***
वर्तुळाचा केंद्र बिंदू म्हणवून घेत असताना ..
त्या बिंदूला मोठं झाल्यासारखं वाटतंय इतरांपेक्षा...
असं काय आहे विशेष त्याच्यात..?
इतर बिंदूसारखाच...
तोही एक बिंदू.
उलट...
वर्तुळाचा भाग असलेल्या...
इतर बिंदुंच्या समर्थनामुळंच तर...
त्याला येता आलंय.. केंद्रस्थानी...
अहो, जर,..
त्या बिंदूंपैकी काहींनी जरी मनमानी केली..
तर काय करणार हा...?
त्याला म्हणावं...
अरे बाबा ज्या परिघामुळे तुला पुर्णता लाभली आहे ना!
तोही...
बिंदूंनीच बनलेला आहे बरं...
आणि सांगावं...
कितीही त्रिज्या वाढवत गेलास....
कितीही परिघ मोठा केलास....
तरीही...
तुझं प्रतल व्यापणंही तुला अशक्य आहे बरं...
इतर प्रतलांची तर गोष्टच सोड.....
ह्या अगणित.... अनंतशा.... बिंदूविश्वात...!
तुझं स्थान ते काय?
होय, इथे...
आहे महत्वाची एक जाणीव...
स्वत्वातील अनंतत्त्वाची... आणि
अनंतत्त्वातील स्वत्वाची...
बाकी..
वर्तुळ, केंद्र, प्रतल..
हे सगळेच भास... मोहात टाकणारे...!!!
- अभिजीत काळे.
१८ नोव्हेंबर २०१७.
No comments:
Post a Comment