गाव वेशीवरी आज बोलावतो,
एक कप्पा सुगंधी हळू खोलतो.
कागदावर उतरतो उशीरा जरी,
शब्द रक्तातले थेंब मी सांडतो.
स्पष्ट बोलावयाला जिथे पाहिजे,
नेमका मी तिथे आसवे गाळतो.
आरसा पाहता, भास झाला मला,
चेहरा ओळखीचा कुणी वाटतो.
धावती पावले, मन घरी ठेउनी.
मीच वाटेत का, माणसे शोधतो?
भाषणांनी हटवली 'तिला' ना कधी,
रोज रस्त्यात गरिबीस मी भेटतो.
दीर्घ आयुष्य नाही फुलांना, . . खरे;
सौरभाचा सडा अंतरे व्यापतो.
- अभिजीत काळे.
१५ नोव्हेंबर २०१७.
No comments:
Post a Comment