बालगीत लिहायचा प्रयत्न...
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी
दोन दात पटाशीचे तुझे किती मोठे
बदामाचे कवचही त्यांच्यापुढे थिटे
उंचउंच झाडांवरी सुरपारंब्यांचा
खेळ किती रंगतो गं तुम्हा भावंडांचा
आता राहायाला नाही तुला झाडे इथे
झाडे सारी पडल्यावर तू राहाशील कुठे?
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी
मऊशार पाठीवरी लोकरीची बंडी
लागतंच नाही तिला काही थंडीबिंडी
पुढे पाय किंवा हात म्हणा काही तुम्ही
नाकाडाच्या टोकावरी काळीशार गुंडी
मोठमोठ्या डोळयांनी ती टकामका पाही
झुबकेदार शेपटी मोठी दिसे राजबिंडी
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी
इटुकली पिटुकली बारकुशी काया
इवल्याश्या कानांनी ती ठाव घेते बया
लपाछपी खेळताना पानांमध्ये दडे
गोड गोड फळांसाठी झाडांवर चढे
सायूरीडी सायूरीनी कुलाची तू शान
विश्रांतीला थारा नाही कामातच मग्न
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी
रामसेतू बांधायाला योगदान दिले
इवलासा जीव तुझा तुरुतुरू चाले
माकडाच्या पायांखाली चिरडली खारू
रामाच्याही डोळ्यांतुनी ओघळले अश्रू
डोक्यापासुन शेपटीपर्यंत पट्टा तुझ्या भारी
पाठीवरती श्रीरामांनी भेट दिली न्यारी
खारुताई खारुताई ये ना माझ्या घरी
देईन मी खाऊ तुला पेरू आणि कैरी
~ अभिजीत काळे.
No comments:
Post a Comment