***
मनाप्रमाणे जगणे सांगा कुणास जमले आहे?
प्रवाह नेई तसे जिवाचे जगणे वळले आहे.
प्रेमाखातर विकू स्वतःची मर्जीसुद्धा म्हटलो!
मन माझे तर आधीपासुन तुझे जाहले आहे.
विश्वामध्ये कोणाचीही मिळकत शाश्वत नाही.
माझेमाझे म्हणून सगळे अखेर फसले आहे.
पत्राचा जो अर्थ हवा तो काढ तुला म्हटल्यावर,
मायन्यातले फूलच गाली तिच्या रंगले आहे!
भाव चेहर्यावरचे माझ्या लपवू शकलो नाही.
'मनात माझ्या काय चालले', तिला समजले आहे.
मर्जी माझी, इच्छा माझ्या म्हणून थकल्यानंतर,
प्रत्येकावर आयुष्याचे गणित रूसले आहे.
तिला विचारू शकलो नाही माझी जागा नक्की,
विसरलेय ती खास मला की हॄदयी जपले आहे?
- अभिजीत काळे.
२३ ऑगस्ट २०२०.
No comments:
Post a Comment