एकही दुःखी कुणाचा पाडवा जाणार नाही.
औक्षणाविन चांदणीच्या चांदवा जाणार नाही.
ऊस आहे मी मला तू तोड वा पिरगाळ सुद्धा
गाळ वा चरकातुनी पण गोडवा जाणार नाही.
लपविला चाफा तरीही गंध ना लपणार त्याचा,
कीर्तिचा दरवळ न घेता, ही हवा जाणार नाही.
सोसताना दुःख विरही प्रीत होते पावसाळी?
टाळ तू अश्रू कितीही 'रातवा' जाणार नाही
चंदना घालून वेढा नाग बसलेले विखारी,
सज्जनांचे चित्त एैसे 'गारवा' जाणार नाही.
शांततेला आत्मबोधी सत्वशाली रूप येता,
भोगवादाला शरण तू 'मानवा' जाणार नाही.
देहबंदी जीव त्याला जन्म मृत्यू येत जातो
पैल नौका ही तुझ्याविन 'राघवा' जाणार नाही
- अभिजीत काळे.
१४ ऑक्टोबर २०१७.
No comments:
Post a Comment