***
स्पर्श अजुनी काळजावर रेशमी
एक संध्याकाळ होती मौसमी
एकदा 'सौभाग्य' तू झालास की
जन्मभर नशिबात उरते बेगमी
रंग माझा एकही नाही खरा
खेळलो आयुष्यभर मी पंचमी
एक एका पावलाला जप इथे
की, वळण प्रत्येक आहे जोखमी
पौर्णिमेचे चांदणे नाही जरी
आस इतकी, रोज यावी अष्टमी
सांगतो श्रीकृष्ण भक्तीलक्षणे
भक्त तो, जो सर्वकाळी संयमी
खास नाही, मी कुणी सामान्यसा
सत्य हे की, मी न कोणाचा डमी
~अभिजीत काळे
No comments:
Post a Comment