Saturday, 20 November 2021

सून

समईची ती शुभ्रज्योतिका सून खरोखर असते.
एके समयी दोन कुळांना तेजाळत ती असते.

सून कालची सहनशील अन् गाय मुकी ती होती
कष्ट साहुनी मुकेपणाने अश्रू दडवत होती
दार उंबरा सदैव त्यांच्या मर्यादा पायांना
जिथे बांधली शांतपणे ती राबत संपत होती

सून आजची सावित्री अन् सरस्वती शिकलेली
ज्ञानाग्नीने विदग्ध  दीपकळी फुललेली
बंध जपतसे नात्यांचे ती हसतमुखाने येथे
परक्या जागी मुळे रोवुनी वेल जशी रूजलेली

सून उद्याची स्वयंपूर्ण ती सुंदर सबल गृहलक्ष्मी 
संसाराला अर्थ पुरवती असेन ती श्रीलक्ष्मी 
विश्व उद्याचे खांद्यांवरती धरेल उचलुन नारी
लेकसून या भिन्न रुपांनी दोन्हीघरची लक्ष्मी

तरी काळ तो येतो केव्हा? नारीला समज‍ावे..
सून आपली लेक समजुनी प्रेम तिला ते द्यावे
सासू सुद्धा सून घराची होती केव्हाकाळी
सून आजची उद्या कुणाची असेल सासूबाई
समज एवढी नारीला जर आली कोण्या काळी
घराघराच्या नंदनवन ते सजेल सुंदर भाळी

No comments:

Post a Comment