Thursday, 18 August 2022

पाहतो आहे

***

अचानक लाजणे.. हसणे तुझे मी पाहतो आहे
खळी खुलवत हसू फुलणे तुझे मी पाहतो आहे

फुलांच्या पाकळ्या कोमल तसे हे ओठ मधुवंती 
तशातच गीत पुटपुटणे, तुझे मी पाहतो आहे

कसा मी तोल सांभाळू, तुझे लावण्य की मदिरा?
कहर वर.. लाघवी रुसणे, तुझे मी पाहतो आहे

वयाचा दोष आहे हा तुझा नाही, तुझा नाही
सतत स्वप्नांत वावरणे, तुझे मी पाहतो आहे

नको पाहूस त्याला तू, तुला छळतोय जर दर्पण?
पहाता मुग्ध ब‍ावरणे, तुझे मी पाहतो आहे

किती सांगू तुला आहे तुझ्या प्रेमामध्ये वेडा
कसे छळते मला छळणे तुझे मी पाहतो आहे

कसे शब्दांत बांधावे तुझे सौंदर्य मोहकसे
रुपाच्या पैल ते असणे तुझे मी पाहतो आहे

                               ~ अभिजीत काळे.
                               १० ऑगस्ट २०२२

शाळा

***

स्वर्गीय कल्पना तू केल्यास का सुखांच्या?
गात्रांस जाळले का अग्नीत चांदण्यांच्या?

बुडती अनेकवेळा गर्तेत कामनांच्या,
चकवे बरेच येती मार्गात राजसांच्या.

द्राक्षासवास ओठी लावून माणसांनी
केल्यात सिद्ध लीला, वंशात माकडांच्या

स्वप्ने उडावयाची हृदयात ढेकळांच्या, 
कणसांमधून शिरली पंखात पाखरांच्या.

शाळा कशी असावी जगण्यात बालकांच्या ?
पाठीवरी हवी की डोक्यात लेकरांच्या ?

चर्चा घडून येता वाळीत टाकण्याच्या, 
माणूस लक्ष्य झाला गर्दीत श्वापदांच्या.

एकेक जात असता दुःखात साथ सोडुन!
शोधू कुणाकुणाला राखेत आठवांच्या

हातात हात असती त्यांचे तुझ्या अखेरी
ज्यांची नजर अडकली मायेमध्ये खिशांच्या 

भूखंड, रत्न, सोने कमवा अमाप रुपये
होणार राख शेवट राशीत लाकडांच्या

                       ~ अभिजीत काळे.
                       २८ सप्टेंबर २०१७