Friday, 23 September 2022

भावडोह

***

चार पापण्या तुझ्या लाजरी लाजाळूची पाने
अलगद मिटती गालावरल्या ओठांच्या स्पर्शाने

तुझ्यापासुनी मला स्वतःला कसे बसे मी जपतो
धडधड वाढे आत अनामिक केवळ तू दिसल्याने

चाल अशी की मानेवरती तलवारीचे पाते
किती चिरडलिस कोमल हृदये तू पदलालित्याने

हसू म्हणू की स्वप्न गोड ते पहाट वेळी पडले?
अंधारावर वीज तळपते रत्नखचित हसण्याने

प्रेम कधीही केले नाही जीवनभर ज्या कोणी
गर्वाच्याही पुढच‍ा टप्पा कुठे पाहिला त्याने

तुला स्पर्शुनी उधळत येते हवा जणू श्रीमंती
कोटी रंध्रारंध्रांतुन मी मोहरतो गंधाने

भावडोह तो अथांग गुढश्या डोळ्यांमधला गहिरा
कसे बुडालो कळतच नाही काठावर बसल्याने

                                 ~ अभिजीत काळे.
                                   १५ जुलै २०२०.

Tuesday, 13 September 2022

भाउंच्या "मी" गझलचे रसग्रहण


...

बुडालो खोल इतका की परत फिरणे विसरलो मी
तिचे बाहेर डोहाच्या.......उभे असणे विसरलो मी

पुढे अज्ञात वाटांनी........ भिती वाटू दिली नाही
जगाला ज्ञात वळणांवर जरी वळणे विसरलो मी

कळाले सत्य जगण्याचे स्वतः निर्माल्य झाल्यावर
कदर होते सुगंधाची .....तिथे फुलणे विसरलो मी

तिच्या चवदार हातांची स्तुती केली जरी वरवर
व्यथेच्या मंद आचेवर तिचे शिजणे विसरलो मी

कदाचित वाहिले असते ......इथेही पाट अश्रूंचे
बरे झाले जुन्या गोष्टी जतन करणे विसरलो मी

कुणी सांगायची होती .......मला पद्धत निरोपाची
कसा वळुनी विनाकारण पुन्हा बघणे विसरलो मी

लव्हाळी आज आठवली कणा मोडून पडल्यावर
झुकाया पाहिजे होते ....तिथे झुकणे विसरलो मी

कुणी आभार मानावे अशी नव्हती कधी इच्छा 
तरी सत्कार घेताना.. नको म्हणणे विसरलो मी

मनाने आग भडकवली.........उडाली राख देहाची
कुणी विझवायच्याआधी स्वतः विझणे विसरलो मी

किती दमछाक शब्दांची..... अपेक्षा पूर्ण करताना
स्वतःच्या आवडीची मग गझल सुचणे विसरलो मी

मिळाली मेजवानी मज .......इथे एकाच जागेवर
सवय झाली खुरडण्याची नभी उडणे विसरलो मी

             >>>>> डॉ. शिवाजी काळे.

*बुडालो खोल इतका की परत फिरणे विसरलो मी*
*तिचे बाहेर डोहाच्या.......उभे असणे विसरलो मी*

कोणी आपलं आपल्यासाठी तळमळतंय आणि आपण मात्र आपल्याच धुंदीत आहोत किंवा माझ्यात गुंतलेला मी माझ्याशिवाय माझ्या परिघात अजून कोणी आहे हेच विसरलाय, अथवा स्वमग्नतेच्य‍ अंधकुपातला मंडूक मी कुपाबाहेरील विश्वाला इतका विसरून  बसलो की मला माझ्याशिवाय कोणाचीही आठवण राहिली नाही. अशा अनेक अर्थांनी अनेक पदरांमधे दडलेला एकेक अर्थ सोलत उलगडत जाणारा मतला. 
तिचे म्हणजे कोणाचे? माझ्यावर जीव ओवाळून टाकणार्‍या व्यक्तीचे? की, अहंतारूपी काळोखात बुडालेल्या मानाचे? की, ज्ञानरूपी उजेडात वाट पहाणार्‍या बुद्धीचे? मतल्याने माझ्यातील जिज्ञासू वाचकाला भूरळच घातली आणि सुरू झालं शब्दरस‍ाला ओरपणं मग एकटाच का आनंद उपभोगू ? या तुम्हीपण सामिल व्हा.

ह्या गझलेची रदीफ्  'मी' हा एकाक्षरी शब्द आहे हे स्पष्ट दिसत असले तरी हा मी प्रथमपुरूषी एकवचनी नाहीये. हा स्वत्वातला अमूर्त मी आहे जो शब्दांत मूर्त होत. वेगवेगळ्या आशयवळणांनी खळाळत वाहत आहे. चला तर त्या खळाळण्याचा हा लयबद्ध आनंद अनुभवूया. 

*पुढे अज्ञात वाटांनी........ भिती वाटू दिली नाही*
*जगाला ज्ञात वळणांवर जरी वळणे विसरलो मी*

ज्ञात वाटांवरची वळणे विसरून मुद्द‍महून स्वीकारलेला आज्ञाताचा प्रवास अधिक मनोरंजक आणि रोमहर्षक असणारच ना? मग ज्ञात वळणांपेक्षा अज्ञातातील गूढानुभूती घेण्याचा निर्णय प्रवाशाने न घेतला तर नवलंच. अज्ञाताचा प्रवासी होणं ही वरकरणी भितीदायक अशीच गोष्ट पण त्या अज्ञातातल्या मुशाफिरीचा रोमांचक आनंद विलोभनीय असतो.  तसंही ज्ञातातल्या प्रवासातील आगामी संकटांचा अंदाज लावणं सोपं असतं आणि मग त्यांची तजवीज आधीच करण्यात प्रवासाचा अर्धा आनंद आपण काळजीला देऊन टाकलेला असतो. आज्ञाताच्या प्रवासाची आतुरता मात्र मनाला शंकाकुशंकांच्या पार नेते प्रवास अनुभवण्याची ओढ सदैव प्रवाशाला आनंदी ठेवते असंच काही हा शेर बोलतोय.

*कळाले सत्य जगण्याचे स्वतः निर्माल्य झाल्यावर*
*कदर होते सुगंधाची .....तिथे फुलणे विसरलो मी*

स्वत्वातच स्वतःला गुरफटून घेऊन निर्माल्य होण्याची वेळ आल्यावर; आपणही योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन स्वतःसह इतरांना आनंद देण्यास मुकलो ही सल जास्त दुःखदायक.

*तिच्या चवदार हातांची स्तुती केली जरी वरवर*
*व्यथेच्या मंद आचेवर तिचे शिजणे विसरलो मी*

एकंदरीत राहून गेलेल्या गोष्टींची काटेरीमाळ शेरागणिक गुंफत व्यथांची मालिका पुढे चालली आहे. काही वेळा आपण काही गोड शब्द बोलून एखाद्याची स्तुती करतो. तसंही स्वर्थापोटीसुद्धा कुणाची स्तुती आपण केलेली असू शकते मात्र आपल्यावर जीव ओवाळून टाकणार्‍या आपल्या माणसाजवळ आपण त्याच्याबद्दल कधी भरभरून बोललेलो आहोत का याचंही सिंहावलोकन एकदा करावं माणसानं. बर्‍याचदा वेळ मारून नेण्याकरता आपण आल्यामाणसाची वरवर स्तुती केलेली असते अनेकदा ती खरोखर मनापासून केलेय का हा ही प्रश्न असतो. असो.. आपल्या प्रियव्यक्तीची छोटीछोटी दुखणीसुद्धा आपल्याला कळू नयेत? खरेच; आपल्या नेणीवांची जाणीवच जास्त व्यथित करणारी असते.

*कदाचित वाहिले असते ......इथेही पाट अश्रूंचे*
*बरे झाले जुन्या गोष्टी जतन करणे विसरलो मी*

अहो, दुःखदायक प्रसंग आयुष्यात कमी होते का? आपल्या मनाचं हे जादुईपणंच म्हणायला हवं की दुःखदायक क्लेशकारक प्रसंग ते सोईन विसरतं आणि आनंदाच्या शोधात पुढे चालत राहातं. पुढे कधीतरी जीवनात आलेली दुःखं आठवली तरी ती आनंदाश्रूंच्या कळ्यांचाचा वर्षाव करतात आणि आपण मनाशी म्हणतो बरे झाले त्यातले बरेचसे विसरत गेलो अन्यथा अश्रूंचा पाट अनिवार्यच होता! होय ना? 

*कुणी सांगायची होती .......मला पद्धत निरोपाची*
*कसा वळुनी विनाकारण पुन्हा बघणे विसरलो मी*

पहा, कसा हा मी असा विसरभोळा! खरेच विसरभोळा की, अत्ममग्न रमताराऊत? की मला एकदा कधीतरी निरोप घेण्याची वेळ येणार आहे याबद्दल अनभिज्ञ? अहो, निरोपाचीही काही प्रथा असेलच ना ? असेल तर ती निरोप घेण्याची? की निरोप देण्याची? काहीही असो निरोप घेताना मागे वळून पहायचेही विसरलोय मी; कुणीतरी आठवण करून द्यायला हवी होती का? की भावविवशतेने अश्रूंत बुडालेला माझा चेहरा कुणाला दिसू नये म्हणून मी मागे वळून पाहीले नाही? वा मला निरोप देताना दुःखी झालेले चेहरे बघवणार नाहीत म्हणून मी वळून पाहिले नाही??? निरोपाची तर्‍हाच अजब!

*लव्हाळी आज आठवली कणा मोडून पडल्यावर*
*झुकाया पाहिजे होते ....तिथे झुकणे विसरलो मी*

आज मागे वळून पाहाताना आपण कुठल्या तोर्‍यात कोणत्या भ्रमात जीवनप्रवास करत आलोय याची जाणीव होतेय. तुकोबांनी दिलेला लव्हाळ्याचा दृष्टांत आपण आयुष्यभर कुठेनाकुठे कधीनाकधी ऐकत वाचतच आलो पण अंगीकारण्याची तो शुद्ध कुठे हरपली होती आपली तेव्हा? आज मात्र ताठ कण्याने जीवनाच्या गुरुत्वाकर्षणासमोर सपशेल शरणागती पत्करल्यावर ती लव्हाळी आठवतायेत. जाणिवेत आल्यावर शहाणपणा आला की, चुका केल्या नाहीतच का मी कधी? त्यातही मीच मला दिलासा देतोय की, होय झाल्याही असतील कधी अनावधानाने किंवा केल्याही असतील कधी हेतूपुरस्सर पण, आज मात्र ते प्रांजळपणे कबूल करण्याची वेळ आलेय... नक्कीच.

*कुणी आभार मानावे अशी नव्हती कधी इच्छा*
*तरी सत्कार घेताना.. नको म्हणणे विसरलो मी*

  उपाधीविरहीत जीवनाचा आनंद वेगळाच असतो. ना कुठल्या आनंदाने हुरळून जाणे, ना कुठल्या दुःखाने शोकविलापित होणे. हेच, होय अगदी हेच टाळत आलोय मी आजवर ह्या उपाध्या हे आभार हा मोठेपणा कधी नकोच होता मला. अहो मुंगी होऊन साखर खाणं शिकवलंय आपल्याला तुकोबांनी. मग हा कोणता मोह? ती ही कोणती मनाविरूद्ध गेलेली अनावर इच्छा सत्कारमुर्ती होण्याची? 'अनिच्छन्नपी... बलादिव नियोजितः।'...???

*मनाने आग भडकवली.........उडाली राख देहाची*
*कुणी विझवायच्याआधी स्वतः विझणे विसरलो मी*

आपलं (म्हणजे माणसाचं हो) मन आपल्याला कुठेकुठे फिरवून आणेल आणि कधी कुठे बंदीस्त काळ्यापाण्याची सजा देईल हे कळणंही तसं कठीणच हो. अहंकाराच्या कैदेत मनाने एकदा देहाला सडवलं की देहाची राख होईपर्यंत किंवा कोणी गर्वहरण करेपर्यंत त्या कैदेतून सुटका होणं अवघडंच. आजकाल पुराणातल्या गोष्टींसारखं कोणी रूप पालटून गर्वहरण करायलाही येत नाही आणि स्वतःची स्वतःलाच उपरती होणं, हे तर त्याहूनही अशक्य. होय, त्यामुळेच पुढे सगळ्याची राख होणे क्रमप्राप्त होते आणि राख होऊनही विझलोय कुठे अजूनही अपूर्ण कामनांच्या अग्नीत धुमसतोयच मी अगदी सुक्ष्मातीसूक्ष्म रुपातही हे धुमसणं थांबलं नाहीये. 

*किती दमछाक शब्दांची..... अपेक्षा पूर्ण करताना*
*स्वतःच्या आवडीची मग गझल सुचणे विसरलो मी*

गझल सुचते काय? की, ती एक अतृप्त भावना असते शब्दच्छल करत मेंदुला दमवणारी? आणि... अपेक्षा तरी कुणाच्या? कोणत्या ? की मी माझ्याबरोबरच शब्दांचीही दमछाक करत आलोय. आतामात्र वाटतंय की मी गझल लिहिताना अलगद तिच्या तंत्रात गुरफटून जातो तिच्या मायावी पाशाच्या विळख्यात आडकल्यावर स्वतःला सोडवता सोडवता सगळ्या पंक्तीप्रपंचात मला खरोखरच जी मनापासून लिहायचीय ती माझ्या आवडीची गझल कुठेतरी दूर राहून गेल्यासारखं वाटतयं. तिला कागदावर अजून उतरवूच शकलो नाहीय मी.

*मिळाली मेजवानी मज .......इथे एकाच जागेवर*
*सवय झाली खुरडण्याची नभी उडणे विसरलो मी*

कृतींची, विचारांची गरूडभरारी घेण्याची पात्रता अंगी बाळगणारा मी. जागच्या जागी सारं ऐश्वर्य प्राप्त झाल्यावर सुवर्णाच्या पिंजर्‍यात हिर्‍यामोत्यांचे घास सहजपणे लाभल्यावर मलाच कोंडून, डांबून घेतलंय खुरडतोय मी, माझी दिव्य प्रतिभा विसरून.
आता मात्र वाटू लागलंय की,
*"ऐ ताइर-ए-लाहूती उस रिज़्क़ से मौत अच्छी*
*जिस रिज़्क़ से आती हो परवाज़ में कोताही"*
           - अल्लामा (मोहम्मद) इक्बाल.
हे गरुडभरारी घेणार्‍या पक्ष्या! ज्या (गुलामगिरीच्या) जीवनामुळे तुझ्या उत्तुंगभरारीत कमतरता येत असेल त्या जिण्यापेक्षा मरण (खचितच) श्रेयस्कर होय.

डॉ.श्री. शिवाजी काळे सर उर्फ आम्हा गझलमित्रांचे 'भाऊ' यांच्या या गझलेने रसग्रहणाच्या लिहिण्याच्या मोहात पाडलं.

                               - अभिजीत काळे.