आश्चर्य . .
जगतोय मी आश्चर्य ना, याचे कुणालाही बरे!
मेल्यावरी म्हणतील हा जगला कधी?... मेला खरे.
भासात सरतो तो दिवस, श्वासांस रात्री गंध ये
असता जवळ ती नेहमी घडती अशी स्थित्यंतरे . .
माया, जिव्हाळा, प्रेम अन् मैत्री जिथे वसते सदा,
हृदयांस हळव्या भाबड्या.. म्हणता तुम्ही का? 'अंतरे'..
बोलून जाते ती.. तिला कळती कुठे परिणाम पण,
मी मात्र गुपचुप लपवितो.. माझ्या मनावरचे चरे.
मी भावना चुरगाळल्या अन् फेकल्या कचऱ्यामधे.
पाणावले नाहीत नंतर पापण्यांचे कोपरे.
अंधार आहे अंंतरी नक्कीच वस्तीला तुझ्या,
शेंदूरल्या दगडापुढे झुकते तुझे मन घाबरे.
दे एकदा हातात या हात कृष्णा सावळे
कैवल्य दे, रोमांच दे, चैतन्यमय प्रत्यंतरे
- अभिजीत काळे.
३ डिसेंबर २०१७
No comments:
Post a Comment