***
मनस्वी राग येतो दांभिकांच्या वागण्याचा
गुन्हा केलाय दाखल मी.. मराठीच्या खुनाचा
कुठे डोहासही माहीत असतो तळ स्वतःचा
मनाचा तोल गेल्यावर.. समजला अर्थ याचा
क्षणांचा खेळ तो त्यांच्या.. मनाचा अन् तनाचा
हिर्याची खाण होती जी.. तिच्या उरल्यात काचा
असावा काय दावा मयसभेच्या वारशाचा
बदलतो सारखा का चेहरा त्या आरशाचा
दिवा आहे घराचा, बैठकीचा, मंदिराचा
असो कुठला फरक पडतो हवेला काय त्याचा
कशासाठी समाधानी म्हणावे मी स्वतःला
सदोदित पाहिजे असतो मला सदरा सुखाचा
मनाच्या भावनांचा, आसवांचा, हासण्याचा
बदलतो अर्थ दृष्टीकोन बदला पाहण्याचा
भरीला घातले त्यांनी.. तसा मग वागलो मी
मला आधी हवा होता कळाया कल जगाचा
इथे तर सावलीसुद्धा तुला सोडून जाते
तुझ्यावर भरदुपारी रोष झाल्यावर उन्हाचा
मनाच्या कागदावर रेख नक्षी पावलांची
कुठे एकांतसुद्धा राहतो मग एकट्याचा
मला गन्तव्य माझे सांगता का येत नाही
किती गाठेल उंची सांग पाचोळा मनाचा
- अभिजीत काळे.
१६ डिसेंबर २०२०
No comments:
Post a Comment