*रेख्ते के तुम एकही उस्ताद नही हो 'गालिब'।*
*कहते है किसी जमानेमे 'मीर' भी था।*
महान संतकवी नामदेव महाराजांनी म्हटलंच आहे की,
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझिया विष्णूदासा भाविकांसी।
'कवी' म्हणजे की अखील जगताचा कैवार घेणारे, संवेदनशील, समृद्ध जाणिवा असलेले मानवविशेष व्यक्तिमत्व होय. जीवनाला स्पर्श करणार्या प्रत्येक पैलूवर कवी अभिव्यक्त होत असतो. मीर, गालिब, फैज, जौक, दाग, अल्लामा इक्बाल, फिराक, जिगर, साहिर, राहत, निदाँ आणि जौन एलिया असे अनेक शायर उर्दू गझल परंपरेला अलंकृत करून गेले.
ज्याने आपल्या गझलेच्या माध्यमातून उर्दू काव्यविश्वात आपला दबदबा निर्माण केला त्या गालिबनेही अहंपणाचा वारा आपल्यापर्यंत येऊ नये याची काळजी घेतली असावी म्हणूनच की काय, त्याने वरील शेर लिहिला असावा पण या दोन मिसर्यातून गालिब 'मीर'ची उर्दूकाव्यातील बादशाही देखील मान्य करतो.
हा 'मीर' होता तरी कोण?
ज्या काळात फारसी भाषेतून लिहिणार्या कवींना राजाश्रय होता त्या काळात जन्माने हिंदुस्थानी असणार्या उर्दू (रेख्ता) भाषेमध्ये 'खुदा-ऐ-सुखन' मीर तकी 'मीर' याने गझल लिहिली. उर्दूला घडविणार्या कवींमध्ये मीरचं नावही अग्रस्थानी आहे.
अाग्र्यात जन्मलेल्या व दिल्लीमध्ये आयुष्य घालवलेल्या मीरने अहमदशाह अब्दालीच्या दिल्लीवरील आक्रमणानंतर शेवटच्या काळात लखनौला नवाब असफउद्दौलाकडे आश्रय घेतला. मुलगी, पत्नी व मुलाला गमावल्यानंतर एकाकी आयुष्य जगावं लागलं. यामुळेच की काय मीरच्या काव्यात त्याचं दुःख, त्याच्या वेदना उतरल्या आहेत. 'मीर'च्या शायरीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सहजता व समजण्यास सुलभ असं लेखन. त्यामुळेच गालिब म्हणतो, "ज्याला मीर कळत नाही तो अशिक्षित होय."
मीरचे काही शेर पाहूयात,
_इब्तिदा-ए-इश्क़ है रोता है क्या_
_आगे आगे देखिए होता है क्या_
हा प्रेमाचा आरंभ आहे. ही प्रेमाची वाटचाल आत्ताच तर सुरू झालीय अजून खूप अंतर कापायचं आहे. आताच काय रडतो आहेस पुढे पुढे पहा बरंच काही घडणार आहे.
_याद उस की इतनी ख़ूब नहीं 'मीर' बाज़ आ_
_नादान फिर वो जी से भुलाया न जाएगा_
तिची आठवण चांगली गोष्ट नाहीये 'मीर' वेळीच सावर. अरे वेड्या, तिने एकदा हृदय काबिज केलं तर पुढे तिला विसरणं महामुश्किलंच.
हिंदी चित्रपट सृष्टीलाही गाण्यांमध्ये मीरचे शेर वापरण्याचा मोह आवरला नाही. मीरचे शेर वापरून लिहिलेली ही हिंदी गाणी आठवतात का पहा,
_पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है_
_जाने न जाने गुल ही न जाने बाग़ तो सारा जाने है_
बाजार चित्रपटातील ही प्रसिद्ध गझल सर्वांनी एेकली असेलच,
_दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया_
_हमें आप से भी जुदा कर चले_
मीरच्या लेखणीची सहजता तर पहा,
_उल्टी हो गईं सब तदबीरें कुछ न दवा ने काम किया_
_देखा इस बीमारी-ए-दिल ने आख़िर काम तमाम किया_
_अहद-ए-जवानी रो रो काटा पीरी में लीं आँखें मूँद_
_या'नी रात बहुत थे जागे सुब्ह हुई आराम किया_
_आवेगी मेरी क़ब्र से आवाज़ मेरे बाद_
_उभरेंगे इश्क़-ए-दिल से तिरे राज़ मेरे बाद_
_बाद मरनेके मेरे कब्र पर अाया वो मेरी_
_याद आयी मेरे इसा को दवा मेरे बाद_
_न सोचा न समझा न देखा न जाना_
_मुझे आगया खुदबखुद दिल लगाना_
गालिब, फैज अहमद फैज, जौक, दाग सगळ्यांनीच मीरचं श्रेष्ठत्व मान्य केलं.
_हस्ती अपनी हबाब की सी है_
_ये नुमाइश सराब की सी है_
आपलं आयुष्य (आपलं अस्तित्व) एखाद्या हबाब म्हणजे बुडबुड्यासारखं (क्षणभंगुर) आहे. वरवर पहाता हे आयुष्य म्हणजे मृगजळासमान (सराब) एक भास आहे. वरकरणी हे दर्शन पाण्यासमान दिसत असलं तरी तो एक वृथा भासच आहे. तसं पहाता शंकराचार्यांनी मांडलेल्या 'जगत मिथ्या' तत्वज्ञानाशी हा शेर पूरकता दर्शवतो.
जीवन विषयक चिंतन आपल्या गझलेतून मांडताना गंभीर होऊन लिहिणारा 'मीर' प्रेम व प्रमपात्राविषयी बोलताना मात्र साध्या सरळ शब्दांतून व्यक्त होतो.
_नाज़ुकी उस के लब की क्या कहिए_
_पंखुड़ी इक गुलाब की सी है_
प्रेमाग्नीने पोळलेले हृदय या हळव्या गोष्टीबद्दल बोलताना 'मीर'ची विनोदबुद्धीही दिसून येते.
_आतिश-ए-ग़म में दिल भुना शायद_
_देर से बू कबाब की सी है_
_देखिए अब्र की तरह अब के_
_मेरी चश्म-ए-पुर-आब की सी है_
आणि अाता काही पाहिलं तरीही ते ढगांच्या धूसर पडद्याआडून पाहिल्यासारखंच दिसेल कारण डोळ्यांत आसवांचा पूर आलाय त्या पाण्यामुळे दिसणार तरी काय? दुःखाचा हा पाणीदार आविष्कार होय.
एका गझलेत मीर म्हणतो,
_होश जाता नहीं रहा लेकिन_
_जब वो आता है तब नहीं आता_
_इश्क़ को हौसला है शर्त अर्ना_
_बात का किस को ढब नहीं आता_
_जी में क्या क्या है अपने ऐ हमदम_
_पर सुख़न ता-ब-लब नहीं आता_
_दूर बैठा ग़ुबार-ए-'मीर' उस से_
_इश्क़ बिन ये अदब नहीं आता_
प्रेम काय आहे हे सांगताना 'मीर'चे शेर प्रेमात रंगून जातात प्रेमाने जखमीही होतात. साध्या सरळ शब्दांत मीर खूप काही सांगून जातो,
_क्या कहूँ तुम से मैं कि क्या है इश्क़_
_जान का रोग है बला है इश्क़_
_इश्क़ ही इश्क़ है जहाँ देखो_
_सारे आलम में भर रहा है इश्क़_
_इश्क़ मा'शूक़ इश्क़ आशिक़ है_
_या'नी अपना ही मुब्तला है इश्क़_
_दिलकश ऐसा कहाँ है दुश्मन-ए-जाँ_
_मुद्दई है प मुद्दआ है इश्क़_
_कोई ख़्वाहाँ नहीं मोहब्बत का_
_तू कहे जिंस-ए-ना-रवा है इश्क़_
तू म्हणतोस की कोणी आपणहून प्रेम मागत नाही अरे प्रेम म्हणजे न मागण्यासारखी गोष्ट आहे काय?
_'मीर'-जी ज़र्द होते जाते हो_
_क्या कहीं तुम ने भी किया है इश्क़_
मीर (दुःखाने) निस्तेज (पिवळा) पडत चालला आहेस तू पण कधीतरी प्रेम केलं आहेस काय?
'मीर'ची ही गझल ज्याने एेकली नाही असा रसिक विरळाच होय,
_देख तो दिल कि जाँ से उठता है_
_ये धुआँ सा कहाँ से उठता है_
_गोर किस दिलजले की है ये फ़लक_
_शोला इक सुब्ह याँ से उठता है_
_ख़ाना-ए-दिल से ज़ीनहार न जा_
_कोई ऐसे मकाँ से उठता है_
या हृदयाच्या कप्प्यातून हे हृदयात वास करणार्या जाऊ नकोस कोणी असं अचानक स्वतःचं घर सोडून जातं काय?
_नाला सर खींचता है जब मेरा_
_शोर इक आसमाँ से उठता है_
माझ्या आतली बेचैनी जेव्हा जेव्हा मला चिंताग्रस्त करते तेव्हा जणूकाही आकाशातून प्रचंड गदारोळ उठतो
_लड़ती है उस की चश्म-ए-शोख़ जहाँ_
_एक आशोब वाँ से उठता है_
जिथे जिथे तिची जादुई नजर भिडते तिथे तिथे उलथापालथ होते.
_सुध ले घर की भी शोला-ए-आवाज़_
_दूद कुछ आशियाँ से उठता है_
घरातल्या दुःखी अवाजांची झळही समजून घे घरट्यातूनही काही धूर निघतो आहे.
_बैठने कौन दे है फिर उस को_
_जो तिरे आस्ताँ से उठता है_
_यूँ उठे आह उस गली से हम_
_जैसे कोई जहाँ से उठता है_
_इश्क़ इक 'मीर' भारी पत्थर है_
_कब ये तुझ ना-तवाँ से उठता है_
अरे प्रेम म्हणहे एक मोठा शिलाखंडच जणू तो तुझ्यासारख्या कमजोर माणसाकडून थोडाच उचलला जाणार आहे 'मीर'.
'खुदा-ए-सुखन'
जनाब मीर तकी 'मीर'
_लुत्फ उठाते चलो दिलसें अशआँरो का_
_के खुदा-ए-सुखन नाँज-ए -सुखनवर है 'मीर'_
- अभिजीत काळे.