***
दगडामध्ये देव पाहिला, ठाव विसरला आहे
डोहामध्ये देहभ्रमाच्या देव हरवला आहे
कळतच नाही प्रवाहात मी कसा वाहवत गेलो
सावरण्याच्या आधी माझा पाय घसरला आहे
वस्त्र तिरंगी, रंग वाटुनी झाल्यावर बेरंगी
धाग्यांमधला बांधिलकीचा भाव उसवला आहे
स्वप्नासोबत नाते माझे जडले उत्तररात्री
उजेडताना विरहबावरा दिन गहिवरला आहे
कुणी काढली अशी आठवण कातरवेळी माझी
कंठी उचक्या, नयनी अश्रू, श्वास वाढला आहे
आयुष्याची कथा जगाला नका कधीही सांगू
दुःख दुज्याचे एेकुन पाझर कुणास फुटला आहे
श्वास संपता, परतीचा तो मार्ग न आता उरला
क्षणात एका किती युगांचा काळ लोटला आहे
- अभिजीत काळे.
No comments:
Post a Comment