आहे तरूण समजा तर कोपरा मनाचा,
गंधाळतो सुरांनी जर मोगरा मनाचा.
बेधुंद स्वैर वाहे मन माणसा तुझे हे,
होता जरा अनावर धर कासरा मनाचा.
खोटेच नाटकी तू हसशी, उरात अश्रू ,
डोळ्यांमधून दिसतो वर चेहरा मनाचा.
ग्रासून संकटांनी हरला उमेद सारी,
सामर्थ्यवंत होण्या कर आसरा मनाचा.
विक्राळ रूप आहे खोटे तुझ्या भितीचे,
ऐकू नकोस मित्रा स्वर घाबरा मनाचा.
येतील कैक वेळा साथी प्रलोभनांच्या,
वेळीच कर बरा तू ज्वर कापरा मनाचा.
गुंतू नकोस स्वप्नी स्वीकार वास्तवाला,
सत्यास जागुनी तू, 'तर' भोवरा मनाचा.
. . . अभिजीत काळे.
१७ जुलै २०१७.
No comments:
Post a Comment