ठीक नव्हे
खेळविणे लोळविणे खेळण्यास ठीक नव्हे
सत्य अाणि मिथ्याचा अट्टहास ठीक नव्हे
हे करूच ते करूच रोजचेच निश्चय पण
स्वप्न फार दाखवणे तू मनास ठीक नव्हे
जायचेच आहे तर जाउयात आनंदे
दूर जवळ की पुसणे हा प्रवास ठीक नव्हे
डावा वा उजवा तो की तटस्थ फसवा हा
कोणताच स्वाभाविक पण कयास ठीक नव्हे
लाजतेस तू तिकडे बावरतो मी इकडे
अल्लडता ही असली या वयास ठिक नव्हे
दाणे दे गाणी गा उडू देत आकाशी
पिंजर्यात मोहविणे पाखरास ठीक नव्हे
पुर्वेला, माथ्यावर, पश्चिमेस मीच दिसे
फिरुनी तू, माझा तुज वृथा भास ठीक नव्हे
बोलतोय जे मी ते सत्य मान कधीतरी
नेहमीच शब्दांचा विपर्यास ठीक नव्हे
न्यायचेच आहे तर अलगद ने मृत्यो मज
लांबवणे कष्टवणे श्वास श्वास ठीक नव्हे
- अभिजीत काळे.
२७ मार्च २०१८.
No comments:
Post a Comment