***
खळी लाडीक खुललेली गुलाबी लाजर्या गाली.
जणू स्वर्गातली आली कुणीशी अप्सरा खाली!
मला मल्हारवारीने दिले आयुष्य सोनेरी.
तनाची जेजुरी झाली मनाची साजिरी पाली.
कळेना प्रेम आहे की, असावा राग वा लज्जा?
कशाने एवढी आली तुझ्या गालांवरी लाली?
कुणाला वर्धमानाची कुणाला आम्रपालीची.
स्मृती ती आजही देते जरी वैराण वैशाली.
ढगांच्या आत कसलेसे असावे दुःख दडलेले.
जरासे थेंब टपटपता, मृदा गंधासवे न्हाली!
कथा रामायणाची अन्, भरत लक्ष्मण जुने झाले.
अजुनही भावकी सांगे इथे सुग्रीव अन् वाली.
कसा जगलो? कधी जगलो? मरत आयुष्य मी जगलो.
तुझे सान्निध्य असल्याने सुखे थोडीतरी आली.
कुठे दिसतोस दृष्टीला? तरी नाही म्हणावे का?
तुझे अस्तित्व जाणवते, मला दररोज भवताली.
तुडवला मी चुकुन चाफा मनाला दुःख झाले, पण..
नवल त्याचे किती सांगू? सुगंधी पावले झाली.
~ अभिजीत काळे.
२८ ऑगस्ट २०२१.
No comments:
Post a Comment