***
मी पत्राला कारण ठरलो, उत्तर ठरलो नाही.
बेमुर्वत मज म्हटले त्यांनी पण मी झुकलो नाही.
तारण ठेवत विश्वासाला न्यायाने मी लढलो.
कोणाच्याही ताटाखाली मांजर बनलो नाही.
शामल, रेशम शय्येसोबत सुख अनुभवले शीतल.
डोहामध्ये विषयांच्या पण अडकत सडलो नाही.
बाल्यावस्था, तारुण्याच्या... अद्भुत, मादक गोष्टी,
जिथल्या तेथे सोडत आलो, चिवडत बसलो नाही.
घट कमरेवर, घट डोईवर, घट गाभुळली काया,
आरस्पानी घटवळणांवर घसरून पडलो नाही.
गुणगुणलो अन् जगलो सुद्धा कवितेच्या मी ओळी.
शब्दांच्या घन सावळ धारांना मी मुकलो नाही.
थकवत आले जीवन मजला अपयश दावत माझे.
कडवट विषही पचवत गेलो, जगलो;... थकलो नाही.
कारस्थानी नातलगांनी बळकट कावा केला
लढलो चढलो चढतच गेलो मागे फिरलो नाही
धर्मासाठी अवयव तोडत पोळत छळले त्यांनी
बलिदानाने मृत्युंजय मी, जीवन हरलो नाही.
- अभिजीत काळे.
२१ डिसेंबर २०१८.
No comments:
Post a Comment