***
शांततेला शब्द हृदयाचा कळावा एकदा
स्पंदनांचा नाद कानी साठवावा एकदा
प्राण म्हणजे काय नक्की समजण्यासाठी तरी
एक ठोका काळजाचापण चुकावा एकदा
उत्तरे जर पाहिजे असतील प्रश्नांची खरी
आरसा अपुल्या मनाला दाखवावा एकदा
जानवे जर विठ्ठलाने घातले आहेच तर
सोवळ्याचा अर्थ त्याने उलगडावा एकदा
शब्द स्पर्शाने कुणी ओळख कशी घ्यावी तुझी
नेणिवेला निर्गुणाचा लाभ व्हावा एकदा
आजवर दुर्लक्ष तू केलेस कर, मर्जी तुझी
श्वास हा मरण्या अगोदर दरवळावा एकदा
रंगुनी रंगात उपर्या रंगलो नाही कधी
जन्मतः जो लाभला तोही निघावा एकदा
- अभिजीत काळे.
६ मार्च २०२०.
No comments:
Post a Comment