Tuesday, 19 April 2022

शंका

***

ठेवू नकाच बाकी फेडायला पुढे
होती तिचेच काटे टोचायला पुढे

जोखून बोल मित्रा तू बोल आपले
जड शब्द होत जातो राखायला पुढे

केलीस तू मशागत तण वाढण्यास जर
सोने मिळेल का मग वेचायला पुढे?

लाक्षागृहात इंधन लपवून ठेवता  
ठिणगीच खूप होते जाळायला पुढे

लादून घेत जाता मृदुकोवळी उन्हे
होतील तीच मोठी पोळायला पुढे

तथ्यांशहीन असते जी साक्ष बेगडी
खोट्यास साथ देते जिंकायला पुढे

घेऊ नकोस शंका कोणावरी मना!
कारण मिळेल नाते तोडायला पुढे

                    ~ अभिजीत काळे.
                         ७ मार्च २०२२

बहर

***

कोंब कोवळे नाहक येथे कुणी नखलतो.
वय स्वप्नांचे नाजुक असते बहर हरवतो.

रूप देखणे बघून भुलता मनास छळतो,
गुलाब नाही मानवला तर काटा सलतो.

सुगंधित अन् कोमल असते नवी पालवी,
वाढत जातो पर्णभार अन् दर्प पसरतो.

आकाशाचे फूल शोधण्या जातो कोणी!
आणि सशाचे शिंग पाहुनी मागे फिरतो!

आशेपाठी निर्दय होतो जीव कुणाचा,
मृगजळ हाती घेण्यासाठी मोह पळवतो.

श्रद्धेच्या सीमांना लांघुन जातो डोळा,
अन् शकुनांचा कौल ठरविण्याकरिता लवतो.

क्रौर्य पाहुनी पेटुन उठते आग कुठे ती?
सहिष्णुतेच्या मनी दयेचा नभ पाझरतो.

मान मला द्या, प्रत्येकाची इच्छा असते!
जो दुसर्‍याचा आदर करतो मान मिळवतो.

काही सोपे, अवघड काही कळावयाला
कळण्यासाठी बुद्धी येथे कोण झिजवतो?

                            ~ अभिजीत काळे.
                               १४ मार्च २०२२.

तुकोबाराय स्मृती-स्तुती..



इंद्रायणी मध्ये बुडविल्या वह्या
ऋणको धनको सीमा संपविल्या

पावन पावन केलीत मराठी
गाथेत ओवुनी जगजेठी

पुढे जात गाथा बुडविता जळी
जनगंगा पातली अभंगमुखे

स्वर्ग नरक येथे पाहिले स्वनयनी
सदेह वैकुंठ झालासी गा

भेदाभेद सकळ चंद्रभागेमध्ये
 बुडवोनी राखला वैष्णवधर्म

पंढरीची वारी केली अहर्नीश 
निराकार पाहिला पंढरीश

धन्य तुकाराम चालविले ब्रीद
अखंड भक्तीचे महाराष्ट्री

           ~ अभिजित काळे.
             २० मार्च २०२२.

साखर

***

तिच्या नजरेतली भाषा लपत नाही
लिपी शब्दांत डोळ्यांची कळत नाही

शहाण्याचे असावे वेगळेपण हे,
कळत नाही असे तो दाखवत नाही

उद्या जिंकेल गोगलगायही स्पर्धा
ससा जोवर हुशारीने पळत नाही

खरे का बोललेली ती मला तेव्हा,
'अरे! तू कोण माझा? आठवत नाही.'

हृदय फाटूनही जगलोच ना आम्ही?
इथे कोणी कुणावाचुन मरत नाही!

नको लपवूस चर्या ओढणीमध्ये
मनीषा चंद्र बघण्याची फळत नाही

किती ओठांत साखर पेरली आहे!
तिच्या शब्दांतली गोडी सरत नाही!
 
                    ~  अभिजीत काळे.
                       २१ मार्च २०२२