Monday, 7 March 2022

तृप्तता

***

तृप्तता मिळते मनाला गीत रचताना
ती मिळो अंती चितेवर देह जळताना

वाढले ताटात त्य‍ावर हो समाध‍ानी
हाव का धरतोस सुख झोळीत असताना?

भाकरी-चटणी असो वा पंचपक्वान्ने
जे मिळो लाजायचे नाहीस जगताना

रांगणे मग चालणे, पळणे क्रमाने ये
हाच क्रम असतो जगाची रीत शिकताना

जीव संचित फेडतो येऊन जन्माला
दुःख का मानायचे मग कर्ज फिटताना?

जे कळावे वाटले कळलेच नाही ते
जे कळाले तेच ठरले फोल मरताना

तृप्त मन घेऊन जा 'नाचीज' जाताना
म्हण 'तखल्लुस राखला', विश्वात विरताना!

                     ~ अभिजीत काळे

प्रवास

***

जिवंत होता कधी तरी तो म्हणून किंमत मृतास येथे
भला कुणाला म्हणावयाला खरेच सारे उदास येथे

सशास एका पराभवाची सदैव छळते जशी निराशा
तशीच स्पर्धा सभोवतीची उदास करते मनास येथे

जुन्यानव्याच्या बकाल चर्चा, विवेक वा सद्विचार नाही!
विशिष्ट कंपू नि तोच चोथा कुठून व्हावा विकास येथे?

विचार माझाच श्रेष्ठ आहे, भिकार तुमच्या बुळ्याबढाया
फुकाच का वल्गना करू त्या? विरक्त माझा निवास येथे

नकोत तंटे नको वाद ते मनुष्यविश्वास गांजणारे
सुखी असावे उभे चराचर करूच आम्ही प्रयास येथे

अपूर्ण असताच शक्य होते मतीस त्या ज्ञानपूर्ण होणे
असून पूर्णास काय त्याचे? सुमूल्य यावे उण्यास येथे!

विशाल ब्रह्मांड पाहताना महत्व द्यावे अणोरणीया
स्थलासकालास श्रेय जे ते कणासवे द्या क्षणास येथे

तृणामृगांचे मृगासिंहांचे अशक्य आहेच सख्य होणे
कशास ठेवू घरात एका विळ्यासवे भोपळ्यास येथे

न द्वेष मत्सर, नको लढाया अवैर नांदो जगात शांती
गरीब किंवा धनाढ्य कोणी, वसा कळो तो भल्यास येथे

तुझ्या रुपाला कुणी पहावे कसे पुर‍ावेत चर्मचक्षू?
स्मृती-श्रुती, वेद-शास्त्र ,ज्ञानी थकून जाती कयास येथे!

अनेक जन्मांत आस होती सुखे मिळावी, कुठे मिळाली?
तुझा अखेरी कृतार्थ व्हावा युगायुगांचा प्रवास येथे

                                           ~ अभिजीत काळे.

मी कुठे चुकलोच नाही

***

निर्णयाला वाटते की मी कुठे चुकलोच नाही
ठाम! त्याला वाटते की मी कुठे चुकलोच नाही

चांगले दिसणार नाही चांगल्या गोष्टींत त्याला
दुर्जनाला वाटते की मी कुठे चुकलोच नाही

लावली कळ शांततेला, भांडणाला तोच कारण   
अन् खळाला वाटते की मी कुठे चुकलोच नाही

हा चुकीचा, तोच चुकला, दोष सार्‍यांचेच दिसले
चूक', ज्याला वाटते की मी कुठे चुकलोच नाही

"होय मी चुकलोय" म्हटलो, चूक दाखवलीस तेव्हा
पण, मनाला वाटते की मी कुठे चुकलोच नाही
 
'वाकडी असतील पडली पावले, आहे सरळ मी'
वाकड्याला वाटते की मी कुठे चुकलोच नाही

तोच प्रामाणिक नसावा आपल्या अंतर्मनाशी
ज्या कुणाला वाटते की मी कुठे चुकलोच नाही

                                     ~ अभिजीत काळे.

ती जशी सोडून गेली

***

भावनांचे बांध फुटले ती जशी सोडून गेली
काळजाचे गीत रडले ती जशी सोडून गेली

भेटलो जेव्हा तिला मी, ओळखत नव्हतो सुखांना
ते सुखांचे ओघ सरले ती जशी सोडून गेली

चार दिवसांचे उणे जे लाभले आयुष्य आहे
त्यातलेही दोन अडले ती जशी सोडून गेली

आवडीने गात होतो जीवनाचे गोड गाणे 
दुःख त्यालाही लगडले ती जशी सोडून गेली

रंगगंधांनी फुलांनी डवरलेले झाड होतो
रंग झडले गंध विरले ती जशी सोडून गेली

गलबताला ना किनारा, ना शिडावर स्वार वारा
जग-दिशा सारे हरवले ती जशी सोडून गेली

भोवताली आज अगणित माणसे ही सांत्वनाला  
आपले कोणी न उरले ती जशी सोडून गेली

                               ~ अभिजीत काळे.

इच्छा

***

उंचवर ज्याला गवसणी घालण्या उडतात इच्छा
अंबराला त्या, स्वतःच्या खूपशा असतात इच्छा

भेटण्यापूर्वी उगाचच रात्रभर छळतात इच्छा  
भेटल्यावरती अधाशी अंगभर मळतात इच्छा

त्या उद्याच्या भरवश्यावर रोज माझा आज सरतो,
वाटते आश्चर्य याचे! पण कुठे सरतात इच्छा?

ज्या कधी नव्हत्याच माझ्या वा कधी नसतात माझ्या
पाहता माझ्याकडे तू, खोल त्या रुततात इच्छा?

एक इच्छा दोन इच्छा साचती कित्येक इच्छा !
देह जळतो हा अखेरी पण कुठे जळतात इच्छा?

आठवण येते तुझी अन् मी तुझ्या स्वप्नात रमतो
फक्त स्वप्नालाच ठाउक काय त्या असतात इच्छा

जन्मभर माणूस त्यांना नाइलाजाने दडवतो
जीव जाताना मनाला खोलवर खुपतात इच्छा

एक गाठोडे तळाशी ठेवते बांधून सरिता   
वाळल्या पात्रात 'नाचिज़' कोवळ्या सुकतात इच्छा

                                          ~ अभिजीत काळे.

सिंधूताई

डोके तापले उन्हाने
पायी काटे सलतात
कुण्या अनाम दुःखानं 
डोळे तिचे झरतात

दुःख इतकं जीवाला
त्याला मोजमाप नाही
वर आभाळाच छत
घर नाही थारा नाही

चार पोरट्यांच्या साठी
आई मागते जोगवा
काय लागते जीवाला?
थोडे अन्न, पाणी, हवा.

कुणी देईना तुकडा
कुणा कणव येईना
लाज वाटतच नाही
मनुष्य‍ाच्या मेल्या मना

जे का रंजले गांजले
अशा अनाथांच्या साठी
माई लढली धीराने
न्यायासाठी हक्कासाठी

जगण्याच्या लक्तराला
शिवण्याला दोरा सुई
हाती घेत सिंधुताई
झाली अनाथांची माई

दिगंतर किर्ती माईच्या कार्याची
प्रेरणा होती जी शेकडो देहांची
अनाथांची माय दिवंगत झाली
देह सोडूनिया विश्वरूप झाली
निराधार बालगोपाळांची आई
मूर्तीमंत सिंधू सावळी विठाई
आज आसमंत भासे दुःखे भरिलाहे
वात्सल्याचा पुन्हा पान्हा आटलाहे

मीर तक़ी

*रेख्ते के तुम एकही उस्ताद नही हो 'गालिब'।*
*कहते है किसी जमानेमे 'मीर' भी था।*

महान संतकवी नामदेव महार‍ाजांनी म्हटलंच आहे की,
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझिया विष्णूदासा भाविकांसी।

              'कवी' म्हणजे की अखील जगताचा कैवार घेणारे, संवेदनशील, समृद्ध जाणिवा असलेले मानवविशेष व्यक्तिमत्व होय. जीवनाला स्पर्श करणार्‍या प्रत्येक पैलूवर कवी अभिव्यक्त होत असतो. मीरतकी 'मीर', मिर्जा असदुल्लाखाँ 'गालिब', फैज अहमद 'फैज', मोमिन, 'जौक' देहलवी, 'दाग' देहलवी, 'अल्लामा' मोहम्मद इक्बाल, 'फिराक' गोरखपुरी (पंडित रघुपती सहाय), 'जिगर' मुरादाबादी, 'साहिर' लुधिय‍नवी, अहमद 'फराज़', वसिम बरेलवी, निदा फ़ाज़ली, जौन एलिया, 'कतिल' सिफाही, यास-यगाना 'चंगेझी' आणि बशीर बद्र ही लांबलचक यादी थांबणार नाही, अशा अनेक शायरांनी उर्दू गझल परंपरेला आलंकृत केले आहे. 
              ज्याने आपल्या गझलच्या माध्यमातून उर्दू काव्यविश्वात आपला दबदबा निर्माण केला, त्या गालिबनेही 'अहंपणाचा वारा आपल्यापर्यंत येऊ नये', याची काळजी घेतली असावी की काय? म्हणून त्याने वरील शेर लिहिला असावा. मात्र, या दोन मिसर्‍यातून गालिब स्वतःला प्रस्थापित तर करतोच त्याबरोबरच 'मीर'ची उर्दूकाव्यातील बादशाही देखील मान्य करतो.

तर, हा 'मीर' होता तरी कोण? 
ज्या काळात फारसी भाषेतून लिहिणार्‍या कवींना राजाश्रय होता. त्या काळात जन्माने हिंदुस्थानी असणार्‍या उर्दू (रेख्ता) भाषेमध्ये 'खुदा-ए-सुखन' (काव्यदेवता अशी उपाधी मिरविणार्‍या) मीर-तकी 'मीर' याने गझल लिहिली. उर्दूला घडविणार्‍या कवींमध्ये मीरचं नावही अग्रस्थानी आहे. 
      आग्र्यात जन्मलेल्या व दिल्लीमध्ये आयुष्य घालवलेल्या मीरने अहमदशाह अब्दालीच्या दिल्लीवरील आक्रमणानंतर शेवटच्या काळात लखनौला नवाब असफउद्दौलाकडे आश्रय घेतला. मुलगी, पत्नी व मुलाला गमावल्यानंतर त्याला एकाकी आयुष्य जगावं लागलं. ह्य‍ामुळेच की काय? मीरच्या काव्यात त्याचं दुःख, त्याच्या वेदना उतरल्या आहेत. 'मीर'च्या शायरीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सहजता व समजण्यास सुलभ असं लेखन. त्यामुळेच गालिब म्हणतो, "ज्याला मीर कळत नाही तो अशिक्षित होय."
 
मीरचे काही शेर पाहूयात,

_इब्तिदा-ए-इश्क़ है रोता है क्या_
_आगे आगे देखिए होता है क्या_
         हा तर प्रेमाचा आरंभ आहे. ही प्रेमाची वाटचाल आत्ताच तर सुरू झालीय! अजून खूप अंतर कापायचं आहे. एवढ्यातच काय रडतो आहेस? पुढे पुढे पहा, अजून बरंच काही घडायचं आहे.

_याद उस की इतनी ख़ूब नहीं 'मीर' बाज़ आ_
_नादान फिर वो जी से भुलाया न जाएगा_
         तिची आठवण काही नक्कीच चांगली गोष्ट नाहीये 'मीर' वेळीच सावर. अरे वेड्या, तिने एकदा हृदय काबिज केलं तर पुढे तिला विसरणं महामुश्किलंच होऊन बसेल.

         हिंदी चित्रपट सृष्टीलाही गाण्यांमध्ये मीरचे मिसरे वापरण्याचा मोह आवरला नाही. मीरच्या एका शेराचा मिसरा वापरून लिहिलेले हे हिंदी गाणे आठवत‍े का पहा,
_'पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है'_
_जाने न जाने गुल ही न जाने बाग़ तो सारा जाने है_

बाजार चित्रपटातील 'मीर'ची ही प्रसिद्ध गझल सर्वांनी ऐकली असेलच,
_दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया_ 
_हमें आप से भी जुदा कर चले_

मीरच्या लेखणीची सहजता तर पहा,
_उल्टी हो गईं सब तदबीरें कुछ न दवा ने काम किया_
_देखा इस बीमारी-ए-दिल ने आख़िर काम तमाम किया_ 

_अहद-ए-जवानी रो रो काटा पीरी में लीं आँखें मूँद_ 
_या'नी रात बहुत थे जागे सुब्ह हुई आराम किया_ 

_आवेगी मेरी क़ब्र से आवाज़ मेरे बाद_
_उभरेंगे इश्क़-ए-दिल से तिरे राज़ मेरे बाद_

_बाद मरनेके मेरे कब्र पर आया वो मेरी_
_याद आयी मेरे इसा को दवा मेरे बाद_

मिर्जा 'गालिब', फैज अहमद 'फैज', 'जौक', 'दाग' सगळ्यांनीच 'मीर'चं श्रेष्ठत्व मान्य केले. मात्र याहूनही अधिक प्रकर्षानं मीरचं श्रेष्ठत्व सिद्ध करणारा हा शेर त्याचं विश्वबंधुत्व दाखवतो,
_उस के फ़रोग़-ए-हुस्न से झमके है सब में नूर_
_शम-ए-हरम हो या हो दिया सोमनाथ का_
          अहो, त्याच्या भवातीत सौंदर्याने ही सृष्टी चैतन्यमय प्रकाशात तेजाळते आहे. मग तो काब्यातला दिव्य प्रकाश असो वा सोमनाथा समोरचा तेजोमय दिवा!

_हस्ती अपनी हबाब की सी है_
_ये नुमाइश सराब की सी है_ 
       आपलं आयुष्य (आपलं अस्तित्व) एखाद्या 'हबाब' म्हणजे बुडबुड्यासारखं (क्षणभंगुर) आहे. वरवर पहाता आपले प्रदर्शन मांडणारं आयुष्य 'सराब' म्हणजे मृगजळासमान आभासी आहे. वरकरणी हे दर्शन पाण्यासमान दिसत असलं तरी तो एक वृथा भासच आहे. तसं पहाता शंकराचार्यांनी मांडलेल्या 'जगत मिथ्या' तत्वज्ञानाशी हा शेर पूरकता दर्शवतो.
       मनुष्याची तुलना पाण्यावरच्या क्षुल्लकशा बुडबुड्याशी करणारा 'मीर' त्याच मनुष्याचं महत्त्व अधोरेखित करताना म्हणतो की,
_मत सहल हमें जानो फ़िरता है फ़लक बरसों_
_तब ख़ाक के पर्दे से इंसान निकलते हैं_
      आम्ही इतक्या सहजपणे जन्माला आलो आहोत, आमचं अस्तित्व इतक्या सहजपणे निर्माण झालंय असं समजू नका. अहो, हे आकाश युगानुयुगे फिरलं तेव्हा कुठे मातीच्या उदरातून, धुळीच्या पडद्यामागून माणूस निघालाय (निर्माण आलाय).
       जीवन विषयक चिंतन आपल्या गझलेतून मांडताना इतकं गंभीर होऊन लिहिणारा 'मीर' प्रेम व प्रेमपात्राविषयी बोलताना मात्र साध्या सरळ शब्दांतून व्यक्त होतो.
_नाज़ुकी उस के लब की क्या कहिए_ 
_पंखुड़ी इक गुलाब की सी है_

 'प्रेमाग्नीने पोळलेले हृदय' या हळव्या गोष्टीबद्दल बोलताना 'मीर'ची विनोदबुद्धीही दिसून येते.
_आतिश-ए-ग़म में दिल भुना शायद_
_देर से बू कबाब की सी है_

_देखिए अब्र की तरह अब के_
_मेरी चश्म-ए-पुर-आब की सी है_
आणि आता काही पाहिलं तरीही, ते ढगांच्या धूसर पडद्याआडून पाहिल्यासारखंच दिसेल. कारण डोळ्यांत आसवांचा पूर आलाय. त्या पुराच्या पाण्यामुळे दिसणार तरी काय? (दुःखाचा हा किती पाणीदार आविष्कार म्हणायचा?)

एका गझलेत मीर म्हणतो,
_होश जाता नहीं रहा लेकिन_
_जब वो आता है तब नहीं आता_
        शुद्धी, स्थिती, अवस्था आत्ता जात नाहीये, पण ती (माझी प्रेयसी) येते तेव्हा ही स्थिती, ही शुद्ध, ही अवस्था कुठे असते? तेव्हा तर मी जणू बेशुद्धीतच असतो.
_इश्क़ को हौसला है शर्त अर्ना_
_बात का किस को ढब नहीं आता_
        अटीतटींवर ह्या प्रेमाचे धैर्य अवलंबून आहे, नाहीतर इथे कुणाला बोलता येत नाही? (ह्या प्रेमाने आमचं तोंड बंद ठेवलंय नाहीतर...)
_जी में क्या क्या है अपने ऐ हमदम_ 
_पर सुख़न ता-ब-लब नहीं आता_
         हे प्रिये, तुला काय सांगू की या मनात काय काय विचार आहेत? पण ओठांवर (गळ्याशपथ) एक शब्दही येत नाहीये!
_दूर बैठा ग़ुबार-ए-'मीर' उस से_ 
_इश्क़ बिन ये अदब नहीं आता_
        ही 'मीर' नावाची 'धूळ' तिच्यापासून दूर बसलेय (ही धूळ जाणूनबुजून तिच्या नावावर जाऊन बसली नाहीये. न‍ाहीतर 'धूळ' कुठे म्हणून बसत नाही?) खरं सांगतो प्रेम असल्या खेरीज ही अदब, हा आदर, हे संस्कार, ही तहजीब येत नाही.

प्रेम काय आहे हे सांगताना 'मीर'चे शेर प्रेमाने रंगूनही जातात आणि प्रेमाने जखमीही होतात. साध्या सरळ शब्दांत मीर खूप काही सांगून जातो. ही गझलच पहा की...
_क्या कहूँ तुम से मैं कि क्या है इश्क़_
_जान का रोग है बला है इश्क़_
         काय सांगू मी तुला की हे प्रेम नक्की आहे तरी काय? एक जीवघेणा रोग आहे एक महासंकट आहे प्रेम.
_इश्क़ ही इश्क़ है जहाँ देखो_
_सारे आलम में भर रहा है इश्क़_
         तसं पहिलं तर जिकडे पहाशील तिकडे फक्त प्रेमच तर आहे. प्रेमातून निर्माण झालेल्या आकर्षणातूनच तर अवघं जग जोडलं गेलंय. इथलं सगळं वातावरणच प्रेमानं भारलेलं आणि भरलेलं आहे.
_इश्क़ मा'शूक़ इश्क़ आशिक़ है_
_या'नी अपना ही मुब्तला है इश्क़_
         हे प्रेमच आहे जे प्रेम करतं (आशिक़) आणि ते ही प्रेमच ज्याच्यावर (मा'शूक़) कोणी प्रेम करतं. म्हणजे तसं पाहिलं तर आपण ज्यावर आसक्त झालो आहोत असं आपणच आपल्यावर ओढवून घेतलेलं संकट आहे (का?) प्रेम!
_दिलकश ऐसा कहाँ है दुश्मन-ए-जाँ_
_मुद्दई है प मुद्दआ है इश्क़_
        ह्या प्रेमाइतका सुंदर प्रेमीजीवांचा दुसरा कोणी वैरी असू शकेल काय? नक्कीच प्रेम दावेदार आहे. पण ज्याच्यावर दावा लावला जावा ह्या योग्यतेचं पण आहे 'प्रेम'.
_कोई ख़्वाहाँ नहीं मोहब्बत का_
_तू कहे जिंस-ए-ना-रवा है इश्क़_
          तू म्हणतोस की कोणी आपणहून प्रेम मागत नाही. अरे प्रेम म्हणजे न मागण्यासारखा जिन्नस आहे काय?
_'मीर'-जी ज़र्द होते जाते हो_
_क्या कहीं तुम ने भी किया है इश्क़_
        मीर (दुःखाने) निस्तेज (पिवळा) पडत चालला आहेस   तू पण कधीतरी प्रेम केलं आहेस काय?

'मीर'ची ही गझल ज्याने ऐकली नाही असा गझलरसिक विरळाच असेल, माझ्या आवडत्या काही गझलपैकी ही एक अतिशय आवडती गझल...
_देख तो दिल कि जाँ से उठता है_
_ये धुआँ सा कहाँ से उठता है_
         पहातरी नक्की काय जळतंय ते? हृदयातून येतोय की अत्म्यातून येतोय? हा धूर नक्की येतोय तरी कुठून?
_गोर किस दिलजले की है ये फ़लक_
_शोला इक सुब्ह याँ से उठता है_
         हे हृदयाकाश नक्की कुण्या हृदयभंग झालेल्या प्रेमिकाचं आहे? कुणाचं काळीज जळतंय? की या हृदयाकाश क्षितिजावर सकाळपासून सदोदितच एक जळता निखारा ठेवल्याप्रमाणे दिसतोय.
_ख़ाना-ए-दिल से ज़ीनहार न जा_
_कोई ऐसे मकाँ से उठता है_
        हे हृदयात वास करणार्‍या ह्या हृदयाच्या कप्प्यातून असा अचानक निघून जाऊ नकोस रे! कोणी असं अचानक स्वतःचं घर सोडून जातं काय? सांग ना!
_नाला सर खींचता है जब मेरा_
_शोर इक आसमाँ से उठता है_
        माझ्याच आतली बेचैनी जेव्हा जेव्हा मला चिंताग्रस्त करते, तेव्हा जणूकाही मनाच्या आकाशातून प्रचंड कोलाहल उठतो आहे, गदारोळ होतो आहे.
_लड़ती है उस की चश्म-ए-शोख़ जहाँ_
_एक आशोब वाँ से उठता है_
         जिथे जिथे तिची जादुई नजर भिडते तिथे तिथे उलथापालथ होते.
_सुध ले घर की भी शोला-ए-आवाज़_
_दूद कुछ आशियाँ से उठता है_
          घरातल्या दुःखी अवाजांची झळही समजून घे. घरातून, घरट्यातूनही काही धूर निघतो आहे.
_बैठने कौन दे है फिर उस को_
_जो तिरे आस्ताँ से उठता है_
           जो कोणी तुझ्या आसर्‍यापासून दूर झाला, तुझ्या चौकटीतून बाहेर पडला त्याला परत कोण आश्रय देणार? (त्यामुळे मला तुझा सहारा सदैव हवाय, तुझ्याखेरीज माझं अस्तित्व ते काय?)
_यूँ उठे आह उस गली से हम_
_जैसे कोई जहाँ से उठता है_
            आह! हे किती मोठे दुःख म्हणायचं? की तुझ्या दारातून मी असा उठलो कि जसा या जगातून उठलो. (त्यानंतर माझ्या अस्तित्वाला ओळखच उरली नाही. मी असूनही नसल्यासारखाच उरलो.) 
_इश्क़ इक 'मीर' भारी पत्थर है_
_कब ये तुझ ना-तवाँ से उठता है_
             अरे! मीर, हे प्रेम म्हणजे एक प्रचंड मोठा कातळखंडच जणू! तो तुझ्यासारख्या कमजोर माणसाकडून थोडाच उचलला जाणार आहे?

                'खुदा-ए-सुखन'
            जनाब मीर तकी 'मीर'

------------------------------------------------------------------------
_लुत्फ उठाते चलो इनके अशआँरों का_
_के खुदा-ए-सुखन नाज़-ए-सुखनवर है 'मीर'_
                                    ~ अभिजीत काळे.
                                       9850690597.