी तो कंसही नाही
नराधम आजचे बघुनी धरा अवघीच थरथरली

                                     - अभिजीत काळे.
                                     १९ एप्रिल २०१८.

बापा

ऐकून घे तिचेही मंजूळ बोल बाप्पा, 
बघ, वेदना तिच्याही असतील खोल बाप्पा. 
                                          
एकेक शब्द लाघव हलकेच घे उराशी
अर्थातली मधुरता हळुवार सोल बाप्पा

किलबिल किती मुलीची वाटे हवीहवीशी
कन्येविना पित्याचे आयुष्य फोल बाप्पा

लडिवाळ हाक यावी करपाश कंठदेशी
बापास यापरत्वे दुसरे न मोल बाप्पा

क्षण चार जीवनाचे त्यातील दोन गेले
ओसाड वाळवंटी मुलगीच ओल बाप्पा

                               - अभिजीत काळे.
                              १५ एप्रिल २०१८.

ठीक नव्हे

ठीक नव्हे

खेळविणे लोळविणे खेळण्यास ठीक नव्हे
सत्य अाणि मिथ्याचा अट्टहास ठीक नव्हे

हे करूच ते करूच रोजचेच निश्चय पण
स्वप्न फार दाखवणे तू मनास  ठीक नव्हे

जायचेच आहे तर जाउयात आनंदे
दूर जवळ की पुसणे हा प्रवास ठीक नव्हे

डावा वा उजवा तो की तटस्थ  फसवा हा
कोणताच स्वाभाविक पण कयास ठीक नव्हे

लाजतेस तू तिकडे बावरतो मी इकडे 
अल्लडता ही असली या वयास ठिक नव्हे

दाणे दे गाणी गा उडू देत आकाशी
पिंजर्‍यात मोहविणे पाखरास ठीक नव्हे

पुर्वेला, माथ्यावर, पश्चिमेस मीच दिसे
फिरुनी तू, माझा तुज वृथा भास ठीक नव्हे

बोलतोय जे मी ते सत्य मान कधीतरी
नेहमीच शब्दांचा विपर्यास ठीक नव्हे

न्यायचेच आहे तर अलगद ने मृत्यो मज
लांबवणे कष्टवणे श्वास श्वास ठीक नव्हे

                         - अभिजीत काळे.
                          २७ मार्च २०१८.

बघतो आहे

***

मी म्हणणारे संपुन गेले बघतो आहे
रांगेत  उभे अन् उरलेले बघतो आहे

ज्या प्रश्नाने अवघड केले जगणे त्याचे
उत्तर कोणी चोरुन नेले बघतो अाहे

सत्य अहिंसा निष्ठा केवळ शब्दच पोकळ
बेवारस रस्त्यावर मेले बघतो आहे

काळ बदलला पोषाखांचे रूप बदलले
खुंटीवरती जुनाट शेले बघतो आहे

गुणहीनांचे कौतुक होते ज्ञानी मुकती
विकत भेटती येथे चेले बघतो अाहे

नावापुरत्या मंदिर मशिदी, देव हरवला
धर्माचे मी घाउक ठेले बघतो अाहे

पाचोळ्याला जाळुन गेली आग तरी मी
राखेमध्ये नवीन झेले बघतो आहे

काळोखाचे मनही काळे असते म्हणती
मी प्राचीला स्वप्न उदेले बघतो अाहे

जमले नाही स्वत्व शोधणे, उगाच फिरती
आले गेले सकाम हेले बघतो अाहे

                   -अभिजीत काळे.
                     ४ मार्च २०१८.

मोहजाल

***

रक्त लाल सर्वांचे ओरडून सांगावे
जातपात धर्मांचे मोहजाल तोडावे

रात्ररात्र जागुनही काळजीत पोरांच्या
शेवटास वृद्धाश्रम वाटणीस का यावे

साप नाग विंचू ना दंशती विनाकारण
वैरभाव वाढवणे माणसाच शोभावे

र्‍हास होत मूल्यांचा संपणार मानवता
बंद, वाद खतपाणी हे असेच लाभावे

घे पुन्हा कुदळ हाती खोदण्या जुनी थडगी
घडविण्या नवी दंगल नवनवीन शोधावे

                        - अभिजीत काळे.
                        ६ जानेवारी २०१८.

उतारा



भवाचा पसारा तुझ्या आत आहे
भ्रमाचा उतारा तुझ्या आत आहे

तुला पाहणारा सखे मुग्ध होतो
कसा व्रात्य वारा तुझ्या आत आहे

अरे देवभोळ्या मुढा सुज्ञ हो ना
क्षमा पोसणारा तुझ्या आत आहे

असो कामनांच्या किती उंच लाटा
करारी किनारा तुझ्या आत आहे

कुणाला जमावी उकल अद्भुताची
अनोखा पिसारा तुझ्या आत आहे

                     - अभिजीत काळे.
                   २२ फेब्रुवारी २०१८.

'मी' गळाल्यावर

***

हजारो शब्द लिहितो पण मजा वाह् वा मिळाल्यावर , 
'गझल' होते तुझी राजा जरासा नम्र झाल्यावर.

स्वतःचा शोध घे मित्रा, जगाया पात्र हो मित्रा,
उपाशी वाघ जगतो का कधी त्या झाड पाल्यावर?

क्षणाचा मोह होतो नी तुझा माझा विरह होतो 
मला तू शोधतो मित्रा, जगाचा वीट अाल्यावर.

घराला स्वच्छ ठेवावे मला भेटीस बोलवता, 
तुझा मी होउनी राहीन सहा वैरी जळाल्यावर.

स्वतःची भेट घेताना तुला भेटेन मी वत्सा,
खरी ओळख तुला माझी तुझा हा 'मी' गळाल्यावर.

                              - अभिजीत काळे.
                              १८ ऑगस्ट २०१७.

स्तोम

*** 

जिवांनो दिव्य स्वप्नांचीच घ्या झालर उशाला
व्यथांचे स्तोम माजवतो खुळा जागर कशाला

ढगांनी रंगवावे सावळे आकाश नुसते
पडे ही चातकाच्या केवढी कोरड घशाला

शिकावे वाटते व्हावे इथे सर्वांस मोठे
उघडते तोंड पण मोठे प्रवेशाला प्रशाला

अरे हा देश गेला बेरकी सत्तांध हाती
रडे ही हाय जनता का कुणी ना भरवशाला

निघालो स्वीस बँकेतून पैसा आणण्याला
करांचे केवढे ओझे अता माझ्या खिशाला

                - अभिजीत काळे.
                १७ ऑगस्ट २०१७.

चालताना

***

मंजुघोषा 

पाहिले मागे कधी ना धावताना?
वेळ गेल्यावर कळे हे थांबताना.

सांगणारे कैक आले कैक गेले, 
पाहिले नाही कुणाला ऐकताना !

तू खरा की मी खरा हा वाद होता.
धार शब्दांची कळाली भांडताना.

विकृती की व्यंग हे कळणार केव्हा?
मौज वाटे तुज कुणावर हासताना.

सभ्यतेची पायरी ओलांडली की,
तोल जातो सारखा मग चालताना.

 . . . . . . . . . अभिजीत काळे.
                 १५ ऑगस्ट २०१७.

माणूस

***

स्वर्गीय कल्पना मी केल्या कीती सुखांच्या
गात्रांस जाळले मी अग्नीत चांदण्यांच्या ?

बुडती अनेकवेळा गर्तेत कामनांच्या,
चकवे बरेच येती मार्गात मानवांच्या.

स्वप्ने उडावयाची हृदयात ढेकळांच्या, 
कणसामधून शिरली पंखात पाखरांच्या.

शाळा कशी असावी जिवनात बालकांच्या ?
पाठीवरी हवी की डोक्यात लेकरांच्या ?

चर्चा घडून येता वाळीत टाकण्याच्या, 
माणूस लक्ष्य झाला गर्दीत श्वापदांच्या.


                   - अभिजीत काळे.
                 २८ सप्टेंबर २०१७.

भोग

***


मनोरमा 


सांज होते, सूर्य बुडतोे,
अन् तमाला माज चढतो!


प्राप्त कर तू आदराला.
मागुनी का मान मिळतो?


धूर असतो दिसत जेव्हा, 
त्या बुडाशी जाळ असतो.


'मी' पणाच्या अंध कूपी,
सात्विकाचा जीव कुजतो.


वाकडे पाऊल पडते,
जन्म भर तो, भोग पुरतो.

             -अभिजीत काळे.
          १६ नोव्हेंबर २०१७.

ठिणगी

***

उरात जखमा मनात शंका घरात तांडव घडून जाते
क्षणात ठिणगी पडून जाते उभी हवेली जळून जाते.. 

हव्या हव्याश्या अनंत इच्छा मनात कोंडत मनुष्य जगतो
नको नको त्या करून चिंता हयात सारी सरून जाते.. 

सुसंस्कृतीचा वरी दिखावा, असभ्य विकृत विचार ज्यांचे,
विचारसरणी गढूळ त्यांची सबळ कलीला करून जाते.. 

समर्थ नाही जगावयाला दुज्यावरी जो विसंबला तो, 
प्रचंड लाटा चिरून जगतो, जहाज त्याचे तरून जाते.. 

नकोस दवडू क्षणैक वाया अमुल्य जीवन तुला मिळाले,
पळापळाने मुठीतुनी जे कळू न येता सुटून जाते.. 

                                                  - अभिजीत काळे.
                                                ३१ डिसेंबर २०१७.

श्रावण

***

नभाच्या आर्त अश्रूंनी इथे झरतो पहा श्रावण 
मनाच्या खोल जखमेतून भळभळतो पहा श्रावण

रुजे गर्भात मातीच्या दिसाया गर्द हिरवा जो
मने चंचल फुलविण्या प्रेम पाझरतो पहा श्रावण 

न लागो आग पाण्याने हृदय माझे जळे क्षण क्षण
सखे विरहात तुझिया केवढा छळतो पहा श्रावण

भुलविते साजिरे मोहक धरेचे रूप मनभावन
खुलविण्या रूप विश्वाचे नभी भरतो पहा श्रावण 

खुणविता हाय मी तिजला मुखाला झाकुनी घेते
सखीच्या लाजऱ्या डोळ्यात बावरतो पहा श्रावण

 . . . . . . . . . . . . . . शारदात्मज.
                             अभिजीत काळे.
                             २५ जुलै २०१७.

श्रावणाला



सखे पावसाचा लळा श्रावणाला
उन्हाच्या नको गे झळा श्रावणाला

घनांनी दुरावा असा काय केला ?
अवेळीच ही अवकळा श्रावणाला

नभाचे धरेशी जुळे गोड नाते
चला कलवऱ्यांनो छळा श्रावणाला

व्रतांच्या सणांच्या तपस्वी जनांच्या 
किती विविधरंगी कळा श्रावणाला

दऱ्या डोंगरांना ढगांनी कवळले
जमे खास गोतावळा श्रावणाला

                 - अभिजीत काळे.
                 २६ जुलै २०१७

श्वास कोंदट वितळताना (रसग्रहण)

*श्वास कोंदट वितळताना...* 
 

_संध्या भरते क्षणिक मळवट_
_सौभाग्याचा अस्त मनोहर_
_शुभ्र ज्योत्स्ना लपेटताना_
_तव भाळी वसावी चंद्रकोर_

 संध्येचं आयुष्य ते कितीसं? सूर्य मावळतानाच्या कालावधीएवढंच पण या काळातलं तिचं रूप विलोभनीय असंच असतं.
धरतीचं सौभाग्य असणारा सूर्य, अस्तास जात असताना, संध्येस जे मन मोहक रुपडं लाभतं, त्याचं वर्णन कविवर्य श्री काळे सरांनी किमान शब्दात किती समर्पकपणे केलंय. जसा काही अवनीच्या क्षितिजरूपी भालप्रदेशावर नववधूच्या सौभाग्याचा कुंकुमाक्त मळवटच भरल्या समान भासतो.
पुढच्या दोन ओळीतील काव्य सौंदर्य रात्रीच्या आकाशाचं वर्णन करते. इथे पृथ्वीने जणू शुभ्र चंद्राची चांदण्यांनी युक्त अशी काळी चंद्रकळाच नेसलेयं आणि कपाळावरची चंद्रकोर तिचं सौंदर्य अजुनच खुलवते आहे. 

विवाहानंतर अल्पावधीतच विवाहसौख्य पूर्णतः लाभण्यापुर्वीच ज्या नववधूचा पती निवर्तला आहे. जिचा मळवट क्षणिक ठरलाय आणि सौभाग्य अस्तास गेल्यावर तिच्या नशिबात फक्त दुःखाची अंधारी रात्रच उरलेय. अशा स्त्रीचं मूकं दुःख काय असेल त्याची कल्पना न केलेलीच बरी. पण म्हणून तिला सुख प्राप्त करण्याचा अधिकार नाही काय?
नक्कीच आहे.
 वैधव्याचं शुभ्र वस्त्रच जिच्या आयुष्याची ओळख बनलंय, तिला तिच्या पांढऱ्या कपाळावर पुन्हा प्रेमाची नवी चंद्रकोर सजविण्याचा तिला अधिकार नाही काय? नक्कीच आहे. 
वैधव्याची शुभ्रज्योत्स्ना लपेटल्यावर प्रेमाच्या चंद्रकोरीच लेणं भाळावर मिरविण्याचा अधिकार तिला नाही काय?
नक्कीच आहे. 
असंही कविला यातून सुचवायचे असेल . . . . 

_कुसुंबी दुःखाच्या पडद्यामागे_
_ये घेऊनी रात्र कोवळी_
_पिधानयुतीचा मांडू जागर_
_क्षितिजी उधळू आभा सावळी_

संध्याकाळची काळसर तांबडी (कुसुंबी) रंगछटा जणू येणार्‍या दुःखरुपी रात्रीची पूर्वसुचना देत आहे. संध्यासमयी रात्र ही पुर्ववयात म्हणजे कोवळी असते. दुःखाची सुरुवात सुद्धा हृदय असे कोमल, हळवे, कोवळे झाले की होते. चंद्र-शुक्राची पिधानयुती याच समयास होत असताना क्षितीज हळू हळू सावळे होत जाते. रात्रीचा पहिला प्रहर सुरू होतो याचे वर्णन आणि त्याच बरोबर दुःखमुक्तीसाठी जागर मांडण्याची कवीकल्पना अप्रतिमच होय.
          लाल क्षितिजावर काळसर-लाल झालेल्या कुसुंबी रंगाच्या संध्याकाळची उपमा कवीने कुंकूम सौभाग्य हरवलेल्या कोवळ्या तरूण विधवेला दिली आहे तिलाही रात्रीचं अनुपम सुख हवंय. कुसुंबी पडद्याआडून शुक्र जसा चंद्राशी पिधानयुती करतो, त्याचप्रकारे अकाली वैधव्य लाभलेल्या या चंद्रालाही सुखाची प्राप्ती देणारा शुक्ररूपी प्रियकर हवाय. त्याच्याबरोबर सुखाचा जागर मांडून काळ्यारात्रीतही (दुःखातही) तिच्या मनक्षितिजावर निदान सुखाची सावळी आभा पसरेल असं कवी सुचवीत आहेत . . . . . . 

_श्वास कोंदट वितळताना_
_सहवेदनांचे हिमल दहिवर_
_व्याख्या सुखाची नवी पाहुनी_
_उषेलाही यावा गहिवर_

       दुःखमुक्तीचा जागर मांडला असताना मनाचे कोंडलेल्या अवस्थेतून मोकळे होणे, कोंदटलेले श्वास वितळत जाण्याप्रमाणे कवी दर्शवितात.  तरी सुद्धा सहवेदनांचे हिमल म्हणजे बर्फाळ दव अजूनही मनाला व्यापून आहेच, परंतु दुःखमुक्ततेसाठीच्या जागरातून प्रतीत होणारी सुखाची व्याख्या पाहून उषेला सुद्धा गहिवरून आलंय. त्यामूळे आता मनातील दुःखरूपी अंधार संपून नवप्रतिभेची उषा नक्कीच येणार, हे कवी सुचवीत आहेत.

       जिचं संपूर्ण आयुष्य कोंदट झालंय. समाजनियमाच्या मर्यादांचे बंधन जिला सर्वप्रकारच्या सुखापासून वंचित ठेवतंय. मुख्यता तिच्या वयातील तरूण तरुणींना शरीर सुखाची असलेली नैसर्गिक ओढ आणि मर्यादा यांमध्ये कोंदटलेल्या मनोवस्थेत ती आहे. तिने प्रियकरासह यातून बाहेर पडायचे ठरवले आहे. प्रियकरासह मिलन होताच हे कोंदटलेले श्वास जणू वितळत आहेत आणि परिणामभूत त्यांची गोड शिरशिरी म्हणजेच संवेदनांचे हिमल दहिवर अंगभर उठतंय. तिच्या आयुष्याला सुखाची एक नवी व्याख्या लाभलेय आणि येणारी नवीन उषा तिच्यासह नवीन सुखाच्या अनुभवाने गहिवरली आहे.

कवी डॉ. काळे यांनी अकाली वैधव्य आलेल्या दुर्दैवी नवविवाहीतेचे दुःख, तिच्या मनातील नवथर सुखाची मंथर ओढ, पुन्हा फुलारण्याचे स्वप्न पहाणारी, नव्याने आयुष्यात येऊ पहाणारी पण समाजनियमांना अमान्य प्रीत, या सगळ्याची संध्याकाळ, पिधानयुती, उषा या नैसर्गिक, खगोलीय व कालसुसंगत घटनांशी सुरेख सांगड घालत कवितेला एकाचवेळी दोन रूपात सजवले आहे.

एक आशयघन कविता वाचल्याचा आनंद मिळाला, शिवाजीराव काळे यांचे आभार !

                                           -  शारदात्मज.
                                           (अभिजीत काळे.)