Wednesday, 27 May 2020

भान

मला जोडायचे नाही, तुला तोडायचे नाही, 
असे द्वैतातले नाते कुणा समजायचे नाही.
                                     
तुला प्यारीच आसक्ती, मला सारी अनासक्ती.
तरी ना वेगळे आपण कुणा सांगायचे नाही. 

तुझे माझे कसे जुळले? कधी का ते कुणा कळले?
तुला जाणायचे आहे, मला शोधायचे नाही.

तुला ना द्यायचे काही, मला ना न्यायचे काही, 
तुझ्या माझ्यातले अंतर तुला सोसायचे नाही. 

तुझ्या येऊन वस्तीला असा मोहामधे पडलो, 
तुझ्यासाठी पहा झालो, मला जे व्हायचे नाही.

रुपाचा वर्ण, वंशाचा तुझा तोराच तो न्यारा, 
मला आकारही नाही, मला रंगायचे नाही. 

जगाचे भान आल्यावर, स्वतःला जाणणे जमते. 
स्वतःला जाणल्यानंतर कुठे अडकायचे नाही.

                          - अभिजीत काळे.
                           ३ डिसेंबर २०१७

No comments:

Post a Comment