***
स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याची किती फोफावली वृत्ती?
जगाला तुच्छ समजत ही पहा सोकावली वृत्ती.
खरेतर जायचे आहे नदीच्या पैलतीरावर.
किती पण ओढते मागे तुला सुस्तावली वृत्ती!
अखेरी चार लाभावे भले खांदेकरी खंदे.
हसत खेळत खुलव गप्पा, नसो रागावली वृत्ती.
नको चाकू, सुरे, बर्च्या, नसो भाले, कट्यारीही.
कटाक्षाने तुझ्या एका इथे भांबावली वृत्ती.
कुणी ऐकून घेतो ही नको समजूस कमजोरी.
तुझी माजोरडी आहे कशी निर्ढावली वृत्ती?
व्यथांचा घोळ त्यागावा, स्वतःचा मार्ग शोधावा.
निरामय चित्त ठेवावे, असो भारावली वृत्ती.
खुळ्याशा कल्पनांच्या तू खुळ्या स्वप्नांत रमलेला.
दिसे गुर्मीत आगाऊ तुझी मस्तावली वृत्ती.
जगी आलास तेव्हा तू किती होतास रे साधा?
गुणांच्या संगती योगे अशी नादावली वृत्ती?
कुणाच्या कानपिचक्या अन् कुणाचे टोमणे जहरी.
अशाने साधली आहे मला शांतावली वृत्ती.
~ अभिजीत काळे.
१८ जुलै २०२१.
No comments:
Post a Comment