*मृगजळ*
आकाश कागदांवर उपडे करीत असते.
मेंदूमधील शाई जेव्हा लिहीत असते.
पुस्तक तुझ्या मनाचे वाचूनही कितीदा,
डोळ्यांमधील कोडे मन सोडवीत असते.
येण्यास रात्र होता घरट्यात आश्रयाला,
कळते अनेकवेळा 'घर' काळजीत असते.
बाष्पास वाफ वेड्या बोलू नको कधीही,
पाण्यासवे उन्हाची ती गोड प्रीत असते.
प्राजक्त होउनी ती फुलते मिठीत तेव्हा,
उत्कट असे प्रितीचे ते भावगीत असते.
करतेस तू मुलाचे आजन्म लाड अाई,
रुसले तरी पुन्हा ते तुझिया कुशीत असते.
हरतो थकून जातो, मोहात गुंततो मी,
पळवून मज सुखाचे 'मृगजळ' खुशीत असते.
- अभिजीत काळे.
५ नोव्हेंबर २०१७.
No comments:
Post a Comment