Sunday, 26 December 2021

किनारे

***

जरी घोंघावते वादळ किनारे झोडपत आले.
किनारे त्यापुढे नमले..! कुठे? ते तर लढत आले

हृदय निर्मळ जसे झाले.. नयनही ओघळत गेले
कुटिल हेतू सरळ झाले शरण पायालगत आले.

तुझ्या गंधात माझेपण उरावे काय कस्तूरी?
तुझा सहवास की उपकार? जीवन दरवळत आले!

उभे आयुष्य एखाद्या मदार्‍या सारखे होते. 
मनाच्या माकडाला जे दटावत नाचवत आले.

कधी रागावली आई, कधी तर मारले सुद्धा. 
मला ते आजवर संस्कार सारे वाचवत आले.

हरवलेलो खरे आपण.. कसे मग भेटलो पुन्हा?
किती अंधार होता? मन मनाला चाचपत आले.

भटकलो फार वेळा मी, चुकत गेल्या जरी वाटा.
प्रकाशाचे नवे रस्ते.. नव्या गावी निघत आले.

                                   ~ अभिजीत काळे.
                                   २४ डिसेंबर २०२१.

लीन

***

लीन खरे तो तनामनाने होता झाला
शंकांच्या पण लाख कसोट्या नम्रत्वाला

सुचले नाही थांबवणे जर यातायाती
पोकळतेला फक्त म्हणावे गेला-आला

कोण ठरवतो, अर्थ कशाला ? सार्थ कुणाचे?
ज्याच्ये त्याच्ये महत्त्व असते ना जगण्याला?

खड्डे, साली, काटे, यांच्या असण्याने तर
मार्ग मिळाला आदर्शाचा आयुष्याला

प्रत्येकाने आपआपले मत ठरवावे
कसे पहावे? बंधन नाही त्या बघण्याला

असली नकली, स्वयंसिद्ध वा रट्टेबाजी
किंमत येथे समीक्षणाने साहित्याला

कोण विचारी वैशिष्ट्याला अन् कष्टाला?
पैसा असता उंची मिळते खुजेपणाला!

अहंकारही समोर त्याच्या उगी राहिला
नम्रत्वाचे किती धुमारे व्यक्तित्वाला

'नाचीज़' तुला खरेच दुनिया कळली नाही
किंमत नाही जगात काही सौजन्याला 

                             ~ अभिजीत काळे.
                              १५ डिसेंबर २०२१.

जीवन म्हणजे....

***

माती, पाणी, चाक नि मडके एकसामाईक चलच्चित्र हे
पडणे, झडणे, घडत रहाणे, जीवन म्हणजे बदल गड्या रे!

क्षण एखादा अवचित येतो नवीन काही धडा शिकवितो
अज्ञानाची आपआपल्या ओळख पुन्हा घडवून जातो
नव्या ऋतूला जाणत जाता आनंदाचे होते गाणे
पडणे, झडणे, घडत रहाणे, जीवन म्हणजे बदल गड्या रे!

मृत्यूसंगे दोन हात कर शीर घेउनी तळहातावर
केविलवाणे मरण नको ते जगण्याच्या हव्यासाखातर  
लाचारीचे नकोच जीवन असते नसणे असूनही जे 
पडणे, झडणे, घडत रहाणे, जीवन म्हणजे बदल गड्या रे!

अफाट आहे अजून शिल्लक जे जे येते स्वीकारत जा 
चेतास्फूर्ती मतीस देण्या तू बंध नव्याने सांधत जा
झडलेल्यांना अर्पून तर्पण नवांकुरांना जागा दे रे
पडणे, झडणे, घडत रहाणे, जीवन म्हणजे बदल गड्या रे

                                                ~ शारदात्मज.

Tuesday, 7 December 2021

कस्पटे

***

जाळल्या चिठ्ठ्या, हवेवर कस्पटे त्यांची उडाली.
प्रेम असते काय नक्की? ही कशी शिक्षा मिळाली?

पांगळ्या इच्छा पळाल्या गाठला त्यांनी किनारा,
वाढल्या आशा पुन्हा.. अन् पूर्तता गोत्यात आली.

धर्म असतो प्रेम ज्यांचा ते कुठे करती दिखावा?
खूप दाखवतात चिंता तेच जे बाहेरख्याली!

कर्जबाजारीपणाने मन जरा ताब्यात होते.
पण उधारी माफ होता भूकही शिरजोर झाली.

शब्द वार्‍याला दिले मी सोडण्या आधी धरा ही.
काळजी वाटेल तेव्हा ऐक तू माझी खुशाली.

स्वप्न कुठले पाहिलेले अन् कुठे आहे अता मी?
काल आम्ही भेटल्यावर ती असे काही म्हणाली.

अस्मिता नव्हतीच शिल्लक नेभळट हृदयात त्यांच्या,
पेटण्याआधीच होत्या आतल्या विझल्या मशाली.

घोळवत बसणे नको त्या आठवांची तीच शाई,
कर सही वा फाड कागद सामना व्हावा निकाली.

आत्मनिंदेला खुशीने नेहमी माफी दिल्यावर
आत्म प्रौढीची खुमारी संपवत ईर्षा पळाली

फाटले कापड मनाचे लक्तरे उरलीत आता
भोगतो आहे सुखाने मी विरक्ती भाग्यशाली

मी दिला माझ्या मनाचा दुश्मनाला सातबारा
लागले नंतर निघावे राख मज ठेवून खाली

 बासरीचा सूर झाले ओठ माझ्या सावळ्याचे
आजच्या ओठांत केवळ रंगते 'नाचीज' लाली

                         ~ 'नाचीज' अभिजीत काळे.
                                 सात/बारा-२१.