***
जरा दूर अंबर भरू लागलेले, इथे कोरड्या या नभाच्या कडा.
तिथे आसवांचे झरे वाहती अन् इथे त्या धगीचा मनाला तडा.
पुन्हा शांतवूया मनातील लाटा, पुन्हा एकदा खेळ मांडू नवा,
मनाने मनावर कुठे घेतले पण! पुन्हा पाय पडला तुझा वाकडा.
स्मृतींची त्सुनामी उफाळून येता, सतवतो तुझा चेहरा हासरा.
पुन्हा लाट उध्वस्त हृदयात शिरते, भिजवते पुन्हा पापण्यांच्या कडा.
पिढी दर पिढी जर समज वाढते तर.. दुरावत कशी चालली माणसे?
हवी स्पेस म्हणुनी वगळला नव्यांनी जुना जाणता एकतेचा धडा.
नयन पूर्ण होतेच पाणावलेले तिच्यापासुनी दूर होता क्षणी.
कृपा पावसाची; कळालाच नाही, तिला आसवांचा लढा भाबडा.
तिच्या चार शब्दांस आसूसलेले उभे प्राण होते असा काळ तो.
अता वाटती स्वप्नवत सर्व घटना, खुळ्या कल्पनांचा खरा उलगडा.
जशी खोल श्वासांमधे ती उतरते तसा गंध रक्तात रुजतो तिचा,
सुगंधीत रंगापुढे कामनेच्या, फिका सोनचाफा फिका केवडा.
- अभिजीत काळे.
२५ सप्टेंबर २०१९.
No comments:
Post a Comment